अयोध्येत 'राममंदिर' तर देशात 'ज्ञानमंदिराची' पायाभरणी

30 Jul 2020 15:02:09


ashish shelar _1 &nb


मुंबई :
तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. मोदी सरकारने बुधवारी २९ जुलै रोजी नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. नव्या शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. या निर्णयाचे माजी शालेय शिक्षणमंत्री व भाजप आमदार आशिष शेलार यांनी स्वागत केले आहे.






ट्विट करत आशिष शेलार यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात, अयोध्येत 'राम मंदिराचे' भूमिपूजन होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ व्या शतकाच्या 'ज्ञान मंदिर' उभारणीची पायाभरणी केली. तब्बल ३४ वर्षानंतर देशाचे शैक्षणिक धोरण बदलून, बदलत्या काळाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य असलेली पिढी घडविण्यासाठी दमदार पाऊल टाकले. असे म्हणत त्यांनी या धोरणाचे स्वागत केले.



पुढे ते म्हणतात, घोकमपट्टीला आता रामराम करुन विद्यार्थ्यांच्या मुलभूत कौशल्याचे मुल्यमापन होईल. नवे शैक्षणिक धोरण कारकून नाही तर देशाची उभारणी करणारी नवी कौशल्य असलेली पिढी समोर घेऊन येईल. शिक्षण आनंदायी तर होईलच पण नवीन संशोधनाला चालना मिळेल.देशाला सामर्थ्यवान घडविण्याची ही नवी वाट आहे. या धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून ३ वर्षांच्या बालकांपासून त्यांच्या पालकापर्यंत आणि शिक्षकांपासून वर्ग,परिक्षा, मुल्यांकन या सगळ्यांचा सखोल विचार करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थी हा परिक्षार्थी न राहता ज्ञानार्थी होईल ! नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्यात येणार असून पुढील शिक्षण ही स्थानिक भाषेतून घेता येईल. तसेच भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य राज्य आणि विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. एकुणच हे नवे धोरण प्रगतीचे पंख देणारे आहे असेही ते म्हणतात.


Powered By Sangraha 9.0