सुट्टीचा प्लॅन करताय ? चला तर कोकणातील 'काळिंजे'ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019   
Total Views |

 

tiger_1  H x W:

 


मॅंग्रोव्ह कयाकिंग, पक्षीनिरीक्षण, पाणमांजरांचे दर्शन आणि बरचं काही....


मुंबई (अक्षय मांडवकर) - निसर्गप्रेमी आणि भटक्यांना कांदळवनांमधील समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची संधी राज्याच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गावात उपलब्ध करुन दिली आहे. कांदळवनांमध्ये बोट सफर, पक्षीनिरीक्षण, समु्द्र किनारा व पाणथळ भ्रमंती आणि महाराष्ट्रात प्रथमच मॅंग्रोव्ह कयाकिंग सारख्या उपक्रमांचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी गावातीलच ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करुन देण्यात आले आहे. येत्या काही वर्षात हा उपक्रम 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'अंतर्गत राज्यातील जैवविविधतेने संपन्न असलेल्या किनारी गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.

 

tiger_1  H x W: 
 

गेल्या काही वर्षांपासून 'मॅंग्रोव्ह सेल' महाराष्ट्राच्या किनारी गावांमधील लोकांना कांदळवनांवर आधारित रोजगार निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'अंतर्गत 'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजने'च्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये खेकडा-कालवे पालन, शोभिवंत मत्स्यपालन, निसर्ग पयर्टन अशा काही उपक्रमांचा समावेश आहे. निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने कांदळवनांमध्ये परिपूर्ण जैवविविधता असलेल्या जागा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत आता श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गाव पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. येथील १९० हेक्टरवर पसरलेल्या कांदळवनांमध्ये गावकऱ्यांच्या पुढाकाराने 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या माध्यमातून निसर्ग पर्यटनाला सुरुवात झाल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह सेल'च्या उप-वनसंरक्षक निनू सोमराज यांनी दिली. हा उपक्रम दापोलीतील आंजर्ले, रत्नागिरीतील सोनगाव आणि दिवेआगरसह भविष्यात आणखी काही किनारी गावांमध्ये सुरू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

tiger_1  H x W: 
 

कशी असेल 'काळिंजे'ची निसर्ग सफर

श्रीवर्धन तालुक्यापासून १३ किमी अंतरावरील काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले आहे. याठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. या परिसरात कांदळवनांच्या ११ प्रजाती आढळत असून पक्ष्यांच्या सुमारे ८० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वर्गीय नर्तक), पाईड हाॅनबिल (महाधनेश), ब्लॅक कॅप किंगफिशर (काळ्या टोपीचा धीवर), रेड आणि ग्रीन शॅंक या पक्ष्यांचा समावेश आहे. तसेच पाणमांजरांचा अधिवास या परिसरात पाहावयास मिळतो. महत्त्वाचे म्हणजे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी असून तिथे कोल्हे व रानडुंगरांचे अस्तिव आहे. त्यामुळे येथील जैवविविधता लक्षात घेऊनच निसर्ग पर्यटनाला सुरुवात केल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'चे सहाय्यक संचालक (निसर्ग पर्यटन) वंदन झवेरी यांनी दिली. याठिकाणी पर्यटकांना कांदळवनांची सफर, पक्षीनिरीक्षण, समुद्र किनारा व पाणथळ भ्रमंतीबरोबरच कांदळवनांमध्ये कयाकिंग देखील करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामस्थच पर्यटकांचे मार्गदर्शक होणार असल्याचे, झवेरी म्हणाले. या संपूर्ण उपक्रमांसाठी (जेवण व निवासासह) पर्यटकांकडून प्रतिदिवस ८०० ते १२०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. ज्याचा आर्थिक फायदा ग्रामस्थांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९६७३८५५९९७ (संदेश अंभोरे) आणि ९२७२८८२४८२ (विक्रांत गोगरकर) यांच्याशी संपर्क साधावा.

@@AUTHORINFO_V1@@