वैश्विक गांधी

    दिनांक  01-Oct-2020 23:18:24   
|

 

mahatma gandhi_1 &nb

 

थोर पुरुषाचे जातीकरण करणे किंवा त्याच्या विचारांचा ‘संप्रदाय’ करणे, हे एकादशीला चिकन खाण्यापेक्षाही भयानक पाप आहे. या पापात आपण कशाला सहभागी व्हायचे! ज्यांना व्हायचे त्यांना खुशाल होऊ द्यावे! गांधीजी कोणत्या जातीत जन्मले, त्यांचा गांधीवाद कोणता आहे, यापैकी कशाचा विचार न करता देशाला आणि मानवजातीला गांधीजींनी काय दिले, याचा विचार केला पाहिजे. 

 


 


आपल्या देशात थोर पुरुषांची विभागणी त्यांच्या जन्मजातीत किंवा त्यांच्या विचारधारेत केली जाते. महात्मा गांधी त्याला अपवाद नाहीत. काही वर्षांपूर्वी अरुंधती रॉय यांनी 'Annihilation of caste' हे पूज्य बाबासाहेबांचे पुस्तक स्वतःची प्रस्तावना लिहून प्रकाशित केले. या प्रस्तावनेत गांधीजींचा उल्लेख ‘बनिया’ असा करण्यात आला. गांधीजी गेल्यानंतर गांधी विचारांचा संप्रदाय झाला. ‘संप्रदाय’ झाला की ‘सांप्रदायिकता’ निर्माण होते. या सांप्रदायिक संप्रदायवाद्यांनी गांधीजींचा उपयोग संघ आणि संघविचारधारा यांना ठोकण्यासाठी सुरू केला. सर्वाधिक उपयोग सावरकरांना बदनाम करण्यासाठी करण्यात आला. यामुळे हिंदू विचारधारेतील माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता गांधीजींबद्दल चांगले लिहितो तेव्हा, ‘हा गांधाळलेला’ अशी त्याच्यावर टीका सुरू होते. हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचे नाव घेणे म्हणजे एकादशीला चिकन खाणे, इतके घोर पापाचे हे काम झाले, असा समज तयार केला गेला आहे. थोर पुरुषाचे जातीकरण करणे किंवा त्याच्या विचारांचा ‘संप्रदाय’ करणे, हे एकादशीला चिकन खाण्यापेक्षाही भयानक पाप आहे. या पापात आपण कशाला सहभागी व्हायचे! ज्यांना व्हायचे त्यांना खुशाल होऊ द्यावे! गांधीजी कोणत्या जातीत जन्मले, त्यांचा गांधीवाद कोणता आहे, यापैकी कशाचा विचार न करता देशाला आणि मानवजातीला गांधीजींनी काय दिले, याचा विचार केला पाहिजे.

 

 


पदार्थ विज्ञानशास्त्रातील थोर शास्त्रज्ञ गांधीजींविषयी म्हणतात, “हाडामासाचा असा माणूस या पृथ्वीतलावर येऊन गेला, यावर भावी पिढ्या विश्वासदेखील ठेवणार नाहीत.” महाभयानक अणुबॉम्बच्या निर्मितीप्रक्रियेतील आईनस्टाईन हे थोर शास्त्रज्ञ आहेत. विध्वसांपेक्षा सर्जन कार्य करणार्‍या महात्मा गांधींविषयी त्यांना पराकोटीचा आदर आहे. याचे कारण असे की, गांधीजी विश्वातील ते महात्मा होऊन गेले की, जे अत्यंत साधेपणाने राहिले, समाजावर निरपेक्ष प्रेम करीत राहिले आणि हिंदू जीवनमूल्ये मरेपर्यंत जगत राहिले. आज गांधीजींची प्रतिमा,‘वैश्विक गांधी’ अशी झालेली आहे. विश्व गांधीजींच्या जातीकडे बघत नाही. कारण, ते पुरोगामी आणि ‘रॅशनल’ नाही. विश्व गांधीजींचा विचार ‘गांधीवाद’ या चौकटीत करीत नाही. गांधी म्हणजे, अन्यायाशी शस्त्रविहिन मार्गाने, आत्मबलाच्या साहाय्याने लढणारा महामानव म्हणून विश्व पाहते. राज्यसत्ता सर्वशक्तिमान असते. त्या राज्यसत्तेशी सामान्य माणूस शस्त्र घेऊन लढू शकत नाही. गांधीजींनी अशा दुर्बल माणसाच्या हातात आत्मबलाचे ब्रह्मास्त्र दिले.

 

 


अमेरिकेत काळ्या लोकांवर सर्व प्रकारचे अन्याय केले जात. मानवी अधिकार मिळविण्याच्या त्यांच्या संघर्षाचा प्रदीर्घ लढा आहे. १९६४ साली या लढ्याला टोकदार करण्याचे काम मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी केले. मॉन्टगोमेरी या शहरात बसमधील काळे आणि गोरे यांच्या विभक्त आसनांना विरोध करण्यासाठी सत्याग्रह करण्यात आला. त्याचे नेतृत्व मार्टिन ल्यूथर किंग यांनी केले. ३८१ दिवस बसेसवर बहिष्कार घालण्यात आला. या काळात गोर्‍या लोकांनी खूप हिंसाचार केला. परंतु, सत्याग्रह करणार्‍या कृष्णवर्णीयांनी माघार घेतली नाही. अन्याय सहन केले. मैलो न् मैल पायी चालत ते कामाच्या ठिकाणी गेले. मार्टिन ल्यूथर किंग म्हणाले की, “माझी सत्याग्रहाची प्रेरणा गांधीजी आहेत.” १९६४ साली कायदा झाला आणि अमेरिकेतील काळे-गोरे हा भेद संपला.

