महाराष्ट्रात प्रथमच आढळला 'हा' सागरी सस्तन प्राणी

    दिनांक  14-Jul-2019   


 

 
'कुवियर्स बीकड् व्हेल'चे राज्याच्या किनाऱ्यावर प्रथमच दर्शन

 
 
मुंबई ( अक्षय मांडवकर) : राज्याच्या किनाऱ्यावर प्रथमच अत्यंत दुर्मीळ अशा 'कुवियर्स बीकड् व्हेल'चे दर्शन घडले आहे. ९ जुलै रोजी हा सागरी सस्तन प्राणी रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आला होता. तज्ज्ञ सागरी संशोधकांनुसार खोल समुद्रात वास्तव्यास असणारा हा जीव आजवर केवळ गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आल्याची नोंद आहे. त्यामुळे हा दुर्मीळ प्रजातीचा व्हेल  प्रथमच राज्याच्या किनाऱ्यावर आढळल्याने 'कांदळवन संरक्षण विभागा'कडून ( मॅंग्रोव्ह सेल) त्याच्या सांगाड्याचे जतन करण्यात येणार आहे.
 
 

 
 
 

दिवेआगर वासियांना सागरी परिसंस्थेमध्ये खोल समुद्रात वास्तव्यास असणाऱ्या दुर्मीळ अशा 'कुर्वियर्स बीकड् व्हेल'चे दर्शन घडले आहे. ग्रामस्थांना ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आल्याचे दिसून आले. दिवेआगरचे सरपंच उदय बापट यांनी लगोलग व्हेलसाऱखा दिसणारा जीव किनाऱ्यावर वाहून आल्य़ाचे मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस आणि प्रांत अधिकाऱ्यांना कळविले. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकत या सागरी जीवाची पाहणी करण्यासाठी येण्यास नकार कळविला. त्यामुळे पोलीस आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या मदतीने जेसीबी मागवून या जीवाला किनाऱ्यावरच साधारण ८ फूट खड्डा करुन त्यात पुरल्याची माहिती बापट यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. हा जीव लांबीला साधारण १० ते १२ फूट असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 

 
 
 

त्या दरम्यान वेळासचे कासवमित्र मोहन उपाध्ये श्रीवर्धनला गेले असता, त्यांना या घटनेची माहिती मिळाली. वाहून आलेल्या या व्हेलचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांना हा जीव वेगळा असल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच संबंधीत माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांना दिली. महत्वाचे म्हणजे, दिवेआगरच्या किनाऱ्यावर आढळलेला हा सागरी जीव प्रथमच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वाहून आल्याचे उघड झाले आहे. हा जीव 'टूथेड् व्हेल' या गटातील 'कुवियर्स बीकड् व्हेल' नामक सागरी सस्तन प्राणी असल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञ संशोधिका दिपानी सुतारिया यांनी दिली आहे. तर हा सस्तन प्राणी खोल समुद्रात वास्तव्यास असल्याने त्याचे दर्शन दुर्मीळ असल्याचे तज्ज्ञ सागरी संशोधक मिहीर सुळे यांनी सांगितले. 'मरिन मॅमल नेटवर्क आॅफ इंडिया' या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नोंदीप्रमाणे 'कुवियर्स बीकड् व्हेल' २०१४ मध्ये तामिळनाडू आणि २०१५ मध्ये गुजरातच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आला होता. तर २०१५ मध्येच कर्नाटकच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या या व्हेलबद्दल एक संशोधन पत्रिका उपलब्ध आहे. त्यामुळे हा सस्तन प्राणी प्रथमच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वाहून आल्याच्या बाबीला सुतारिया यांनीही दुजोरा दिला आहे. 

 

 
 
 

'कुवियर्स बीकड् व्हेल' साधारण समुद्राच्या २,९९२ मीटर खोलीपर्यंत वास्तव्यास असल्याची माहिती 'वाईल्डलाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया'चे सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांनी दिली. तसेच हा सागरी सस्तन प्राणी खोल समु्द्रातील स्क्विड आणि माशांवर उपजिविका करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामधील मादी ८.५ मीटर व नर ९.८ मीटर लांबीपर्यत वाढतो. त्यांचे वजन साधारण ३ हजार किलोपर्यंत असते. हा सस्तन प्राणी २ ते ७ जणांच्या छोट्या गटात राहणे पसंत करतो. याचे वास्तव्य साधारणपणे जगातील सर्वच सागरी परिक्षेत्रात आढळते.


 

" दिवेआगरच्या किनाऱ्यावर आढळलेल्या सागरी सस्तन प्राण्याला ग्रामस्थांनी पुरले आहे. तरी देखील आम्ही या सागरी सस्तन प्राण्याच्या त्वचेचा नमुना घेऊन त्याचे परिक्षण करण्याच्या प्रयत्नात आहोत. शिवाय नव्याने उभारण्यात येणाऱ्या सागरी जीवांच्या संग्रहालयासाठी त्याच्या सांगड्याचे जतन करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी आहे त्याच परिस्थितीत त्याला काही वर्षांसाठी पुरलेले ठेवून त्यानंतर त्याच्या सांगाडा बाहेर काढण्यात येईल." - एन. वासुदेवन, मुख्य वनसंरक्षक, मॅंग्रोव्ह सेल

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat