भावनाशून्य चीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020   
Total Views |

china_1  H x W:


जगात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोक मेली आहेत. मात्र, चीनच्या भावना शून्य आहेत. उलट जिनपिंग म्हणतात, विनाशकारी कालखंड येऊन गेल्यानंतर नवीन परिवर्तन होत असते. असा हा चीन आणि अशा चीनशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तो करताना चीनपेक्षा अधिक ‘डिसेप्शनसिव्ह’ बनावे लागेल. भावनाशून्य देशाशी, तसाच व्यवहार करावा लागेल.



भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्‍यातील संघर्षाची चर्चा देशभर चालूच आहे. चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत आपले २० जवान हुतात्मा झाले. त्याचे राजकारण करण्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी सध्या मग्न आहेत. पण, ते नेहरु घराण्याचा सपशेल इतिहास विसरतात की, पं. नेहरु यांनी तिबेटचे उदक चीनच्या हातावर सहज सोडले. इंग्रजांनी चीनला तिबेटमध्ये प्रवेश करु दिला नव्हता. भारताची उत्तर सीमा सुरक्षित ठेवायची असेल, तर चीन आणि भारत यांच्यामध्ये एक ‘बफर स्टेट’ हवे. यामुळे तिबेट स्वतंत्र राहिला पाहिजे, असे इंग्रजांचे धोरण होते. इंग्रज तर परके होते, परंतु त्यांना भू-राजनीती उत्तम प्रकारे समजत होती. पं. नेहरु यांना मात्र ‘शांतीदूत’ बनण्याची घाई झाली. त्यांनी तिबेट चीनला देऊन टाकला. शत्रू चीनला त्यांनी आपल्या सीमेवर आणला. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. साठ हजार चौरस किलोमीटर ‘अक्साई चीन’ बळकावला. त्याबद्दल सोनिया आणि राहुल गांधी अवाक्षरही बोलत नाहीत. मोदी म्हणतात की, “एक इंच भूमीही भारताची देणार नाही.” पण, हे माता-पुत्र म्हणतात की, “चीनने भारताची दहा इंच जमीन घेतलेली आहे.” त्यामुळे याला केवळ ‘राजकारण’ म्हणतात आणि हे ‘देशकारण’ नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

देशकारणाचा विचार करताना गलवान खोर्‍यात चीनने घुसखोरी का केली, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो. सगळेच जण म्हणतात की, लडाखचा प्रदेश उजाड आहे. तेथे भूमीवरील नैसर्गिक संपत्ती वगैरे काही नाही. भूगर्भात काही असेल तर ते आपल्याला माहीत नाही. चीनला मोठे युद्धदेखील आज करायचे नाही. ते त्यांनाही परवडणारे नाही. पण, युद्ध करायचे तर त्याचे हेतू स्पष्ट असावे लागतात. युद्ध करून चीनला काही फायदा होणार आहे, अशी जागतिक परिस्थिती नाही. मग तरीही चीन अशी आगळीक का करतो? याचे उत्तर कोरोना व्हायरसमध्ये आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरस सर्व जगात पसरला. त्यामुळे सध्या सगळे जगच चीनच्या विरोधात आहे. या प्रश्नावर चीन एकाकी पडला आहे. अमेरिकेने चीन विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. कोरोनाची नुकसानभरपाई चीननेच दिली पाहिजे, अशी जागतिक स्तरावर मागणीदेखील जोर धरत आहे. भारतात तर चीनविरोधी वातावरण खूपच तापलेले आहे. मार्चमध्ये चिनी राजदूताने भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना फोन केला होता. त्याचा भावार्थ असा होता की, कोरोना संकटात चीनला दोषी ठरवू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’चीनने कोरोना जगावर सोडला’ असे काहीही म्हटलेले नाही. राजनीतीकदृष्ट्या असे म्हणताही येत नाही. मात्र, ’आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून त्यांनी चिनी वस्तू भारतात नको, असे अप्रत्यक्ष सुचविले आहे. या चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भाषा गांधी माता-पुत्र करीत नाहीत. पण, त्याचे अर्थ चीनला समजतात. कोरोना संबंधात चीनच्या विरोधी प्रचार करु नका, हा संदेश गलवान खोर्‍यात आगळीक करुन चीनने दिलेला आहे.