 

 


मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात, “प्रेमाची ख्रिश्चन संकल्पना गांधीजींच्या हिंसेच्या तत्त्वज्ञानातून व्यक्त झाली. येशूने विचार दिला, गांधीजींनी मार्ग दाखविला. वाईट गोष्टींचा प्रतिकार तशाच वाईट गोष्टी करून करायचा नाही. अहिंसा म्हणजे सर्वांवर सारखेच प्रेम करायचे.” महात्माजींची ही विचारसरणी मार्टिन ल्यूथर किंग यांनी स्वीकारली. नेल्सन मंडेला ही आज एक व्यक्ती राहिलेली नसून, वंशवादाविरुद्ध यशस्वी लढा देणारा तो एक चेहरा आहे. अन्यायाविरुद्ध ज्यांना ज्यांना लढा द्यायचा आहे, त्यांच्या दृष्टीने हा एक आश्वासक चेहरा आहे. नेल्सन मंडेला यांना २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. अगोदर त्यांचा लढा हिंसक होता. नंतर त्यांनी गांधीजींच्या मार्गाने चळवळ चालविली. दक्षिण आफ्रिकेतील गोर्‍यांची वांशिक राजवट त्यांनी समाप्त केली. काळे आणि गोरे यांच्यात दंगली झाल्या नाहीत. ‘मानव’ या भावनेने हे दोन्ही समाज दक्षिण आफ्रिकेत एकत्र नांदत आहेत. 
 
 
गांधीजींविषयी नेल्सन मंडेला म्हणतात, “ज्यावेळी जगात हिरोशिमा आणि नागासाकीसारख्या भयानक हिंसक घटना घडल्या, त्या काळात गांधीजींनी अहिंसेचा विचार मांडला. अहिंसेचा विचार त्यांनी असा मांडला, ज्या काळात नैतिकमूल्ये हद्दपार झालेली होती. गांधीजींची जन्मभूमी भारत होती, तर दक्षिण आफ्रिका त्यांची कर्मभूमी होती. दोन्ही देशाच्या मुक्तीलढ्यात त्यांचे योगदान मोठे आहे. असहकारच्या त्यांच्या चळवळीने हे प्रस्थापित केले की, आम्ही जर आमच्यावर अधिकार गाजविणार्‍याशी सहकार्य केले तरच ते आमच्यावर अधिकार गाजवू शकतात.” नेल्सन मंडेला यांनी आंधळेपणाने गांधीजींच्या मार्गाचा स्वीकार केला नाही. राष्ट्रनेत्याला देश, काल, परिस्थितीनुसार लढ्याचा मार्ग ठरवावा लागतो. आवश्यक त्या ठिकाणी हिंसेच्या मार्गाचा नेल्सन मंडेला यांनी पुरस्कारदेखील केलेला आहे.

 

 


गांधीजींची वैश्विकता अशी फार मोठी आहे. ती अणुशास्त्रज्ञापासून ते लेकवाल्याच्या सारख्या कामगार नेत्याला भुरळ घालणारी ठरते. ख्रिश्चन जगतातील अनेक लोक त्यांच्या प्रतिमेत येशू ख्रिस्ताला पाहत. जगाचा विचार करता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपण सर्वजण स्फोटक दारूच्या कोठारावर बसलेले आहोत. विस्तारवादी चीनच्या आक्रमक हालचालींनी जग युद्धाच्या कडेवर येऊन उभे आहे. उद्या जर युद्ध सुरू झाले, तर ते संहारक युद्ध ठरण्याची शक्यता आहे. जगाला विनाशापासून वाचविण्याची ताकद फक्त नैतिक शक्तीत आहे. ही नैतिक शक्ती भारताकडे आहे. प्राचीन काळी या नैतिक शक्तीचे प्रकटीकरण गौतम बुद्धांनी केले. आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी केले आणि १९४८ पर्यंत महात्मा गांधी यांनी केले. बुद्ध, विवेकानंद आणि गांधी ही भारताची नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. तिचा अंगीकार आपण भारतीयांनी करायचा आहे. सगळा देशच बुद्ध, विवेकानंद आणि गांधी झाला तर जी आध्यात्मिक शक्ती प्रकट होईल, ती हजारो अणुबॉम्बची राख करणारी ठरू शकते. गांधीजींच्या जन्मदिनी अशा प्रकारे त्यांचे स्मरण माझ्यासारखा हिंदुत्ववादी कार्यकर्ता करतो. काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही. प्रश्न आवडीनिवडीचा नसून महापुरुषाची महानता समजून घेण्याचा आहे, असे मला वाटते.

 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.