सुरय पक्ष्याचे 'पूर्व आफ्रिका ते वसई' दरम्यान स्थलांतर; ३ हजार किमी प्रवास

    दिनांक  29-Jul-2020 20:22:46   
|

bird_1  H x W:


बोरिवली नॅशनल पार्कमध्ये उपचारादरम्यान मृत्यू मुंबई (अक्षय मांडवकर) - पूर्व आफ्रिकेजवळील सेशल्स बेट ते वसई, असे साधारण ३ हजार किमी स्थलांतर केलेल्या 'सूटी टर्न' (धूसर सुरय) पक्ष्याचा बुधवारी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पक्ष्याच्या पाठीवर लावलेल्या 'जीपीएस टॅग'मुळे त्याने केलेल्या स्थलांतराची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी हा पक्षी वसईमध्ये अशक्त अवस्थेत सापडल्यानंतर त्याची रवानगी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये करण्यात आली होती. (छायाचित्र - वेदांत कसंबे)
bird_1  H x W:

महाराष्ट्रात स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांविषयी आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे. सोमवारी वसईतील 'परमार टेक्नो पार्कपेझ ४' या औद्योगिक वसाहतीजवळ कर्मचारी नितीन परब यांना एक पक्षी सापडला होता. या पक्ष्याला उडता येत नसल्यामुळे जवळ जाऊन पाहिले असता त्यांना पक्ष्याच्या शरीरावर यंत्र लावलेले दिसले. त्यांनी तातडीने ही माहिती स्थानिक पोलीसांना दिली. पोलीसांनी या पक्ष्याला तुंगारेश्वर वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर उपचाराकरिता त्याची रवानगी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये करण्यात आली. याठिकाणी आल्यानंतर हा पक्षी 'सूटी टर्न' असल्याचे वनाधिकाऱ्यांना आढळून आले. या पक्ष्याच्या शरीरावर आम्हाला 'जीपीएस टॅग' आणि पायामध्ये रिंग लावलेली दिसल्याची माहिती वनक्षेत्रपाल आणि सिंह-व्याघ्र सफारी अधीक्षक विजय बारब्दे यांनी दिली. टॅग आणि रिंगवर नोंदवलेला क्रमांक आम्ही 'जीपीएस टॅग'वर लिहलेल्या ईमेलवर पाठवला. ईमेलला आलेल्या उत्तरातून हा पक्षी सेशल्स बेटांवर 'वाइल्डविंग्ज बर्ड मॅनेजमेंट ग्रुप'ने पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाकरिता टॅग केल्याची माहिती मिळाल्याचे बारब्दे यांनी सांगितले. 


(मॅप - राजू कसंबे)
bird_1  H x W:
'वाइल्डविंग्ज बर्ड मॅनेजमेंट ग्रुप'च्या डॉ. क्रिस्तोफर फेअर यांनी आॅगस्ट, २०१९ मध्ये टॅग केलेल्या १५ 'सूटी टर्न'मध्ये या पक्ष्याचा समावेश होता. मात्र, स्थलांतरातील प्रवासादरम्यान हा पक्षी अशक्त झाल्याने बुधवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम सुनील लिमये आणि 'बीएनएचएस'चे डाॅ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याची नॅशनल पार्कमध्ये जाऊन पाहणी केली. या पक्ष्याने सेशल्स बेट ते वसई दरम्यान साधारण ३,२२८ किमीचे स्थलांतर केल्याची शक्यता डाॅ. कसंबे यांनी वर्तवली आहे. या पक्ष्याच्या शरीराचे ट्रक्सीडर्मी करण्याकरिता वनाधिकाऱ्यांनी त्याचे जतन करुन ठेवले आहे. तर जीपीएस टॅग आणि रिंग हे सेशल्सला पाठविण्यात येणार आहेत. 
पूर्व आफ्रिकेजवळील सेशल्स बेटांवरुन दरवर्षी हे पक्षी कोकण किनारपट्टीवर आॅगस्ट ते सप्टेंबर दरम्यान स्थलांतर करतात. सिंधुदुर्गमधील वैगुंर्ला राॅक्स या बेटावर या पक्ष्याचे प्रजनन स्थळ आहे. वसईत सापडलेल्या या पक्ष्याच्या शरीरावरील टॅग आणि रिंगचा क्रमांक आम्ही देहरादूनच्या 'भारतीय वन्यजीव संस्थान'चे (डब्लूआयआय) डाॅ. सुरेश कुमार यांना अधिक माहितीकरिता दिला आहे. - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.