महामंडळाने दाखविलेली नवीन वाट

    दिनांक  04-Oct-2019 20:52:47   साहित्य संमेलनाच्या पवित्र गाभाऱ्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना बसविण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे उद्या तथाकथित पर्यावरणवादी, समाजसुधारक, आंदोलक, ऊस आणि कांद्याला भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणारे, शेतीमालासाठी संघटन करणारे, असंघटित कामगारांना न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरणारे असे सर्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यास पात्र ठरतील. साहित्य महामंडळाचे आपण अभिनंदन करूया. त्यांनी अध्यक्ष होण्यासाठी एक नवीन वाट मोकळी करून दिलेली आहे.


९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने साहित्य महामंडळाने निवड केली. ही निवड कोणतीही राजकीय डावपेच न करता झाली, काहींना वगळण्यासाठी झाली वगैरे आरोप आपण करू नयेत. निवड प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे झाली, असे आपण मानूया. आपण लोकशाही समाजरचनेत राहत असल्यामुळे साहित्य महामंडळाच्या संस्थेने सर्व मराठी रसिकांच्यावतीने आणि त्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय लोकशाही भावनेने स्वीकारला पाहिजे. त्याला अनावश्यक विरोध करू नये. तरीसुद्धा साहित्य संमेलन आणि वाद यांचे जुळ्या भावंडांचे नाते आहे. पूर्वी हे वाद साहित्य क्षेत्रापुरते मर्यादित राहत असत, आणि साहित्य विषयावर हे वाद रंगत. हळूहळू ही साहित्यसृजनता कोपऱ्यात गेली आणि त्याची जागा राजकारण, व्यक्तिगत हेवेदावे, तू मोठा का मी मोठा, अशा विषयांनी घेतली. मराठी साहित्य संमेलन परंपरेला काळिमा फासला जाईल, अशी घटना ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक आनंद यादव यांच्या बाबतीत घडली. लोकशाही प्रक्रियेने त्यांची निवड झाली. काही लोकांना ती आवडली नाही आणि त्यांनी आनंद यादव यांना साहित्य संमेलनाकडे फिरकू दिले नाही. अशीच पण जरा वेगळ्या प्रकारची घटना पु. भा. भावे यांच्या बाबतीत घडली. साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण हुल्लडबाजी करून उधळून लावण्यात आले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे साहित्य संमेलनातील भाषण विनाव्यत्यय होईल, एवढी सुजाणता मराठी रसिक दाखवतील, असे मानूया. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या संदर्भात वादाचे दोन मुख्य मुद्दे आहेत. एक तर ते ख्रिश्चन धर्मगुरू आहेत आणि त्यांचे बहुतेक साहित्य ख्रिश्चन धर्माची गोडवी गाणारे आहे. ते ख्रिश्चन धर्मगुरू असल्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्माची गोडवी गाणे यात काही गैर नाही. कोणताही फादर इस्लामची किंवा हिंदू धर्माची गोडवी गाणार नाही. हे काम त्यांनी सुरू केले तर, आकाशाच्या बापाच्या कळपात आणण्याचा व्यवसाय त्याला बंद करावा लागेल. म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो 'फादर' आहेत आणि त्यांचे लेखन ख्रिश्चन धर्माची गोडवी गाणारे आहे, हादेखील आक्षेपाचा विषय होता कामा नये.

