असे कधी ऐकायला मिळेल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020   
Total Views |

conflict_1  H x
 
 
 
 
गिरीश प्रभुणे यांच्या गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रकाशित एका लेखात नागपूरजवळील शेषनगर परिसरात पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्याची घटना दिली आहे. ‘अत्याचाराच्या घटनेमुळे एक लाख पारधी इस्लाम धर्म स्वीकारणार’ अशी बातमी तेव्हा प्रसिद्ध झाली. पुढील घटनाक्रमांचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे लेख वाचतानाच मन भूतकाळात गेले आणि त्यावेळचे घटनाप्रसंग आठवू लागले.
 
 
 
 
भटके-विमुक्तांच्या काही वस्त्या-पाड्यांवर जेव्हा मी प्रवास केला, तेव्हा सोलापूरजवळील एका वस्तीतील काही भटके आणि विमुक्त ख्रिश्चन झाल्याचे लक्षात आले. मी, जेव्हा त्यांच्या वस्तीवर गेलो, तेव्हा त्यांनी येशूचे एक भजन मला गाऊन दाखवले. पुण्याजवळील दापोली चर्चमधून त्यांना दीक्षा दिल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांच्याशी या विषयावर मी काहीच बोललो नाही. पण, नंतर सहा महिन्यांतच या सर्व बांधवांचे ख्रिस्ती भजन बंद झाले आणि ते पुन्हा आपल्या देवीदेवतांची पूजा करू लागले. आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून हा बदल घडवून आणला. तेव्हापासून मनात एक प्रश्न कायमचा घर करून असतो. आपला सनातन हिंदू धर्म सोडून परधर्मात जाण्याची इच्छा समाजातील तळागाळातील वर्गाला का होते? दलित समाजाचा विचार केला, तर मातंग समाजात आजही ख्रिस्तीकरणाचे प्रमाण भीती वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. मातंग ही तशी लढवय्यी जमात आहे. धर्मासाठी इतिहासकाळात त्यांनी केलेले बलिदान न विसरता येण्यासारखे आहे. लहुजी साळवे वस्ताद यांच्या तालमीत महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक आणि वासुदेव बळवंत फडके शरीर मजबूत ठेवण्यासाठी जात असत. लहुजी साळवे हे मातंग, एका अर्थाने ते या तिघांचे गुरू होते. अशी ही श्रेष्ठ परंपरा आहे, तरीही धर्मांतरे का होतात? तत्त्वज्ञानाच्या पातळीवर विचार केला, तर हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाशी बरोबरी करेल असे ख्रिस्ती धर्म तत्त्वज्ञान नाही आणि इस्लामी तत्त्वज्ञान तर मुळीच नाही. उपनिषद आणि गीता यातून तत्त्वज्ञानाची जी उंची गाठली आहे त्याच्या पहिल्या, दुसर्‍या पायरीपर्यंतदेखील हे धर्म नाही आहेत. असे असताना आपला धर्म सोडण्याची बुद्धी का होते? एखादाच तौलनिक अभ्यास करून परधर्मात जाण्याचा निर्णय करीत असतो. सामान्य माणसांकडे अशी तौलनिक अभ्यास करण्याची क्षमता नसते. तेवढा त्यांच्या बुद्धीचा विकासही झालेला नसतो, मग ते प्रलोभनाला बळी पडून आपला सनातन धर्म सोडतात. हिंदू समाजापुढची सध्याची ही एक ज्वलंत समस्या आहे.
 
 
 
नागपूरजवळील शेष नगरातील पारधी समुदायाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची घोषणा केली. तिची अंमलबजावणी केली नाही, हा भाग वेगळा आणि ती त्यांनी केलीही नसते, हेदेखील तेवढेच खरे. पण, त्यांना अशी घोषणा का करावीशी वाटली? अशी उलटी घोषणा भारतात का होत नाही? की आम्ही आता हिंदू होणार आहोत. या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चन वंशाने, संस्कृतीने हिंदूच आहेत. त्यातील एखादा समुदाय अशी घोषणा का नाही करीत की, आम्ही सामूहिकपणे हिंदू होणार आहोत? या प्रश्नाचे उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू समाजातून परधर्मात जाणार्‍यांची संख्या खूप मोठी असते. ‘लव्ह जिहाद’च्या मार्गाने मुस्लीम तरुण हिंदू मुलींना फूस लावून मुसलमान करतात आणि गरिबांच्या वस्त्या, पाड्यांत सतत जाऊन त्यांना अन्न-धान्य, औषधे देऊन आणि अन्य प्रलोभने दाखवून त्यांचे ख्रिस्तीकरण करण्यात येते. आपण ख्रिश्चन किंवा मुसलमान झालो असता आपोआप काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, असे वातावरण बनविले गेलेले आहे. ख्रिस्ती आणि मुस्लीम हे संघटित असतात आणि त्या समाजातील कोणावरही जर अन्याय, अत्याचार झाला तर सर्व समाज एकवटून त्याच्या मागे उभा राहतो. चर्चमधून आवाहन करून ख्रिस्ती बांधव मोर्चासाठी एकत्र येतात आणि आपला निषेध व्यक्त करतात. मुसलमान समाज त्याच्या स्वभावाप्रमाणे वेगळ्या प्रतिक्रिया देतो. याला ‘सामाजिक संरक्षण’ म्हणतात. हे सामाजिक सुरक्षा कवच हिंदू समाजाचे म्हणावे तितके सशक्त झालेले नाही. आपण जातीत विभागलेलो असतो. एका जातीतील कोणावर अन्याय, अत्याचार झाल्यास तो विषय त्या जातीचा होतो. ‘ते बघून घेतील, आपल्याला काय त्याच्याशी?’ अशी भावना होते. म्हणून आपल्या समाजातील वंचित घटक तसे एकांकी असतात. त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारचे सामाजिक संरक्षण नसते. अन्यवेळीही इतर समाजातील लोक त्या वस्तीत जात नाहीत, त्यांच्याशी संपर्क ठेवत नाहीत, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा विषय येत नाही.
 
