आपला आत्मीय वाल्मीकी समाज

    दिनांक  13-Jun-2020 22:06:41   
|


safai_1  H x W:कोरोनायुद्धात आघाडीवर लढणार्‍या सर्व योद्ध्यांना विनम्र प्रणाम! स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर, परिचारिका, पोलीस, भाजी विक्रेते, घरोघर दूध पोहोचविणारे आणि तसेच समाजातील दुःखितांची सेवा करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांना ईश्वर उत्तम आरोग्य देवो आणि त्यांना सुखी ठेवो, अशी आपण प्रार्थना करूया.


या कोरोनायुद्धात लढणारा आघाडीवरचा सैनिक सफाई कामगारदेखील आहे. त्यांनी जर यावेळी सेवा बंद केली असती, तर घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराईने सर्व समाज पिडला गेला असता. हे सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठतेने सर्व ठिकाणी आपले काम करीत आहेत. त्यांच्याविषयी विवेकानंद एकदा म्हणाले होते की, “कलकत्ता शहरातील सफाई कामगारांनी संप केला, तर काय गोंधळ उडेल, याची आपण कल्पनाच न केलेली बरी!” विवेकानंदांना सांगायचे आहे की, ज्यांना आपण ‘शूद्र’ म्हणतो, ‘भंगी’ म्हणतो, ‘अस्पृश्य’ म्हणतो ती समाजाची फार मोठी शक्ती आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे महापाप आहे. असे काम करणार्‍यांना पारंपरिक शब्द ‘भंगी’ असा आहे, भाषेतील काही शब्द असे असतात की जे जसा श्रेष्ठभाव व्यक्त करतात, तसा अत्यंत हीनभावदेखील व्यक्त करतात. त्याचा उच्चार आपण कोणीही करता काम नये.

‘जे हीन ते निंदू’ अशी हिंदूंची एक व्याख्या मी कधीतरी वाचली होती. हीनभाव व्यक्त करणारे सर्व शब्द भाषेतून हद्दपार केले पाहिजेत. जो भाजी विकतो तो भाजी विक्रेता, किराणामाल विकतो तो दुकानदार, इलेक्ट्रीकचे काम करणारा इलेक्ट्रिशियन, तसा सफाईचे काम करणारा सफाई कामगार हे शब्दप्रयोग बरोबर आहेत. काम हे काम असतं. त्या कामाची वर्गवारी ‘महान काम’ आणि ‘हीन काम’ अशी करता येत नाही. अर्थात, अनैतिक कामे जे करतात, त्यांना हे लागू करता येणार नाही. परंतु, उदरनिर्वाहासाठी केले जाणारे कोणतेही काम हे समाजपुरुषाची सेवाच असते, त्याची पतवारी करता येत नाही.
आपल्या समाजरचनेत असे काम करणार्‍यांची जात तयार झालेली आहे. असे काम करणारे स्वतःला ‘वाल्मीकि’ असे म्हणतात. वाल्मीकी नावाची कोणती एक जात नाही. तो अनेक जातींचा समूह आहे. वेगवेगळ्या राज्यात त्यांना वेगवेगळी नावे आहेत. ‘मेहतर’, ‘झाडमाळी’, ‘हलालखोर’, ‘राऊत’, ‘हेला’, ‘डोम’, ‘डोमार’, ‘धानुक’, ‘चुहडा’ इत्यादी नावांनी वेगवेगळ्या राज्यांत त्यांची ओळख आहे. ज्यांनी शीख धर्म स्वीकारला त्यांना ‘मजहबी’ आणि ‘रंगरेटा’ असे म्हणतात.