 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले, ही बातमी ऐकल्यानंतर मला एका वेगळ्या बातमीची आठवण झाली. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. ते संन्यासी आहेत, भगवी वस्त्रे परिधान करणारे आहेत, त्यावर माजी न्यायमूर्ती सच्चर म्हणाले की, "आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती करून हिंदू राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे." अशाच आशयाचे वक्तव्य थोर घटनातज्ज्ञ फली नरिमन यांचे आले. ते म्हणाले की, "ही हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची सुरुवात आहे." फादर फ्रान्सिस दिब्रिटो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे ही कशाची सुरुवात आहे, हे सच्चर, फली नरिमन आणि त्यांच्या संप्रदायातील लोकांनी आम्हाला सांगितले तर बरं होईल. तेवढीच आमच्या ज्ञानात भर पडेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आतापर्यंतचे जे अध्यक्ष झाले, त्यातील काही अपवाद सोडले तर, मराठी साहित्यातील त्यांचे योगदान सह्याद्रीच्या शिखरासारखे आहे. वानगीदाखल काही नावे सांगतो. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, न्या. रानडे. त्यानंतर गेल्या सव्वाशे वर्षांत ज्यांनी अध्यक्षपद भूषविले, त्यापैकी काही जणांची नावे अशी... चि. वि. वैद्य, ह. ना. आपटे, न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शि. म. परांजपे, माधव ज्युलियन, वि. दा. सावरकर, श्री. म. माटे, व्यंकटेश माडगुळकर, अनंत काणेकर, वि. वा. शिरवाडकर, मधु मंगेश कर्णिक, विद्याधर गोखले, शांता शेळके, केशव मेश्राम, डॉ. सदानंद मोरे... मराठी मनाला या सर्व साहित्यिकांची जाण असते. यापैकी बहुतेकांचे काही ना काही वाचन रसिक मराठी माणसाने केलेले असते. मराठी सारस्वताची त्यांनी केलेली सेवा अजोड आणि अमूल्य आहे. त्या तुलनेमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो कुठे बसतात? हे आमच्यासारख्या मराठी रसिकाला साहित्य महामंडळाने समजावून सांगायला पाहिजे. कदाचित दिब्रिटो यांच्या साहित्याचा आस्वाद घेण्यात आमची रसिकता तोकडी पडत असेल, तर महामंडळाच्या हितोपदेशाने ती समृद्ध होईल. तेवढे काम महामंडळाने जरूर करावे.

 

महामंडळाला असे वाटले असावे की, (असा माझा आपला एक समज) फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केल्यामुळे आपण कसे सेक्युलर आहोत, सर्व धर्म समभावी आहोत, हे जगापुढे येईल. यात लपलेला दुसरा अर्थ असा होतो की, आतापर्यंत जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते सर्व हिंदूच होते. यातील केशव मेश्राम यांना जर हिंदू म्हटले, तर त्यांच्या अनुयायांना ते आवडणार नाही. ते बौद्ध होते. म्हणजे, भारतात जन्मलेल्या धर्माचे अनुयायी होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भारतात जन्मलेल्या धर्माचे लोक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले असता त्याची प्रतिमा सेक्युलर होत नाही, असे जर महामंडळातील विद्वानांना वाटले असेल, आणि त्यांनी त्यामुळे पूर्वी झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना अध्यक्ष केले असेल, तर आपण त्यांची पाठ थोपटली पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने दिलेला हा सेक्युलर अर्थ आपल्याला नवीनच असेल. तो दिल्याबद्दल महामंडळाचे धन्यवाद! फादर फ्रान्सिस दिब्रिटो ख्रिश्चन धर्मगुरू आहेत. त्यांचा परिचय देताना ते पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण-सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व, असे सांगितले जाते. वसई परिसरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी 'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून त्यांनी खूप काम केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. परंतु, हे सर्व गुण साहित्यिक कसे होतात? अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी अशी गुणवत्ता आवश्यक आहे, असा नवा पायंडा महामंडळाला घालायचा आहे का? तसे असेल तर उत्तम. नाहीतरी अखिल भारतीय संमेलन म्हणजे हवशे, नवशे, गवशे यांचा मेळावा आणि उत्सवच असतो. तो उत्सव करायचा असल्यामुळे मंदिरात मूर्ती कोणाची आहे, हा प्रश्न गौण ठरतो. लिहिता लिहिता सहज वि. वा. शिरवाडकरांची 'गाभारा' ही कविता आठवली. काही ओळी इथे देतो...

