भारताचा ’बटरफ्लायमॅन’ !

    02-Nov-2019   
Total Views | 150



आपल्या लेखणीतून भारतातल्या फुलपाखरांविषयी विपुल लेखन करून खऱ्या अर्थाने त्यांचा उलगडा करणाऱ्या ‘बटरफ्लायमॅन’ आयझॅक डेव्हिड केहिमकर यांच्याविषयी...

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  निसर्गाच्या अद्भुत कथा लेखणीतून उतरविण्याकरिता निसर्गाचा वरदहस्त असावा लागतो. या माणसावर जन्मत: निसर्गाचा वरदहस्त होता. लिखाणाच्या निमित्ताने त्यांची फुलपाखरांशी गट्टी जमली आणि त्यांच्या रंगीबेरंगी विश्वात हा 'माणूस' रममाण झाला. फुलपाखरांनीच त्यांना निसर्गामधील अनेक तत्त्वे शिकवली. निसर्गवाचनाची सवय लावली. ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेने (बीएनएचएस) निसर्गमय जगण्याचे शिक्षण दिले. ’जीवशास्त्र’ विषयातील शिक्षणाचा गंध नसताना त्यांनी स्वशिक्षणाने निसर्गविद्या प्राप्त केली. आज हा माणूस भारताचा ’बटरफ्लायमॅन’ म्हणून ओळखला जातो. या माणसाचे नाव आयझॅक केहिमकर...
 
 

 
 
 

जुन्या मुंबईतील गोवंडी गावात आयझॅक यांचा दि. २९ मे, १९५७ रोजी जन्म झाला. आई-वडील दोन्ही सुशिक्षित. वडील रिझर्व्ह बँकेत नोकरीला, तर आई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका. त्यामुळे केहिमकरांना उत्तम शिक्षण मिळाले. तसेच त्यांच्यामध्ये निसर्गाची आवड रुजायला आई-वडीलच कारणीभूत ठरले. आयझॅकना कोंबड्या, मासे आणि पक्षी पाळण्यासाठी प्रोत्साहन दिले. बालपण आगरी-कोळ्यांच्या वस्तीत गेल्याने त्यांना मासेमारीचा छंद जडला. मासे पकडण्याच्या निमित्ताने पाणसापांची पर्यायाने सरपटणार्‍या प्राण्यांची ओळख झाली. वडिलांनी प्राण्यांवरील पुस्तके वाचण्याचा नाद लावून दिला. वरकरणी आपल्याला या गोष्टी छोट्या वाटत असल्या, तरी माणसाची भविष्यातील अभिरूची ठरविण्यासाठी त्या महत्त्वाच्या असतात. केहिमकरांच्या बालपणीच्या या निसर्गमय जीवनाचे पुढे आवडीत रुपांतर झाले. मात्र, ’जीवशास्त्र’, ’वनस्पतीशास्त्रा’सारख्या विषयात शिक्षण घेण्यामध्ये ते परावर्तित होऊ शकले नाही.

 

 
 

केहिमकरांनी कला शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीत गणित विषयात कमी गुण मिळाल्याने त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही. मात्र, सुदैवाने महाविद्यालयीन वयातही त्यांची प्राणी आणि निसर्गाप्रतिची आवड शाबूत राहिली. यामागील कारण घरातील पाळीव प्राणीच होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ’विक्री’ विभागात नोकरीला सुरुवात केली. वर्षभर त्याठिकाणी नोकरी केली. १९७८ साली ’बीएनएचएस’ने मुंबईत ’सर्प प्रदर्शन’ भरविले होते. त्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता होती. याची माहिती मिळताच केहिमकरांनी ही संधी हेरली. या प्रदर्शनात महिनाभर काम केले. त्याठिकाणी मिळालेल्या अनुभवांमुळेच केहिमकरांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. यापुढे निसर्ग आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करण्याचे त्यांनी पक्के केले. ’बीएनएचएस’ने त्यांना ’साहाय्यक ग्रंथपाल’ पदाच्या नोकरीसाठी विचारणा केली. वडिलांचा पाठिंबा असल्याने ते १९७९ साली ’बीएनएचएस’मध्ये रूजू झाले. ग्रंथालयात काम करतानाच ग्रंथपालाचे शिक्षण पूर्ण केले.

