महाराष्ट्राचे मत्स्यउत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी घटले; ४५ वर्षातील सर्वात मोठी घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2020   
Total Views |

fishing_1  H x



गेल्यावर्षी समुद्रात आलेल्या वादळांचा परिणाम




मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या २०१९ सालच्या मत्स्यउत्पादनामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२ टक्के घट झाली आहे. 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'ने (सीएमएफआरआय) आज ही माहिती दिली. गेल्या ४५ वर्षांमधील ही सर्वात मोठी घट आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आलेल्या वादळांमुळे मासेमारीत घट झाल्याचे स्पष्टीकरण 'सीएमएफआरआय'ने दिले आहे.
 
 
 
 
'सीएमएफआरआय'ने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचे २०१९ सालचे मत्स्यउत्पादन हे ३.३६ दशलक्ष टन नोंदवले गेले आहे. २०१८ च्या (३.४९ टन) तुलनेत यामध्ये २.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुजरातला मागे टाकून २०१९ मध्ये तामिळनाडूने मत्स्यउत्पादनात आघाडी घेतली आहे. तर, महाराष्ट्र राज्य सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. सीएमएफआरच्या आकडीवारीनुसार २०१८ साली महाराष्ट्राचे मत्स्यउत्पादन २.९५ लाख टन होते. मात्र, २०१९ साली त्यामध्ये ३२ टक्क्यांनी घट होऊन ते २.०१ लाख टनावर आल्याची माहिती 'सीएमएफआरआय'चे संचालक डाॅ.ए.गोपाळकृष्णन यांनी दिली. महाराष्ट्रातील गेल्या ४५ वर्षांतील मत्स्यउत्पादन पाहता २०१९ चे उत्पादन हे सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
fishing _1  H x 
 
 
 
महाराष्ट्राचे मत्स्यउत्पादन कमी होण्यास गेल्यावर्षी राज्याच्या सागरी परिक्षेत्रात धडकलेली वादळे आणि त्यामुळे खराब झालेले हवामान कारणीभूत असल्याचे माहिती मुंबई 'सीएमएफआरआय'च्या शास्त्रज्ञ प्रमुख डाॅ.अनुलक्ष्मी चिल्लपन यांनी दिली. गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या मासेमारीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या महिन्यांमध्ये खराब हवामानामुळे मच्छीमारांना ५० दिवस मासेमारी करता आली नाही. म्हणजे मासेमारीच्या एकूण दिवसांमधील ३५ टक्के दिवस मासेमारी न झाल्याने मत्स्यउत्पादनात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ हे वर्ष भारतीय किनारपट्टीसाठी अतिशय भयंकर होते. कारण, चक्रीवादळांचा तडाका राज्याला बसला होता. एप्रिलमध्ये 'फॅनी', जूनमध्ये 'वायू', सप्टेंबरमध्ये 'हिका', ऑक्टोबरमध्ये 'क्यार', ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 'महा' आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील 'बुलबुल' ही वादळे धडकल्याने व्यावसायिक दृष्ट्या महत्वपूर्ण माशांच्या उत्पादनात घट झाल्याची माहिती सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांनी दिली.
 
 
 
 
वादळामुळे मत्स्यउत्पादनात घट झाली असली, तरी महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर धडकले जाणे चिंतेची बाब असल्याचे 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितले. 'सीएमएफआरआय'च्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८७.४ टक्के यांत्रिकीकृत, १२.४ टक्के मोटार संचलित आणि केवळ ०.२ टक्के पारंपारिक मासेमारीच्या नौकांनी मासेमारी झाली. अशा परिस्थितीतही धोरणात्मक पातळीवर यांत्रिकीकृत नौकाधारकांचा विचार होत नसल्याची खंत नाखवा यांनी व्यक्त केली. यांत्रिकीकृत नौकांच्या विरोधातच राज्य मत्स्यव्यवसाय विभाग निर्णय घेत असल्याने त्याचा परिणाम मत्स्यउत्पादनावरही होत असल्याचे, नाखवा म्हणाले. राज्यातील मत्स्यउत्पादनाची ही नोंद मासळी उतरविण्याच्या १५८ केंद्रावरुन करण्यात आली. २०१९ मध्ये ट्राॅल जाळीने ५५ टक्के, डोलने २३ टक्के, पर्ससीन जाळीने १५ टक्के आणि गिलनेटने ७ टक्के मासेमारी झाली. करंदी-जवल्याची सर्वाधिक मासेमारी(२१ %) २०१९ मध्ये राज्यात झाली. त्यापाठोपाठ कोळंबी (९ %), बोंबील (८.२ %), ढोमा (८.२ %), बांगडा (६.९ %) या माशांची मासेमारी झाली आहे. महाराष्ट्राच्या मत्स्यउत्पादनात ४० टक्के वाटा हा मुंबई शहराचा असून त्यापाठोपाठ रायगड आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो.
@@AUTHORINFO_V1@@