लोकाभिरामं रणरङ्गधीरं...

    दिनांक  31-Jul-2020 10:31:48   
|
ram mandir_1  H

श्रीरामचंद्रांचे वर्णन करताना रामरक्षा स्तोत्रामध्ये ‘लोकाभिरामं रणरङ्गधीरं’ म्हणजे ‘लोकांना आनंद देणारा रणांगणात धैर्य धरणारा आणि परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असलेला’ असे केले आहे. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही सश्रद्ध हिंदू समाजाने तसाच धीर दाखवून रामजन्मभूमी मुक्त करीत अवघ्या हिंदू समाजाला आनंद दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदू समाजाची ही भूमिका अतिशय निर्णायक ठरणार, यात शंका नाही.


कोणत्याही राष्ट्राचे अस्तित्व, अस्मिता, स्वत्व आणि स्वाभिमान हे त्या राष्ट्राची श्रद्धा आणि आस्थेची केंद्रे, महापुरुषांची स्मृतिस्थळे आणि सांस्कृतिक स्थळांचे जतन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धार्मिक आस्था यावर उभे असते. भारताच्या बाबतीत बोलायचे तर राष्ट्राच्या अस्तित्वास हिंदुत्वाचा सर्वांत भक्कम आधार लाभलेला आहे. मात्र, खुनशी परकीय आक्रमकांनी भारताचा धर्म, श्रद्धा आणि आस्थेच्या केंद्रांना उद्ध्वस्त करण्याची आणि राष्ट्रीय स्वाभिमानास कमकुवत करण्याचे प्रयत्न नेहमीच केले आणि आजही तसे प्रयत्न त्यांचे वैचारिक वंशज करीत असतातच. हिंदूंची श्रद्धास्थाने असलेल्या हजारो मंदिरांचा विद्ध्वंस शेकडो वर्षे अविरत सुरू होता. मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदूंवर आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न इस्लामी आक्रमकांचा होता. केवळ मंदिरे उद्ध्वस्त करून ते थांबले नाही, तर त्यावर मशिदीही उभारण्यात आला. देशातील कानाकोपर्‍यात अशी शेकडो उदाहरणे आहेत. सोमनाथ, काशी विश्वनाथ, कृष्णजन्मभूमी मथुरा, रामजन्मभूमी अयोध्या ही मंदिरे भारताच्या राष्ट्रीय-सांस्कृतिक धारेचे मुख्य स्रोत आहेत. त्यापैकी सोमनाथाचे मंदिर तर वारंवार उद्ध्वस्त करण्यात आले होते. मंदिरे उद्ध्वस्त करण्यामागे हिंदुत्वाविषयीची आदिम प्रेरणा नष्ट करण्याचा इस्लामी आक्रमकांचा प्रयत्न होता. अर्थात, तसे काहीही झाले नसले तरीही या स्थानांचा झालेला विध्वंस हिंदू मनाला नेहमीच सलत राहिला.


त्यापैकी सोमनाथाची पुन्हा उभारणी उभारणी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी समर्थपणे करवून घेतली. त्यासाठी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नाराजीला काडीचीही किंमत दिली नाही. भारताच्या राष्ट्रीय आस्थेला सर्वोच्च महत्त्व द्यावेच लागेल, असा स्पष्ट संदेश सरदार पटेलांनी आपल्या त्या कृतीतून देशाला दिला होता. खरेतर त्याचे पालन करणे हे त्यांच्या राजकीय वारसदारांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांना धर्मनिरपेक्षता आणि जागतिक नेते व्हायचा छंद जडल्याने तसे होऊ शकले नाही. त्यापुढील काळात तर हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा म्हणजे मागासलेपणाचे लक्षण असे जाणीवपूर्वक देशात रुजविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हिंदू धर्माचे पालन करणारे हे मागासलेले, विज्ञानविरोधी, अंधश्रद्धांनी कवटाळून बसणार, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे तत्कालीन राजकीय नेतृत्वाला मोठा लाभ झाला. कारण, तेव्हाचे नेतृत्व म्हणजे सोव्हिएत समाजवादाच्या कच्छपी लागलेले स्वप्नाळू नेतृत्व होते. त्यामुळे ‘धर्म विरुद्ध विज्ञान’ असा फुकाचा वादही निर्माण करण्यात आला. त्याची री ओढण्याचे काम आजही त्याच तालमीत तयार झालेले अकादमिक विद्वान इमानेइतबारे करीत असतात. त्यामुळे सोमनाथानंतर काशी विश्वनाथ, मथुरा आणि अयोध्या या भूमी मुक्त करण्याचे हिंदूंच्या मनात असले तरीही त्याची अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही.


