महाराष्ट्राच्या वनक्षेत्रात ९६ चौ.किमी आणि कांदळवनक्षेत्रात १६ चौ.किमीने वाढ !

    दिनांक  30-Dec-2019 12:54:29   
|

tiger_1  H x W:

२०१९ च्या वन सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्राच्या वनक्षेत्रात २०१७ च्या तुलनेत ९६ चौ.किमीने वाढ झाली आहे. आज प्रकाशित झालेल्या वन सर्वेक्षण अहवाल, २०१९ च्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. वनक्षेत्राबरोबर राज्याला लाभलेल्या कांदळवनक्षेत्रातही १६ चौ.किमीने वाढ झाल्याची माहिती या अहवालातून उघड झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या वनक्षेत्रातही गेल्या दोन वर्षांमध्ये ३,९७६ चौ.किमीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

भारतीय वनाचे सर्वेक्षण करण्याचे काम १९८७ पासून सुरू आहे. केंद्र सरकारच्या 'भारतीय वन सर्वेक्षण' विभागाकडून या संदर्भातील काम करण्यात येते. हा विभाग दर दोन वर्षांनी भारतातील वनांचे राज्यानुरुप सर्वेक्षण करुन त्याबाबतचा अहवाला प्रकाशित करतो. आज दिल्लीत केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २०१९ चा वन सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी भारताच्या वनक्षेत्रात २०१७ च्या तुलनेत वाढ झाल्याचे जावडेकर यांनी सांगितले. या अहवालामधून महाराष्ट्रात वनक्षेत्रात २०१७ च्या तुलनेत वाढ झाल्याची महत्त्वपूर्ण बाब उघड झाली आहे. २०१७ साली राज्याच्या ३ लाख ७ हजार ७१३ चौ.किमी भौगोलिक क्षेत्रामधील ५० हजार, ६८२ चौ.किमी क्षेत्र वनाने आच्छादित होते. गेल्या दोन वर्षात त्यामध्ये ९६ चौ.किमीची भर पडली आहे. २०१९ च्या वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात आता ५० हजार ६८२ चौ.किमी क्षेत्र वनाच्छादित आहे.

 

वनक्षेत्राबरोबर राज्याच्या कांदळवनाने आच्छादलेल्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. २०१७ च्या अहवालानुसार राज्याच्या किनारपट्टीवरील ३०४ चौ.किमी क्षेत्रावर कांदळवने होती. आता त्यामध्ये १६ चौ.किमीने वाढ झाली असून राज्यातील ३२० चौ,किमी क्षेत्र कांदळवनांनी आच्छादलेले असल्याची माहिती २०१९ च्या अहवालामधून उघड झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील कांदळवन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर आहे. कांदळवन संरक्षण विभागाने (मॅंग्रोव्ह सेल) गेल्या काही वर्षात हाती घेतलेल्या कांदळवनांच्या वृक्षारोपन मोहिमेमुळे कांदळवनक्षेत्रात वाढ झाली आहे. 

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.