‘ वाल्मीकी समाज उत्पत्ती, स्थिती आणि परिवर्तनहे प्रा. प्रभाकर मांडे यांचे पुस्तक आहे. प्रा. प्रभाकर मांडे विद्वान समाज संशोधक आहेत. सफाई काम करणारा हा जातिसमूह कसा तयार झाला, त्याच्या उत्पत्तीचे अनेक दाखले त्यांनी आपल्या पुस्तकात दिले आहेत. ते म्हणतात, ‘‘मुसलमान आक्रमकांनी त्यातही मुघलांच्या काळात त्यांचा उद्भव झाला असे, डॉ. विजय सोनकरशास्त्री यांनी त्यांच्या हिंदू वाल्मीकि जाती : एक गौरवशाली इतिहास के पतन का सिंहावलोकनया ग्रंथाचं प्रमाण सिद्ध केले आहे. ‘ प्रा. श्यामलाल यांनी असे म्हटले आहे की, “ ‘भंगी’ या स्वतंत्र जातीचा उल्लेख भारतात मुसलमानांच्या आक्रमणांपासून झाला. त्यांनी आपल्या बरोबर त्यांच्या स्त्रियांनाही आणले. त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये निर्माण करण्यात आली होती. मुसलमान शासकांनी पराभूत सैन्यातील काहींना हे काम करण्यासाठी युद्धकैदी केले, दास केले आणि त्यांच्यावर स्वच्छतेचे काम लादले.”
प्रा. प्रभाकर मांडे यांनी ज्यांच्यावर स्वच्छतेचे काम लादण्यात आले, अशा वर्णांची नावे दिलेली आहेत, त्यात ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण आणि वैश्य वर्ण यातील हिंदूंवर दास बनून ते काम लादण्यात आले. अनेक पिढ्या गेल्यानंतर तेव्हा त्यांच्यासाठी ‘भंगी’ हा शब्द वापरला गेला. याचा अर्थ असा झाला की, आज जे सफाई काम करतात, ते सर्व उच्चवर्णीय आहेत आणि त्यांच्यावर बळजबरीने हे काम लादण्यात आले, एकतर मुसलमान व्हा, नाही तर स्वच्छतेचे काम करा. या पर्यायातील त्यांनी स्वच्छतेचे काम स्वीकारले. हे जेव्हा आपण वाचतो, तेव्हा त्यांच्याविषयी ऊर अभिमानाने भरून येतो.
‘चुहडा’ ही वाल्मीकी समाजातील एक जात पूर्वीचे ब्राह्मण आहेत. विजय प्रसाद यांनी मौखिक परंपरेने ‘चुहडा’ लोकांची गाणी संकलित केली. त्यातील एका गाण्याचा आशय असा, ‘मुसलमान माझे दफन करून माझ्यासाठी कलमा पढणार नाही, त्याचप्रमाणे हिंदू मला जवळ करून माझ्यावर अग्निसंस्कारही करणार नाहीत. तेव्हा मला माझ्यासाठी स्वतंत्र जातच निर्माण करावी लागेल. मला स्वतःलाच माझ्या मुक्तीची द्वारे खुली करावी लागतील.महर्षी वाल्मीकी यांच्याशी आपली नाळ जोडून स्वतःच्या मुक्तीचा मार्ग शोधलेला दिसतो.
अशा या धर्मनिष्ठ समाजाची आजची स्थिती काय आहे, हे पाहिले पाहिजे. साधारणतः देशभर सफाई कामगारांची संख्या 50 लाखांच्या आसपास आहे. सफाईची सगळी कामे त्यांना करावी लागतात. रेल्वेतील मलमूत्राची सफाई असो की रस्ते झाडणी असो, की सार्वजनिक शौचालये असो, सर्व ठिकाणी स्वच्छतेची कामे त्यांना करावी लागतात. गटाराची सफाई असताना ‘नॅशनल कमिशन फॉर सफाई कर्मचारी’ यांच्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१९ या वर्षात ३७७ जणांना मृत्यू आला. गटारांच्या मेनहोलमध्ये विषारी वायू निर्माण होतात. या घाणीत उतरल्यानंतर मनुष्य गुदमरून मरतो. ही प्रत्यक्ष गटारात उतरून झालेल्या मृत्यूची संख्या आहे. विषारी वायूची लागण झाल्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या किती असेल, हे सांगता येत नाही. असा मृत्यू झाल्यानंतर प्रसिद्धीसाठी राजकीय सत्ताधारी नेते लाखांची अनुदाने घोषित करतात. पण, त्यातले प्रत्यक्ष किती या कामगारांना मिळते, हा संशोधनाचा विषय आहे. कोरोना महामारीत सफाईचे काम करताना मृत्यू झाल्यास एक कोटी रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. सफाई कामगारांचे नेते म्हणतात की, “ही फक्त घोषणाच आहे, पण प्रत्यक्ष काही मिळाले नाही.”