 

दर्शनाला आलात? या

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे.

त्यांचेही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा आणि असे इकडे या

पाहिलात ना तो रिकामा गाभारा?

या गाभाऱ्यात पूर्वी एक देव होता,

पण तो महारोग्यांच्या वस्तीत गेला - त्यांची सेवा करायला. परत आलाच नाही.

 

मग काय होतं? कवी म्हणतो-

 

पत्रव्यवहार चालू आहे.. दुसऱ्या मूर्तीसाठी

पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभाऱ्याचे महत्त्व अंतिम असतं,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.

 

साहित्य संमेलनाच्या पवित्र गाभाऱ्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना बसविण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे उद्या तथाकथित पर्यावरणवादी, समाजसुधारक, आंदोलक, ऊस आणि कांद्याला भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणारे, शेतीमालासाठी संघटन करणारे, असंघटित कामगारांना न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरणारे असे सर्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यास पात्र ठरतील. साहित्य महामंडळाचे आपण अभिनंदन करूया. त्यांनी अध्यक्ष होण्यासाठी एक नवीन वाट मोकळी करून दिलेली आहे. काही लोकांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिश्चन धर्मोपदेशक आहेत, यावरच आक्षेप घेतलेला आहे. या मुद्द्यावरही खरं म्हणजे कोणी आक्षेप घेऊ नये. काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक धर्मगुरू पोप (फादर फ्रान्सिस दिब्रिटोदेखील कॅथॉलिक आहेत.) भारतात आले होते. आपण सेक्युलर असल्यामुळे त्यांचे मनोभावे स्वागत केले. त्यांनीच सांगितले की, पहिल्या शतकात युरोपची भूमी ख्रिश्चन झाली, नंतर अमेरिका ख्रिश्चन झाली आता आपल्याला आशिया ख्रिश्चन करायचा आहे. प्रत्येक गावात चर्च उभे राहिले पाहिजे. धर्मगुरूंचा आदेश म्हणजे अंतिम शब्द. आज आपण मुंबईतील कोणत्याही वस्तीत जा, पाच वर्षांपूर्वी जेथे चर्च नव्हते, तिथे चर्च उभे राहिले आहे. वसई परिसरात गेल्या पाच-सहा वर्षांत किती नवीन चर्चेस उभी राहिली, याची माहिती मला नाही. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीच ती द्यायला पाहिजे. ख्रिश्चन असल्याने काय होतं? फ्रांकाइज गोटिए नावाचे फ्रेंच पत्रकार आहेत. धर्मगुरूच्या परिवारातच त्यांचा जन्म झाला. ते भारतात आले, त्यांनी भारत बघितला आणि ते हिंदूंच्या प्रेमातच पडले. काय होणार भारतातील हिंदू समाजाचे? या चिंतेने हैराण झाले. काही कारण नाही खरं म्हणजे. फ्रेंच माणूस आहे, खावे-प्यावे मजा करावी, सुखाने जगावे, हे सोडून हिंदू समाजाची चिंता करण्याचे कारण काय? आणि तेही एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या परिवारात जन्म घेऊन? ते म्हणतात, "मी भारतात ३० वर्ष राहिलो आहे. एका भारतीय स्त्रीशी लग्न केले आहे. सोनिया गांधी भारतात आल्या. त्यांचेही लग्न एका भारतीय माणसाशी झाले, पण त्या सर्वशक्तिशाली झाल्यानंतर ख्रिस्तीकरणाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले. चार हजारांहून अधिक विदेशी मिशनरी भारतात काम करतात. त्रिपुरामध्ये स्वातंत्र्य मिळत असताना एकही ख्रिश्चन नव्हता. तेथे आता एक लाख, वीस हजार ख्रिश्चन आहेत. अरुणाचल प्रदेशात २० लाख ख्रिश्चन झाले आहेत आणि ७८० चर्चेस उभी आहेत. १९४७ साली यातले काही नव्हते." अशी फ्रांकाइज गोटिए याने भरपूर आकडेवारी दिली आहे. "ज्या देशात ८५० दशलक्ष हिंदू राहतात, त्या देशाचा पंतप्रधान शीख आहे, सर्वेसर्वा सोनिया गांधी आहेत, त्या ख्रिश्चन आहेत. राष्ट्रपती मुसलमान आहे, ८५ टक्के हिंदूंवर हे अधिराज्य गाजवतात. हिंदू कुठे गेला?"