त्यापैकी अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्त करण्यास हिंदू समाजाला ६ डिसेंबर, १९९२ साली यश आले. परकीय आक्रमक बाबराने रामजन्मभूमीस्थान उद्ध्वस्त करून बांधलेल्या मशिदीचा ढाँचा रामज्वरामध्ये उद्ध्वस्त झाला. राम भारतीयांसाठी, हिंदूंसाठी केवळ पूजेसाठीचा देव नाही, राम भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. देशातील कोट्यवधी सश्रद्ध हिंदूंसाठी राम म्हणजे एक धीरोदात्त नायक आहे, जो आपल्या पित्याचे वचन आणि मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्यावर पाणी सोडतो, वनवास पत्करतो, वनवासात आपल्या पत्नीचे रावणाने अपहरणे केल्यानंतर शांत न बसता वानरसेना उभारतो, रणांगणात पराक्रम गाजवतो आणि सीतेची सुटका करतो. त्यानंतर अयोध्येत येऊन राज्य सांभाळतो. दरम्यान, ज्या व्यक्तीमुळे वनवास पत्करावा लागला. त्याच्याविषयी तो मनात कटुता बाळगत नाही. युद्धात सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या हनुमंतासह सर्व वानरसेनेचा तो सन्मान करतो. अयोध्येत असा कारभार करून दाखवतो की ‘रामराज्य’ अशी संकल्पनाच जन्माला येते. त्यानंतर आपले अवतारकार्य संपल्याची जाणीव झाल्यानंतर शरयूत अंतर्धानही पावतो. असा हा राम अवघ्या भारतासाठी श्रद्धेचा विषय बनला, या आश्चर्य असे काहीही नाही. रामचरित्राने भारतीय समाजात तत्व, वचनपालन, तत्त्व, सर्वसंगपरित्या, शील आणि मर्यादा, लोककल्याणारी राज्य यांचा एक आदर्श घालून दिला. त्यामुळे असा हा मर्यादापुरुषोत्तम राम भारताचा ‘राष्ट्रपुरुष’ बनला. रामचरित्र अनेकांना अगदीच आदर्शवादी वाटू शकेल, तसे वाटण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेच. मात्र, तसे असले तरीही भारतीय समाजमनात असलेली रामाची प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी पुसणे शक्य नाही. भारतीय समाजमन आणि राम यांचे अतूट नाते लक्षात घेऊनच घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या पानावर पुष्पक विमानात विराजमान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण याचे चित्र अंकित केले.


भारतीय राज्यघटनेतही ज्याचे अस्तित्व आहे, अशा रामाच्या जन्मभूमीवर त्याचे भव्य मंदिर उद्ध्वस्त करून मशीद उभी राहणे हे हिंदू समाजासाठी क्लेषदायक होते. जन्मभूमी मुक्त करण्यासाठी जवळपास ५०० वर्षांपासून हिंदू समाज संघर्ष करीत होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही समाजाने संविधानिक पद्धतीने आपला लढा सुरूच ठेवला. रामजन्मभूमीचा लढा हा लोकलढा होता. कारण, देशातील प्रत्येक सश्रद्ध हिंदू तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लढत होता. मात्र, हिंदू समाजाचे आग्रही स्वरूप संपूर्ण जगाला दिसले ते नव्वदीच्या दशकापासून. देशातील संतसमुदाय, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाने या लढ्याला पुन्हा ऐरणीवर आणायचे ठरवले. भाजपने १९८९ साली पालमपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात अयोध्येत राममंदिर झालेच पाहिजे, असा ठराव केला. भाजपचे तत्कालीन धुरीण लालकृष्ण अडवाणी यांच्या अयोध्या ते सोमनाथ रथयात्रेने अवघे हिंदू समाजमन घुसळून निघाले. त्यापूर्वी हिंदू समाज आपल्या मागणीसाठी एवढा आग्रही झाल्याचे कोणी पाहिले नव्हते. आंदोलनाचा जोर एवढा होता की, रामजन्मभूमीवरील ढाँचा रामभक्तांनी उद्ध्वस्त केला. तो ढाँचा होता, मशीद नव्हे!


