भारतीय समुद्रात प्रथमच आढळला 'हा' दुर्मीळ विषारी रंग बदलणारा मासा

    दिनांक  01-Jun-2020 11:55:02   
|
fish _1  H x W:
 
 
 

'सीएमएफआरआय'च्या शास्त्रज्ञाकडून या माशाची नोंद

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - भारताच्या सागरी परिसंस्थेत प्रथमच दुर्मीळ 'बॅंड-टेल स्काॅर्पिअन' हा रंग बदलणारा विषारी मासा आढळून आला आहे. 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'च्या (सीएमएफआरआय) शास्त्रज्ञांना तामिळनाडूच्या मन्नारच्या आखातातील सागरी सर्वेक्षणादरम्यान हा मासा आढळला. या माशांच्या शरीरावर विषारी डंख मारणारे काटे असतात आणि प्रसंगी तो आपला रंगही बदलू शकतो. या शोधामुळे भारतीय सागरी परिसंस्थेच्या जैवविविधतेतील अजून एक गुपित उलगडले आहे.
 
 
भारताच्या सागरी परिक्षेत्रातील संशोधन कार्यादरम्यान आजही अनेक जीवांचा नव्याने उलगडा होत आहे. तसेच काही प्रजातींची प्रथमच नोंद करण्यात येत आहे. तामिळनाडूमधील मन्नारच्या आखातामधून अशाच रंग बदलणाऱ्या विषारी माशाची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. 'बॅंड-टेल स्काॅर्पिअन' हा दुर्मीळ मासा प्रथमच भारताच्या समृद्ध सागरी परिसंस्थेत आढळून आला आहे. मन्नारचे आखात हे सागरी जैवविविधतेच्या अनुषंगाने समृद्ध ठिकाण आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने प्रवाळ आणि समुद्री गवतांचे पट्टे आहेत. या प्रवाळांमध्ये विविध प्रजातींचे सागरी जीव अधिवास करतात. समुद्री गवतांच्या सर्वेक्षणासाठी खोल पाण्यात उतरलेल्या 'सीएमएफआर'च्या शास्त्रज्ञांना सेतुकरईच्या सागरी परिक्षेत्रात 'बॅंड-टेल स्काॅर्पिअन' मासा आढळून आला. 
 
 

fish _1  H x W: 
 
 
सर्वेक्षणादरम्यान पाण्याच्या तळाशी असलेल्या प्रवाळांमध्ये आम्हाला हा मासा आढळला. प्रथमदर्शनी हा मासा आहे ? की शिंपल्याच्या कवचाने झाकलेले एखादे प्रवाळ ? याबाबत आम्ही गोंधळलो. त्याला थोडे हलवल्यानंतर काही क्षणातच त्याने रंग बदलण्यास सुरुवात केली. अवघ्या चार सेंकदामध्येच या माशाची त्वचा पांढऱ्यापासून काळ्या रंगात बदल्याची माहिती या माशाची नोंद केलेले 'सीएमएफआरआय'चे वरिष्ट शास्त्रज्ञ डाॅ. आर.जेबास्करन यांनी दिली. झिप-लॉक पॉलिथिलीन पिशवी वापरुन या माशाला पकडल्यानंतर लगेच त्याने छातीवरील पंख फडफडवला आणि या पंखाच्या आतील बाजूस काळ्या पट्ट्यासह चमकदार पिवळा रंग दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. या माशाला ‘स्कॉर्पिअन फिश’ म्हणतात कारण त्याच्या शरीरावरील काट्यांमध्ये 'न्यूरोटॉक्सिक' विष असते. “जेव्हा हे काटे आपल्याला दंश करतात त्यावेळी त्यामधून हे विष आपल्या शरीरात जाते आणि ते अत्यंत वेदनादायक असू शकते”, असे जेबास्करन म्हणाले. हा विषारी मासा खाल्लाने माणसाचा मृत्यूही होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. 

fish _1  H x W: 
 
 
'बॅंड-टेल स्काॅर्पिअन' ही माशाची प्रजात निशाचर आहे. त्यांच्या अधिवास प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी असतो. शिकार करण्यासाठी ते आपल्या रंग बदलाच्या खुबीचा वापर करतात. भक्ष्याचा वेध घेण्यासाठी रंग बदलून विजेच्या वेगाने त्याच्यावर हल्ला चढवतात. या माशांची संवेदन प्रणाली शक्तिशाली आहे. अगदी काळोख्या प्राण्यातही १० सेमी अंतरावर खेकड्यांच्या श्वसनातून तयार झालेल्या प्रवाहांचा हा मासा वेध घेऊ शकतो. डॉ. जेबास्करन यांच्या म्हणण्यानुसार, हे मासे प्रामुख्याने गोबीज, ब्लेनीज, क्रस्टेशियन आणि प्रवाळांमध्ये आढळणारे छोटे अषृष्ठवंशी जीव (इनव्हर्टेब्रेट्स) खातात. शास्त्रज्ञांना आढळलेल्या या माशाचा नमुना 'सीएमएफआरआय'च्या राष्ट्रीय सागरी जैवविविधता संग्रहालयात जमा करण्यात आला. हे संशोधन कार्य जर्नल 'करंट सायन्स'च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.  मुंबईच्या सागरी परिक्षेत्रातूनही १९४५ साली स्काॅर्पिअनफिशच्या नव्या प्रजातीचा (Scorpaenopsis lactomaculata) उलगडा झाला होता.
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.