बोरिवली 'नॅशनल पार्क'ची वाघ-सिंहांसाठी पुन्हा साद; 'सुलतान'ला प्रजननामध्ये अपयश

    दिनांक  22-Sep-2020 22:04:34   
|
tiger_1  H x W:


उद्यानातील वाघांच्या प्रौढ माद्यांसाठी प्रौढ नराची आवश्यकता

मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) नागपूरहून आणलेला 'सुलतान' नामक नर वाघ प्रजनन करण्यामध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने पुन्हा एकदा वन विभागाकडे दोन वाघ देण्याची मागणी केली आहे. याशिवाय उद्यानात चार सिंह आणण्यासाठीही गुजरात प्रशासनाबरोबर पाठपुरावा सुरू केला आहे. 

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात नागपूरच्या 'गोरेवाडा बचाव केंद्रा'तून 'सुलतान' वाघाला नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. हा वाघ ५ वर्षांचा आहे. त्याला वन विभागाने चंद्रपूर जिल्हातून १२ जुलै, २०१८ रोजी मानव-वाघ संघर्षातून जेरबंद केले होते. या वाघाला नॅशनल पार्कच्या व्याघ्र विहारातील मादी वाघिणींसोबत प्रजनन करण्याच्या हेतूने मुंबईत दाखल करुन घेण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये 'सुलतान'ने येथील बिजली (९), मस्तानी (९) आणि लक्ष्मी (१०) या तीन वाघिणींसोबत मिलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न असफल ठरले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नॅशनल पार्क प्रशासनाने वाघांची मागणी केली आहे. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे वाघ आणि सिंहांसंदर्भातील मागणीपत्र मिळाल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 'सुलतान' वाघापेक्षा या तिन्ही माद्या वयाने मोठ्या असल्याने त्यांच्यामध्ये मिलन झाले नाही. म्हणून आम्ही प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र लिहून दोन वाघांची मागणी केल्याची माहिती 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.व्याघ्र विहारातील प्रौढ माद्यांसाठी
मानव-वाघ संघर्षातून पकडलेल्या प्रौढ नर वाघाची आणि 'सुलतान'साठी त्याच्या वयाच्या मादीची मागणी या पत्राव्दारे केल्याचे मल्लिकार्जुन म्हणाले. याशिवाय सिंहाच्या दोन जोड्या देण्याची मागणीही प्रशासनाने याच पत्राव्दारे केली आहे. सद्यस्थितीत उद्यानातील सिंह विहारात एक मादी आणि दोन नर सिंहाचे अस्तित्व आहे. मात्र, हे सिंह वृद्धापकाळामुळे प्रजननास सक्षम राहिलेले नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नॅशनल पार्क प्रशासन गुजरातच्या 'सक्करबाग प्राणिसंग्रहालया'कडे सिंह देण्याची मागणी करत आहे. परंतु, सक्करबाग प्रशासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे. अशा परिस्थितीतही आता प्रशासनाने वन विभागाच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर सिंह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.