 
 
आपले धर्माचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, संत-महंत अशा वस्त्यांत फारसे जात नाहीत. यांच्या उलट ख्रिश्चन पाद्री कोणत्याही वस्तीत जातो, मुल्ला-मौलवीदेखील कोणत्याही वस्तीत जातो. आमचे कीर्तनकार सुखवस्तू वस्तीत कीर्तन करण्यात आनंद मानतात. अधिक झाले तर टीव्हीच्या एका शोवर. जिथे त्याची गरज आहे, त्या वस्त्यांत गेले पाहिजे, त्यांच्यात मिसळले पाहिजे, त्यांना आपले म्हटले पाहिजे आणि त्यांना आपला धर्म समजावून सांगितला पाहिजे. कथा-कीर्तनाच्या माध्यमातून हे काम झाले पाहिजे. तसेच सवर्ण वस्त्यांतून सवर्णांना तुमची सामाजिक जबाबदारी कोणती आहे? ही जबाबदारी राष्ट्रीय कशी आहे, सामाजिक सुरक्षा कवच मजबूत करणे का आवश्यक आहे? हेदेखील कथा-कीर्तनांतून सांगितले पाहिजे. त्याच त्याच पारंपरिक कथा आणि त्याही पाप-पुण्याशी जोडलेल्या याने सामाजिक सुरक्षा कवच निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा कवचाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे सामान्यातील सामान्य माणसाला सन्मानाची तेवढीच भूक आहे. मनुष्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये त्याच्या मनुष्यपणाचा सन्मान ही सर्वात मोठी भावनिक गरज आहे. माणसाला जनावराप्रमाणे वागविता येत नाही, तसेच माणसाला गुलाम करता येत नाही. त्याला सदोदित अपमानित अवस्थेत ठेवता येत नाही. या प्रकारची त्याला वागणूक देणे, म्हणजे त्याच्यातील मनुष्यत्वाचा घोर अपमान करणे होय. यासाठी प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे आणि आपल्या धार्मिक तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर ‘देह देहाचे मंदिर आहे.’ मनुष्याचा अपमान म्हणजे मनुष्यरूपी देहात निवास करणार्‍या परमेश्वरी तत्त्वाचाच अपमान आहे. याविषयी सतत प्रबोधन होण्याची गरज आहे. जो समाज सुरक्षा देत नाही, सन्मान देत नाही, त्या समाजात कशासाठी राहायचे? असा विचार जर कोणाच्या मनात आला तर त्याचा दोष त्या व्यक्तीला देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण करणारा जो समाज आहे, तो या द्वेषाचा धनी आहे.
 
 
 
समाजसुधारणेचे विषय कालानुरूप बदलत जातात. एकेकाळी विधवा विवाह, बालविवाह, स्त्रीशिक्षण इत्यादी विषय समाजसुधारणेचे विषय झाले होते. आजचे विषय वेगळे आहेत. आजच्या विषयात सामाजिक सुरक्षा, सामाजिक सन्मान आणि सामाजिक समरसता हे विषय अग्रक्रमाचे झालेले आहेत. हे सर्व विषय दलित, वंचित, उपेक्षित समाजघटकांचे कमी आणि प्रबुद्ध समाजाचे अधिक आहेत. कारण, या विषयाची पूर्तता करण्याची ऐतिहासिक जबाबदारी या समाजाच्याच खांद्यावर आहे. सामाजिक सुरक्षा कवच उर्वरित समाजाने निर्माण करायचे, सामाजिक सन्मान उर्वरित समाजाने द्यायचा आहे. समरसतेचा अनुभव उर्वरित समाजाने द्यायचा आहे. या काळातील हे सर्वात महत्त्वाचे विषय आहेत आणि हे सर्व विषय समाजाच्या स्थैर्याशी, सामाजिक सद्भावाशी आणि सामाजिक एकोप्याशी निगडित आहेत. ज्या ज्या वेळी एखाद्या दलित किंवा शोषित वस्तीवर अथवा स्त्री-पुरुषांवर हल्ला होतो, त्यावेळी तो प्रश्न कायदा आणि व्यवस्थेचा राहत नाही. मूलगामी प्रश्न असा होतो की, याच वस्तीवर आणि याच लोकांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती का निर्माण होते? ती कोणामुळे निर्माण होते? कायदे एवढे कडक असूनही त्याचे भय हल्ला करणार्‍यांना का वाटत नाही? प्रश्नांची उत्तरे शोधताना मग लक्षात येते की, हा विषय खूप खोलवर जाऊन काम करण्याचा आहे. समाजाच्या मानसिक परिवर्तनाचा विषय आहे आणि त्यासाठी रक्तचित्ताने काम करणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. आपला समाज ती पुरी करेल आणि आपल्या पराक्रमाने अशी परिस्थिती निर्माण करेल की, ‘हो, आम्हाला हिंदू व्हायचे आहे!’ असेही स्वर ऐकू येतील.
 
 
@@AUTHORINFO_V1@@