रामजन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षे शांत बसलेला हिंदू समाज जागृत झाला होता. त्याचा फार मोठा धसका अकादमिक विद्वानांनी घेतला. कारण, एवढी वर्षे ज्या हिंदू समाजाचे खच्चीकरण करण्यात, सतत अवहेलना करण्यात त्यांनी धन्यता मानली होती. त्यामुळे जागृत झालेल्या हिंदू समाजाला पुन्हा एकदा कोषात ढकलण्यासाठी अकादमिक विद्वान कामाला लागले. कारण, असा जागृत झालेला हिंदू समाज हा अकादमिक विद्वानांच्या बोलावित्या धन्यांसाठी अडचणीचा होता. त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाला बदनाम करण्याची सुपारी घेतल्याप्रमाणे अकादमिक विद्वान कामाला लागले. या विद्वानांनी ‘रामजन्मभूमी आंदोलन’ असा उल्लेख न करता ‘बाबरी पतन’ असा उल्लेख सुरू केला. हिंदूंच्या आक्रमक जमावाने मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ असलेला अयोध्येतील बाबरी ढाँचा उद्ध्वस्त केला. यावर आधारित अहवाल, चर्चासत्रे, अकादमिक चर्चा, सेमिनार, पुस्तिका, पुस्तके, वृत्तपत्रीय लिखाण आदी प्रकारांचा रतीब या विद्वानांनी घालण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे, भारतात ‘दहशतवाद’ आणि ‘मुस्लीम जमातवादा’स उत्तेजन मिळण्यास ६ डिसेंबर, १९९२ पासून सुरुवात झाल्याचा जावईशोधही त्यांनी लावला. तसे करताना ११७४-४८ पासूनची पाकिस्तानची घुसखोरी, नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभीच वाढलेला दहशतवाद, काश्मिरी हिंदूंचे शिरकाण यांचा विसर पडला. त्यानंतर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांना दीर्घकाळ लक्ष्य करण्यात आले. भाजपवर तर ‘जमातवादी पक्ष’ असा शिक्का मारून राष्ट्रीय राजकारणात अस्पृश्य ठरविण्याचे कामही अकादमिक विद्वानांनी केले. रामजन्मभूमी आंदोलन हे सवर्ण हिंदूंचे आंदोलन होते, बहुजन समाजाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, अशी एक मांडणीही दरम्यानच्या काळात पुढे आणली गेली. त्याला मग ‘आर्य-अनार्य’, ‘आर्य-द्रविड’ या निरर्थक वादाचीही फोडणी देण्यात आली. एकूणच रामजन्मभूमी आंदोलनाला लक्ष्य करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदू समाजाला पुन्हा कोषात ढकलण्याचे प्रयत्न करण्यात आले.


रामजन्मभूमी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही या अकादमिक विद्वानांनी विरोध करण्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे, एरवी हेच अकादमिक विद्वान लोकशाही आणि लोकशाही संस्थांचा आदर करा, असे सांगत गावगन्ना हिंडत असतात. त्यामुळे अकादमिक विद्वान केवळ हिंदू समाजाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्ष्य करण्यासाठी आकाशपाताळ एक करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रोमिला थापर आणि अन्य विद्वान इतिहासतज्ज्ञांनी तर राममंदिर अस्तित्वातच नव्हते, हे सिद्ध करण्यासाठी आकाशपाताळ एक केले होते. थापर आणि अन्य मंडळींच्या कथित इतिहास संशोधनावर देशातील किमान दोन पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. त्यामुळेच आजही राममंदिराविषयी काडीचीही माहिती नसणारे लोक त्याविरोधात अधिकारवाणीने बोलताना दिसतात.


अर्थात, आता ५ ऑगस्टनंतर ही परिस्थिती बदलणार यात शंकाच नाही. भव्य श्रीराममंदिराची उभारणी ही राष्ट्रीय चेतनेची घटना आहे. त्यासाठी हिंदू समाजाने शेकडो वर्षे वाट पाहिली, लढा दिला. प्रभू श्रीरामचंद्रांचे वर्णन करताना रामरक्षा स्तोत्रामध्ये ‘लोकाभिरामं रणरङ्गधीरं’ म्हणजे ‘लोकांना आनंद देणारा रणांगणात धैर्य धरणारा आणि परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असलेला’ असे केले आहे. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही सश्रद्ध हिंदू समाजाने तसाच धीर दाखवून रामजन्मभूमी मुक्त करीत अवघ्या हिंदू समाजाला आनंद दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदू समाजाची ही भूमिका अतिशय निर्णायक ठरणार, यात शंका नाही.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.