तीन वर्षात भारतातील स्थलांतरीत पक्ष्यांचे प्रवासमार्ग ‘थ्री-डी’ स्वरुपात !

    दिनांक  18-Nov-2019 23:55:10   
|
लोणावळा (अक्षय मांडवकर) - ‘केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालया’ने (एमओइएफ) देशातील पक्ष्यांच्या स्थलांतर पट्ट्याचा अभ्यास करून त्यासंबंधीच्या संवर्धनात्मक धोरणांच्या निर्मितीकरिता ’बर्ड सेन्सिटिव्हिटी मॅपिंग टूल’ अभ्यासाला मान्यता दिली आहे. ’बॅाम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) पुढील तीन वर्षांमध्ये हा अभ्यास करणार आहे. याअंतर्गत देशातील पक्षी स्थलांतराच्या ७७ अधिवासांबाबत विविध संस्थांकडे विखुरलेली माहिती एका पटलावर आणून सरतेशेवटी अ‍ॅपद्वारे त्रिमितीय (थ्री-डी) स्वरूपात मांडण्यात येईल. ही माहिती पक्ष्यांच्या स्थलांतर पट्ट्यांमध्ये उभारल्या जाणार्‍या विकास प्रकल्पांच्या निणर्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
 
 

 


पक्षी स्थलांतराच्या ’मध्य आशियाई स्थलांतर पट्ट्या’मध्ये भारताच्या ९५ टक्के भूभागाचा समावेश होता. या स्थलांतरित पट्ट्याच्या संवर्धनाबरोबरच त्यासंबंधी धोरणात्मक निर्णायाकरिता ’बीएनएचएस’ने गेल्यावर्षी पर्यावरण विभागाकडे राष्ट्रीय कृती आराखडा सादर केला होता. त्याला मान्यता मिळाली होती. गेल्या आठवड्यात या कृती आराखड्यामधील ’बर्ड सेन्सिटिव्हिटी मॅपिंग टूल’ अभ्यासाला पर्यावरण विभागाने मान्यता दिल्याची माहिती ’बीएनएचएस’चे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी ’दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. ’बीएनएचएस’कडून लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या ’पाणथळ जागा आणि स्थलांतरित पक्षी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या अभ्यासाअंतर्गत १७ राज्यांमधील स्थलांतरित पक्ष्यांचे ४६ पाणथळ अधिवास आणि जमिनीवरील ३१ अधिवासांचा पुढील तीन वर्षांकरिता अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 
  'बीएनएचएस' आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना संस्थेचे संचालक डाॅ. दिपक आपटे 

 
 

याकरिता देशभरातील पर्यावरणीय आणि सरकारी संस्थांकडे पक्षी स्थलांतराबाबत उपलब्ध असणार्‍या माहितीचे एकत्रीकरण करण्याचे काम ’बीएनएचएस’कडून करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे या अभ्यासाच्या शेवटी संपूर्ण माहितीचे संकलन ‘अक्सच्युअर लॅब’च्या मदतीने ’आऍग्युमेन्टिंग रिअ‍ॅलिटी’ तंत्रज्ञानाच्या आधारे एका अ‍ॅपमध्ये करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये त्रिमितीय तंत्रज्ञानाच्या आधारे पक्ष्यांचा स्थलांतराचा मार्ग दाखविला जाईल. म्हणजेच एखादा पक्ष्याचा स्थलांतर मार्ग प्रदेशानुरूप त्रिमितीय पद्धतीद्वारेे आपल्याला पाहता येईल. अशाप्रकारे पक्षी स्थलांतराला तंत्रज्ञानाची जोड देऊन करण्यात येणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. याचा उपयोग पक्ष्यांच्या स्थलांतर क्षेत्रांमध्ये उभारण्यात येणार्‍या पायाभूत विकास प्रकल्पांच्या आखणीकरिता उपयुक्त ठरणार आहे. त्याशिवाय पक्ष्यांचे थवे विमान वाहतुकीकरिता अडथळा ठरत असल्याने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यान विमानसेवांच्या नियोजनासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या अभ्यासाकरिता ३.८ कोटी रुपयांचा खर्च पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
 
 
 
पक्ष्यांचे आकाशमार्ग

जगभरात पक्षी स्थलांतराचे एकूण नऊ मार्ग आहेत. स्थलांतरित पक्षी या मार्गावरून ये-जा करतात. या नऊ मार्गांमधील पक्ष्यांचा मध्य-आशियाई आकाशमार्ग हा महत्त्वाचा आहे. यामध्ये आशियामधील ३० देशांचा समावेश होतो. भारताचा बहुतांश भूभाग या आकाशमार्गात मोडतो. युरोप आणि रशियामधून हिवाळ्यात या आकाशमार्गाचा वापर करत पक्ष्यांच्या १७८ प्रजाती भारतात दाखल होतात.