चिनी राजनिती सरळ मार्गाने जाणारी नसते. चीन कसा व्यवहार करेल आणि कसा वागेल, याचा अचूक अंदाज बांधता येत नाही. हा चीनचा स्वभाव जाणून घेण्यासाठी चीनचा इतिहास आणि तत्वज्ञ याची थोडीबहुत माहिती असावी लागते. सन त्झु यांचे ’आर्ट ऑफ वॉर’ हे प्रसिद्ध पुस्तक आहे. जगातील सैनिकी प्रशिक्षण शाळेत त्याचा अभ्यासही केला जातो. सर्व युद्धे ‘डिसेप्शन’वर आधारित असतात. (याचा अर्थ होतो, जे खरे नाही ते खरे आहे, असे वाटायला लावणे, तशी फसवणूक करणे.) सन त्झुचे दुसरे सूत्र आहे, ’लढाई न करता शत्रूला हतबल करणे.’ ही युद्धातील श्रेष्ठ कला आहे. त्याचे तिसरे सूत्र आहे, ‘स्वत:ला ओळखा आणि शत्रूलाही ओळखा.’ त्यामुळे हजार लढायांतून हजार विजय मिळतील. शेजारी राष्ट्रांची कशी फसवणूक करायची, हे चीन उत्तम जाणतो. त्याने १९६२पूर्वी भारताबरोबर ‘पंचशील’चा करार केला. ‘पंचशील’ हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे. चोरी न करणे, घात न करणे, व्यभिचार न करणे इत्यादी विषय त्यात येतात. चीनला हे माहीत आहे की, भगवान गौतम बुद्ध, त्यांचे ‘पंचशील’ हा भारताचा अतिशय ‘वीक पॉईंट’ आहे. चीनने त्याचा वापर केला, म्हणजेच ‘डिसेप्शन’ केले. ही चीनची राजनीती, रणनीती असते. यासाठी चीनला जाणून घेणे, फार आवश्यक आहे. चीनचा इतिहास विस्तारवादी आहे. लोकसंख्या अफाट असल्यामुळे त्याला नवीन भूमी सतत लागत असते. अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चीन दुर्बल होता. जपाननेदेखील त्याच्यावर आक्रमण केले. पाश्चात्त्य देशांनी चिनी लोकांना अफूची सवय लावली. चीनमध्ये अफूची युद्धे झाली. या सर्व अपमानाचे खोल घाव चिनी माणसावर पडलेले आहेत. म्हणून चीनचे वर्णन ‘जखमी संस्कृती’ या शब्दात केले जाते.



  
१९४८ नंतर चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आली. चिनी राष्ट्रवादाला ‘कम्युनिझम’ची फोडणी देण्यात आली. अनियंत्रित राज्यसत्तेखाली राहण्याचा चीनचा पारंपरिक स्वभाव असल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य याचे मळे चीनमध्ये फुलले नाहीत. पूर्वी एक सम्राट राज्य करीत असे, आता त्याची जागा सम्राट कम्युनिस्ट पार्टीने घेतलेली आहे. तेव्हा कम्युनिस्ट पार्टीचा सर्वेसर्वा होता माओ झेडाँग. त्याने चीनपुढे दोन लक्ष्य ठेवली. पहिले लक्ष्य चीनला प्रबळ आर्थिक सत्ता करायचे आणि दुसरे लक्ष्य चीनला मोठी लष्करी सत्ता करायचे. ‘लिप फॉरवर्ड’ या शब्दातून त्याने ही सर्व भावना व्यक्त केली आहे. त्याचवेळी कम्युनिस्ट चळवळीचे जागतिक नेतृत्व चीनकडे आले पाहिजे, असेही त्याने ठरविले. कम्युनिस्ट नेतृत्वाच्या प्रश्नावरून चीनचा रशियाशी संघर्ष सुरू झाला. सीमावादही सुरू झाले. तेव्हा रशियाचा सर्वेसर्वा स्टॅलिन होता. स्टॅलिनच्या भेटीसाठी पोलादी रेल्वेगाडीतून माओ मास्कोला गेला. सहा आठवडे स्टॅलिनने त्याला भेटच दिली नाही. रशियातील कुठल्याही राजनेत्याला, “मी भेटल्याशिवाय माओला कुणी भेटायचे नाही,” अशी ताकीद दिली. याला ‘डिप्लोमसी’ म्हणतात. ‘कम्युनिस्ट चळवळीचा नेता तू नाही, मी आहे,’ हा संदेश यातून द्यायचा होता. चीन अशा गोष्टी कधी विसरत नाही. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर रशियाचा राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव चीनच्या भेटीसाठी गेला. एरवी राजनेत्याचे स्वागत रंगीबेरंगी फलक लावून आणि गर्दी करुन केले जाते. मात्र, चीनने क्रुश्चेव येणार्‍या रस्त्याकडे पाठ करून प्रात:विधीला लोक बसविले. असा आहे चीन, अगदी ‘अनप्रेडिक्टेबल.’ अशा चीनशी आपल्याला सामना करायचा आहे. त्यामुळे गांधी माता-पुत्रांनी त्याचा थोडा अभ्यास करावा.