 

सध्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो सर्व ठिकाणी प्रवचने देत फिरत असतात. उदयमान अध्यक्षांचे ते काम असते. पत्रकार परिषदा, मुलाखती आणि प्रवचने असं सर्व त्यांचं चालू आहे. प्रवचन म्हटलं की ऐकणाऱ्याला उपदेश करणं आलंच. त्याचबरोबर स्वत:विषयीसुद्धा थोडं बोलणं आलंच. फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणतात, "माझी नैतिक भूमिका मांडणारच. त्याची किंमत मोजायला लागली तरी चालेल. (टाळ्या) माझा धर्म मला शत्रूवरही प्रेम करायची शिकवण देतो. माझा जे विरोध करतात, त्यांच्यावरही मी प्रेम करतो. सहिष्णुतेची दुसरी पायरी प्रेमभावना आहे. धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करणे धोकादायक आहे. त्यामुळे धर्मााची हानी होते. धर्मग्रंथांची शास्त्रीय चिकित्सा झाली पाहिजे." ही त्यांच्या भाषणातील काही वाक्ये आहेत. धर्म आणि धार्मिक मूल्यांचा उपदेश हिंदूला करणे म्हणजे, हापूस पिकणाऱ्या देवगडमध्ये वसईचा रायवळ विकण्यासारखी आहे. हा सर्व उपदेश ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि ख्रिस्ती संघटनेतील बिशप, आर्चबिशप, कार्डिनल यांना केला पाहिजे. धर्मग्रंथाची चिकित्सा फुले, आंबेडकर, दयानंद सरस्वती, सावरकर यांनी जबरदस्तपणे केलेली आहे. बायबलची चिकित्सा करण्याची तुमची हिंमत आहे का? बायबलमध्ये एकापेक्षा एक सरस चमत्कार आहेत, त्याला वैज्ञानिक कसोटी लावणार का? सृष्टीच्या उप्तत्तीची कथा आहे. तिला वैज्ञानिक कसोटी लावणार का? डार्विनचा सिद्धांत शाळेत शिकविला जातो, तो बायबलविरुद्ध आहे, म्हणून अमेरिकेत खटला चालला होता. दिब्रिटोंना त्याची माहिती असेलच. भारतीय जीवनमूल्य आहे, सहिष्णुतेवर थांबू नका त्याची पुढची पायरी सत्य एक आहे, आणि त्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. सर्व मार्ग सत्य आहेत. ख्रिश्चन धर्मविचारात हा विचार बसतो का? असे प्रश्न फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रवचने ऐकल्यावर मनात निर्माण होतात. आपण आशा करूया की, वर्षभरात ते त्याची उत्तरे देतील. आपणही सेक्युलॅरिझमला जागून फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत, याचा आनंद साजरा करूया. ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ आणि नामदेवांनी समृद्ध केलेली मराठी भाषा, दिलेले तत्त्वज्ञान, जीवन जगण्याचा मार्ग इतका जबरदस्त आहे की या मार्गाने जाणारा वाटसरू कोणताही झगा घातलेला असेना का, मराठी मायबोलीच्या प्रभावक्षेत्राखाली आल्याशिवाय राहत नाही. ते त्याला सांप्रदायिकता विसरायला लावते आणि वैश्विक बनण्याचा मार्ग दाखविते. 'हे विश्वचि माझे घर' या दिशेने मायमराठी घेऊन जात असते. फादरही त्याच दिशेने चालतील अशी आशा करूया!