माथेरानमधून १२५ वर्षानंतर फुलपाखरांच्या नोंदी; १४० प्रजातींची नोंद

    दिनांक  08-Aug-2020 19:42:05   
|

butterfly _1  H

मुंबईकर संशोधकांचे संशोधन प्रसिद्ध 

मुंबई (अक्षय मांडवकर) - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधून फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. मुंबईच्या संशोधकांनी नऊ वर्षांच्या शोध कार्यानंतर येथील फुलपाखरांची यादी प्रसिद्ध केली आहे. १२५ वर्षांनंतर माथेरानमध्ये आढळणाऱ्या फुलपाखरांची अद्ययावत यादी प्रसिद्ध झाली आहे. या परिसरातील वाढते पर्यटन माथेरान परिसराभोवती वाढणाऱ्या शहरांचा विळखा या दृष्टीने हे संशोधन महत्वाचे आहे
 
 
थंड हवेच्या ठिकाणीसाठी प्रसिद्ध असलेले माथेरान हे वन्यजीवांच्या जैवविविधतेने समृद्ध आहे. येथील मोठे हरित क्षेत्र हे संरक्षित वनक्षेत्राअंतर्गत येत नाही. मात्र, २००३ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरानमधील २१४.७३ चौ.किमी क्षेत्र 'पर्यावरणीय संवदेनशील क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच याठिकाणी औद्योगिकरण आणि विकासप्रकल्प राबिण्यास बंदी आहे. या परिसरात आढळणाऱ्या फुलपाखरांची यादी सर्वप्रथम १८९४ साली संशोधक जे.ए.बेथम यांनी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी त्यांनी येथून ७८ फुलपाखरांची नोंद करुन भविष्यात मुंबईतीलच संशोधक पाठपुरावा करून अधिक फुलपाखरांची नोंद करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. आता १२५ वर्षांनंतर माथेरानमधील फुलपाखरांची अद्ययावत यादी प्रसिद्ध झाली आहे. 'बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शुक्रवारी ही यादी प्रकाशित करण्यात आली. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे संशोधक मंदार सावंत, डाॅ. निखिल मोडक आणि सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे सागर सारंग यांनी केलेल्या निरीक्षणाअंती ही यादी तयार केली आहे.  
 

butterfly _1  H 
 
 
  
माथेरानमध्ये २०११ ते २०१९ या नऊ वर्षांच्या कालावधीत आम्ही तिन्ही ऋतूंमध्ये फुलपाखरांचे निरीक्षण केले. या निरीक्षणाअंती फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद केल्याची माहिती संशोधक मंदार सावंत यांनी दिली. यामधील १५ प्रजातींचा समावेश हा 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम, व्दितीय आणि चतुर्थ क्षेणीत होत असल्याने त्यांना विशेष महत्त्व असल्याचे, सावंत यांनी सांगितले. संशोधकांनी माथेरानमधील ७ चौ.किमी क्षेत्रावर फुलपाखरांचे निरीक्षण केले. यावेळी त्यांना 'डबल बॅण्डेड क्रो' हे फुलपाखरु प्रथमच आढळले.
 
 
 
 
नऊ वर्षांच्या कालावधीत सिम्पसन टॅंक, शार्लोट लेक, पॅनोरमा पाॅईंट, गारबेट पाॅईंट, रुस्तमजी पाॅईंट, वन ट्री हिल पाॅईंट, संपूर्ण नेरळ-माथेरान रेल्वे ट्रॅक आणि नेरळ-माथेरान रस्त्यावरुन फुलपाखरांच्या २२ हजार ८३३ नोंदी घेण्यात आल्या. संशोधकांना सर्वात जास्त फुलपाखरे हिवाळी हंगामात आढळली आहेत. अद्ययावत यादीमध्ये फुलपाखरांच्या नोंदी प्रथमच 'कलर बारकोडिंग सिस्टिम'च्या आधारे करण्यात आल्या आहेत. यामध्ये फुलपाखरांचे वर्तन, खाद्य ग्रहण करण्याच्या पद्धती आणि हंगाम या वेगवेगळ्या रंगांच्या आधारे दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि निसर्गप्रेमींना ही सिस्टिम वाचून फुलपाखरांचे निरीक्षण करण्यास सोयीचे जाणार आहे. 
 
 
अधिवासाला धोका 
 
माथेरानमधील वाढते पर्यटन फुलपाखरांच्या अधिवासाला धोका निर्माण करत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. पर्यटकांनी हरित क्षेत्रात बेजबाबदारपणे टाकलेल्या कचऱ्यामुळे फुलपाखरांच्या चिखलपानावर (मड पडलिंग) परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.