डिसेंबर महिन्यात मी भोपाळला प्राध्यापकांच्या शिबिरात ‘संविधान’ हा विषय मांडण्यासाठी गेलो होतो. संध्याकाळी भोपाळमधील काही सफाई कामगार संघटनांच्या प्रमुखांशी चहापानाचा कार्यक्रम होता. त्यात त्यांनी आपल्या ज्या व्यथा सांगितल्या, त्या ऐकून मी सुन्न झालो. शासन आता सफाई कामगारांची थेट भरती करीत नाहीत. सफाई कामगारांचा ठेका दिला जातो. हा ठेकेदार सफाई कामगारांना नोकरीला ठेवतो. त्यांना सात-आठ हजार रुपये पगार देतो आणि १२ तास त्यांना राबवून घेतो. नगरपालिकेत सफाई कामगार नोकरीला लागला तर त्यांना २० ते २५ हजार रुपये पगार मिळतो, त्याच्या कामाचे तास आणि जेथे सफाई करायची आहे, तो विभागही ठरलेला असतो. याचा अर्थ असा झाला की, ठेकेदार हा जळवाप्रमाणे या कामगारांचे रक्त शोषण करीत आहे आणि हे करण्याची अनुमती शासनाने दिलेली आहे, ही सर्वात संतापजनक गोष्ट आहे.
या व्यथा कथनातील पुढील भाग त्याहून विदारक आहे. सफाई कामगार कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी शिकली, तर तिला अन्य ठिकाणी नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. जातीचा उल्लेख आला की, नोकरी नाकारण्याकडेच कल राहतो, ही आपल्या समाजाची मानसिकता! ज्यांच्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगतो आणि ऐतिहासिक विचार करता ज्यांच्या त्यागामुळे आज आपण ‘हिंदू’ म्हणून जगतो, त्यांना दिली जाणारी ही वागणूक संताप निर्माण करणारी आणि तीव्र दुःख निर्माण करणारी आहे.
या सर्वांचा विचार करता समाजाचा घटक म्हणून मी काय करू शकतो, आणि समाज म्हणूनही आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. व्यक्तिगतदृष्ट्या आपण एक गोष्ट केलीच पाहिजे, ती म्हणजे, सफाई कामगार मग तो पुरुष असेल किंवा महिला असेल, माझा आत्मीय बांधव आणि भगिनी आहे, या भावनेने त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे. त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना पगार दिल्याने आपले कर्तव्य संपत नाही. आत्मीय भावनेने चौकशी केली पाहिजे, घरात कोण आहे, मुले काय करतात, त्यांचे काही प्रश्न असतील तर ते दूर केले पाहिजे, त्यांच्यासाठी दोन पैसे खर्च केल्याने आपला बँक बॅलन्स कमी होत नाही. सणासुदीला घरात जे गोडधोड होते, त्यातला त्यांचा हिस्सा आदराने त्यांना दिला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबतीत जेवढे सक्रिय साहाय्य करता येईल, तेवढे केले पाहिजे.
समूहरूपाने त्यांच्या मागण्या, त्यांची आंदोलने याबाबतीत त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, सफाई कामातील ठेकेदारी पद्धती बंद करण्यासाठी लोकमताचा दबाव निर्माण केला पाहिजे. लोकशाहीत संख्याबळाला खूप महत्त्व असते. ठेकेदारी बंद करण्यासाठी वाल्मीकी समाजानेच मोर्चा काढला, तर त्यात १०-१२ हजार लोक सामील होतील. पण, सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिला तर ही संख्या कैक लाखांत मोजावी लागेल. राजनेत्यांना संख्यांची भाषा समजते. आपल्या समाजबांधवांच्या मागे संख्याबळ उभे करणे, हे आपले केवळ राष्ट्रीय कर्तव्य नसून धार्मिक कर्तव्यदेखील आहे. याचा सर्वांनी बोध करून घ्यावा हीच, नम्र प्रार्थना!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.