चीनची दादागिरी केवळ गलवान खोर्‍यात सुरु आहे, असे समजण्याचेही कारण नाही. प्रशांत महासागराचा जो भाग चीनच्या जवळ आहे, त्याला ’साऊथ चायना सी’ असे म्हणतात. या क्षेत्रात अनेक बेटे आहेत. काही बेटांवर चीनने कब्जा केलेला आहे. तो चीनचा भाग आहे, असे चीनचे म्हणणे. तेथे लष्करी तळ उभारले आहेत, ही सर्व आमची सागरी हद्द आहे, अशी चीनची दादागिरी. एका जपानी बोटीवर त्यांनी नुकताच हल्ला केला. व्हिएतनामची एक मच्छीमारी बोट त्यांनी बुडवली. त्यात 22 मच्छीमार ठार झाले. इंडोनेशिया आणि मलेशिया यांच्यामध्ये जो समुद्र आहे, त्याला ‘मल्लाका स्ट्रेट’ म्हणजेच ‘मल्लाकाची सामुद्रधुनी’ असे म्हणतात. हा चिंचोळा समुद्र आहे. यातून मुख्यत: चीनची जहाजे ये-जा करतात. सामरिकदृष्ट्या तो जगातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तो काही कारणामुळे बंद झाला, तर चीनच्या व्यापाराला जबरदस्त फटका बसेल. या सर्व क्षेत्रावर आपले सागरी आणि हवाई प्रभुत्व असले पाहिजे, म्हणून चीन छोट्या छोट्या देशांना सतत धमकावत असतो, दादागिरी करीत असतो. त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपले नौदल सज्ज ठेवले आहेच, पण काही आशियाई देशांत अमेरिकन सैनिक पाठविण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.


दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने कोरोनासंदर्भात चीन विरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. चीनने कोरोना जगावर सोडला, असा आरोपही ऑस्ट्रेलियाने केला आहे. त्याला उत्तर म्हणून चीनने ऑस्ट्रेलियाला धमकीही दिली. ऑस्ट्रेलियातून येणार्‍या मांसावर चीनने बंदी घातली आहे. आर्थिक निर्बंध लादण्याचा हा एक प्रकार. तैवान आणि हाँगकाँग यांच्याशी तर चीनचे उबे भांडण चालूच आहे. हाँगकाँगचा ताबा सोडताना ब्रिटनने चीनशी करार केला. या करारानुसार हाँगकाँग चीनचा भाग असला तरी दोन देशात दोन राज्यपद्धती चालतील, असे कलम आहे. हाँगकाँगमध्ये भाषण, लेखन, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, जे चीनमध्ये नाही. हाँगकाँगमधील हे स्वातंत्र्य नाहीसे करण्याचे कायदे चीन लादू इच्छितो. त्याविरुद्ध हाँगकाँगमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. थोडक्यात सांगायचे तर चीनच्या कटकटी केवळ भारतातच आहेत असे नाही; त्या शेजारील सर्व देशांशी आहेत. त्याचे एकमेव कारण जागतिक प्रभुत्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा.चीनचे संकट भारतापुढे मर्यादित नाही. ते जागतिक संकट आहे. आशियातील देशांपुढे जसे आहे, तसे अमेरिका व युरोपपुढे आहे. चीनच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र आहे, ’तुमच्या भावभावनांना लगाम घाला, भावनेच्या आहारी गेलात, तर विनाश अटळ आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा फायदा नाही.’ म्हणून चीनचे संकट हे एका भावनाशून्य देशाचे आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोक मेली आहेत. मात्र, चीनच्या भावना शून्य आहेत. उलट जिनपिंग म्हणतात, विनाशकारी कालखंड येऊन गेल्यानंतर नवीन परिवर्तन होत असते. असा हा चीन आणि अशा चीनशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तो करताना चीनपेक्षा अधिक ‘डिसेप्शनसिव्ह’ बनावे लागेल. भावनाशून्य देशाशी, तसाच व्यवहार करावा लागेल. मानवजातीचे कल्याण हा आपला ध्येयवाद असला तरी मानवजातीच्या कल्याणासाठी कंस, जरासंध, दुर्योधन, रावण, औरंगजेब यांचा खात्मा करावा लागतो, ही परंपरा आपण विसरु नये.

@@AUTHORINFO_V1@@