 

 
 

त्यादरम्यान केहिमकरांना ग्रंथालयात अनेक दिग्गज निसर्गसंवर्धक व वन्यजीव संशोधकांना भेटण्याची संधी मिळाली. या भेटीगाठींमधून केहिमकरांच्या ज्ञानात भर पडतच होती. शिवाय दांडगा जनसंपर्कही झाला होता. त्यामुळे त्यांना ’बीएनएचएस’च्या ’जनसंपर्क अधिकारी’ पदावर रुजू करण्यात आले. १९८३ साली सरकारकडून ’बीएनएचएस’ला गोरेगाव चित्रनगरीत ’निसर्ग शिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी जागा मिळाली. या जागेबाबत माध्यमांमध्ये बर्‍याच गैरसमजुती होत्या. या गैरसमजुती थोपविण्यात केहिमकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ’सॅन्चुर एशिया’ या प्रसिद्ध मासिकात त्यांना फुलपाखरांविषयी लेख लिहिण्यासाठी विचारणा झाली आणि त्यांच्याकरिता फुलपाखरांच्या विश्वाचे दार खुले झाले. लेख लिहिण्यासाठी त्यांनी फुलपाखरांच्या निरीक्षणास सुरुवात केली. त्यासाठी घरात फुलपाखरांच्या खाद्यवनस्पती लावल्या. त्यानिमित्ताने वनस्पतीशास्त्राचेही ज्ञान मिळाले. विस्तृत माहिती मिळवून त्यांनी हा लेख लिहिला. लेख वाचून ’डब्ल्यूडब्ल्यूएफ’ संस्थेने त्यांना पुस्तक लिहिण्याची संधी दिली. या पुस्तकाच्या लिखाणाच्या निमित्ताने पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावण्यास सुरुवात केली. १९९० साली त्यांचे पहिले सहलेखक म्हणून ’बटरफ्लाईज् ऑफ इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

 
 

 
 
 

भारतातील फुलपाखरांचा सर्वव्यापी आढावा घेणार्‍या ’बुक ऑफ इंडियन बटरफ्लाईज्’ या पुस्तकाने केहिमकरांना खरी ओळख मिळवून दिली. या पुस्तकाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी दहा वर्ष खर्ची घातली. भारतात आढळणार्‍या ७३५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद केली. कोणत्याही प्रकारची वैज्ञानिक पार्श्वभूमी नसताना निरीक्षण, वाचन आणि अनुभवाच्या बळावर त्यांनी या पुस्तकात शास्त्रीय लिखाण केले. महत्त्वाचे म्हणजे, केहिमकरांना ’बटरफ्लायमॅन’ म्हणून नावलौकिक मिळाले. ’बीएनएचएस’मधील आपल्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी फुलपाखरांवरील तीन, रानफुलांचे एक आणि सागरी जीवांची ओळख करुन देणार्‍या पुस्तकाचे लिखाण केले आहे. २०१७ साली ’बीएनएचएस’मधून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी ’आय नेचरवाॅच फाऊंडेशन’ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते आता निसर्ग शिक्षणाचे धडे देत आहेत. अशा निसर्गवेड्या माणसाला दै. ’मुंबई तरुण भारत’चा सलाम!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच ..

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा ..

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील 'संन्यस्त खड्ग' नाटकाच्या प्रयोगावेळी नेमकं काय घडलं?

(Hrishikesh Joshi Post) पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुण्यात हे नाटक बंद पाडले गेले, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्याबाबत अभिनेते आणि नाटकाचे दिग्दर्शक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121