कासवमित्रांच्या वर्षभर थकलेल्या मानधनासाठी 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून निधी

    दिनांक  02-May-2020 20:27:19   
|
turtle _1  H x  
 
 
 


कासव संवर्धनाचे काम 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने ताब्यात घेण्याची मागणी

 
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनमध्येही रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर अहोरात्र कासव संवर्धनाचे काम करणाऱ्या काही कासवमित्रांचे वर्षभराचे मानधन प्रादेशिक वन विभागाने थकवले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने कासवमित्रांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. फाऊंडेशनकडून कासवमित्रांचे थकलेले मानधन चुकते करण्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी प्रादेशिक वन विभागाला नुकताच पाठविण्यात आला आहे. यानिमित्ताने कोकण किनारपट्टीवर सुरू असलेले कासव संवर्धनाचे काम 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने ताब्यात घेण्याच्या सूर कासवमित्रांंमधून उमटत आहे.
 
 
 
कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांचा विणीचा हंगाम संपुष्टात आला आहे. सध्या संचारबंदीच्या काळातही कासवमित्र डोळ्यात तेल घालून अंड्यांमधून बाहेर पडलेल्या कासवांच्या पिल्लांना समुद्रात रवाना करत आहेत. मात्र, वर्षभरापासून रत्नागिरी जिल्ह्यातील काही कासवमित्रांना वन विभागाकडूनत्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळालेला नाही. संचारबंदीमुळे कासवमित्रांचे उपजीविकेचे इतर पर्याय बंद आहेत. अशा परिस्थितीत मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. कासव संवर्धनाचे काम प्रादेशिक वन विभागाकडून पाहिले जाते. रत्नागिरीतील कासवमित्रांना नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत प्रतिमहिना ८ हजार आणि सहाय्यकाला ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. मात्र, त्यामधील काही कासवमित्रांना गेल्यावर्षीपासूनचे मानधन मिळालेले नाही.
 
 
 
कासव संवर्धनाच्या कामासाठी कासवमित्रांना देण्यात येणारे मानधन हे 'कॅम्पा'च्या निधीतून देण्यात येते. मात्र, यंदा हा निधी मिळण्याचे नियोजन न झाल्याने त्यांना मानधन देण्यात अडचणी आल्याची माहिती रत्नागिरीचे उपवनसंरक्षक भवर यांनी दिली. याला पर्याय म्हणून 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून आम्हाला काही निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही कासवमित्रांचे मानधन आमच्याकडे शिल्लक असलेल्या मॅंग्रोव्ह फाऊंडेशनच्या चार लाख रुपयांच्या निधीतून केल्याचे, ते म्हणाले. याविषयी 'मॅंग्रोव्ह सेल'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेन्द्र तिवारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कासवमित्रांचे रखडलेले मानधन देण्यासाठी आम्ही 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून ११ लाख ४० हजार रुपयांचा निधी रत्नाागिरी प्रादेशिक विभागाला पाठवला आहे. भविष्यात कासवमित्रांना मानधन देण्यास काही अडचणी आल्यास आमच्याकडून निधी देण्यात येईल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.