रात्रीस खेळ चाले; महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर पसरली चकाकणाऱ्या सूक्ष्मजीवांची चादर

    दिनांक  25-Nov-2020 17:05:10   
|
bioluminescent algae_1&nb
(फोटो - सानित आचरेकर) 

राज्याच्या बहुतांश किनाऱ्यांवर दर्शन 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या बहुतांश किनाऱ्यावर सध्या रात्रीच्या वेळी चकाकणारी निळी चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामागचे कारण म्हणजे 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स'( नोक्टीलिका) हा सूभ्म जीव. या समुद्री सूक्ष्म जीवांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे समुद्राच्या लाटांवर निळा प्रकाश पसरतो. मात्र, या जावांची अमर्यादित वाढ सागरी परिसंस्थेला घातक असून त्यामुळे माशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत सागरी अभ्यासकांनी मांडले आहे.
 
 
 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्य़ा किनाऱ्यांवर आदळणाऱ्या लाटा निळ्या रंगाने प्रकाशित होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू किनाऱ्यावरील लाटांवर देखील निळ्या रंगाचा प्रकाश दिसला. याशिवाय सिंधुदुर्गातील देवगड आणि रत्नागिरीतील आंजर्ले किनाऱ्यावरही स्थानिकांनी असाच काहीसा प्रकार किनाऱ्यांवर आदळणाऱ्या लाटांवर पाहिला आहे. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' या सूक्ष्म जीवांच्या शरीरामधून निघाणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लाटांवर निळा रंग पसरला आहे. मात्र, या जीवांचे दर्शन राज्याच्या किनारपट्टीवर पहिल्यांदा झालेले नाही. गेल्या पाच वर्षांपासून या जीवांचे दर्शन रात्रीच्या वेळी किनारपट्टीच्या भागात होत आहे. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हे जीव मोठ्या प्रमाणात किनाऱ्यापट्टीनजीकच्या भागात येतात. या जीवांना धोका जाणवल्यास ते आपल्या शरीरातून चकाकणारा निळा प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळल्यामुळे या जीवांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते निळा प्रकाश उत्सर्जित करत असल्याने लाटांवर निळा प्रकाश पसरतो.

 
bioluminescent algae_1&nb
 
 
'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हा जीव सागरी परिसंस्थेला घातक असल्याचे सागरी अभ्यासक सांगतात. हे जीव मोठ्या संख्येने किनारपट्टीक्षेत्रात येत असल्याने ते माशांचे अन्न असणाऱ्या 'फायटोप्लॅन्कटन्स' आणि 'डिऍटॉम्स' मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे अन्नाच्या अभावी त्या क्षेत्रात माशांची संख्या कमी होत असल्याची माहिती सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी दिली. शिवाय हे जीव मृत पावल्यानंतर अमोनिया निर्माण होऊन पाणी आम्लयुक्त होते. या आम्लयुक्त पाण्यामुळे माशांचाही मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. हैद्राबादच्या 'इंडियन नॅशनल सेंटर फाॅर आॅशन इन्फाॅर्मेशन सर्विस' आणि अमेरिकेच्या 'नॅशन आॅशन अॅण्ड़ ऍटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन' (एनओएए) या दोन्ही संस्थांमधील शास्त्रज्ञांंनी मिळून अरबी समुद्राचा अभ्यास केला. २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासाच्या अहवालामध्ये अरबी समुद्रात वाढणाऱ्या 'बायोलूमिनेसेन्ट अॅल्गे'मुळे (नोक्टीलिका) मासे मरत असल्याची नोंद करण्यात आली होती.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.