'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट'च्या अध्यक्षपदी नृत्यगोपालदास

20 Feb 2020 12:19:52
Nrutya-Gopal-das _1 



विहिंपचे चंपतराय महासचिव, कोषाध्यक्षपदी गोविंददेव गिरी



नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक बुधवारी दिल्ली येथे पार पडली. बैठकीत ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची निवड करण्यात आली, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते चंपतराय यांची महासचिव तर कोषाध्यक्षपदी गोविंददेव गिरी यांची निवड करण्यात आली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,” अशी माहिती गोविंददेव गिरी यांनी दै.'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक बुधवारी राजधानी दिल्ली येथे पार पडली. अयोध्याप्रकरणी बाजू मांडणारे वरिष्ठ वकील के. पराशरन यांच्या दिल्लीतील ग्रेटर कैलास यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत महंत नृत्यगोपालदास आणि विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते चंपतराय यांना ट्रस्टमध्ये सम्मिलीत करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची निवड सर्वसंमतीने करण्यात आली. ट्रस्टच्या महासचिवपदी चंपतराय, कोषाध्यक्षपदी गोविंददेव गिरी यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या अशा भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. ट्रस्टचे कार्यालय अयोध्या येथे असणार आहे. त्याचप्रमाणे ट्रस्ट आणि मंदिर उभारणीच्या आर्थिक बाबींसाठी अयोध्या येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते उघडले जाणार आहे, अशी माहिती गोविंददेव गिरी यांनी दिली.
 
 
बैठकीच्या प्रारंभी १५२८ सालापासून रामजन्मभूमीसाठी लढा देणार्या सर्व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आता हयात नसलेल्या मात्र रामजन्मभूमीच्या लढ्यात आपले योगदान देणार्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र यांना धन्यवाद देणारा प्रस्तावही बैठकीत संमत करण्यात आल्याची माहिती गोविंददेव गिरी यांनी दिली. ट्रस्टची पहिली बैठक पार पडली असून आता ४९० वर्षांची ऐतिहासिक चूक सुधारण्यात आली आहे. भारताच्या इतिहासातील महत्वाची घटना आज घडली असल्याचे भावून उद्गार चंपतराय यांनी यावेळी काढले.
 
 

महंत नृत्यगोपालदास- रामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू

 
महंत नृत्यगोपालदास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू असा त्यांचा उल्लेख केल्यास ते वावगे ठरणार नाही. विश्व हिंदू परिषद, संत समुदाय आणि धर्मसंसद यांच्यामध्ये समन्वय साधण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले दिवंगत अशोक सिंघल यांच्या बरोबरीने महंत नृत्यगोपाल दास यांची रामजन्मभूमी आंदोलनाची नेमकी भूमिका समाजासमोर मांडण्यात अतिशय महत्वाची भूमिका आहे.
 
 
 




">
Powered By Sangraha 9.0