कोकण किनारपट्टीवर दिसू लागली समुद्री कासवे; विणीच्या हंगामाला लवकरच सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2020   
Total Views |

sea turtle_1  H


कोकणात 'नोव्हेंबर ते मार्च' हा सागरी कासवांच्या विणीचा हंगाम

मराठी (विशेष प्रतिनिधी) - कोकणातील सागरी परिक्षेत्रात समुद्री कासवे दिसू लागली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदा निसर्ग चक्रीवादळामुळे कासवांच्या 'अंडी उबवणी केंद्रां'चे (हॅचरी) नुकसान झाले. म्हणूनच यंदा या हॅचरी उभारण्यासाठी लागणारा खर्च 'कांदळवन कक्षा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून देण्यात येणार आहे. 
 
 
कोकणातील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ किनाऱ्यांचा समावेश आहे. 'नोव्हेंबर ते मार्च' हा सागरी कासवांच्या विणीचा हंगाम आहे. या पार्श्वभूमीवर सध्या कोकणातील सागरी परिक्षेत्रात समुद्री कासवांचे दर्शन घडत आहे. गेल्या आठवड्यापासून वेळासच्या समुद्र किनाऱ्यानजीक आॅलिव्ह रिडले प्रजातीची कासवे पोहोताना दिसत असल्याची माहिती कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी दिली. तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरीतील गावखडीच्या सागरी पट्टयामध्ये मच्छीमारांना मोठ्या संख्येने कासवे पाण्यावर पोहोताना दिसत असल्याचे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी सांगितले. थंडीचा हंगाम हा सागरी कासवांच्या विणीसाठी पोषक असतो. गेल्या काही दिवसांपासून गारवा वाढल्याने लवकरच मादी 'आॅलिव्ह रिडले' कासवे कोकणातील किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी दाखल होतील, अशी शक्यता उपाध्ये यांनी व्यक्त केली.
 
 

sea turtle_1  H 
(दोन दिवसांपूर्वी मोहन उपाध्ये यांनी वेळासच्या समुद्र किनाऱ्याजवळ टिपलेला कासवाचा फोटो)
 
सागरी कासव विणीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कासवमित्रांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. दापोली, श्रीवर्धन आणि रत्नागिरीच्या वन कार्यालयांमध्ये या कार्यशाळा पार पडल्या. यामध्ये प्रत्यक्ष किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धनाचे काम करणाऱ्या कासवमित्रांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कासवमित्रांनी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींना निसर्ग चक्रीवादळामुळे अंडी उबवणी केंद्राचे झालेल्या नुकसानाची समस्या सांगितली. त्यावर तोडगा म्हणून प्रादेशिक वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून ही केंद्र बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या सामुग्रीच्या खर्चाचा प्रस्ताव मागविल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. यंदा हा खर्च 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अंडी व घरटय़ांची जपणूक

समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरटय़ांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला हॅचरी म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खडय़ाप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@