आत्मपरीक्षण करायला लावणारा विजय

    दिनांक  24-Oct-2019 22:29:11   
|महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. अन्य कोणती अडचण न निर्माण झाल्यास युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. विजय तर मिळाला, पण तो अपेक्षांची पूर्ती करणारा नाही. अपेक्षा दोनशेहून अधिक जागांची होती, प्रत्यक्षात ---- जागा मिळाल्या आहेत. अपेक्षांची पूर्ती का झाली नाही? हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे.


भाजपची अपेक्षा १२२ पेक्षा अधिक जागा मिळविण्याची होती. आत्मविश्वासाने देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "मी पुन्हा येईन." ते निवडून आलेले आहेत आणि भाजपचे संख्याबळ पाहता तेच पुन्हा मुख्यमंत्री होण्यात अडचण येईल, असे नाही. परंतु, ज्या संख्याबळाची अपेक्षा होती, ते संख्याबळ त्यांच्या मागे राहणार नाही. त्यात पक्ष कुठे कमी पडला, हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. दूरचित्रवाहिन्यांवरून निवडणुकांचे कल सकाळी 8 पासून दाखविण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक वाहिन्यांवर भाष्य करण्यासाठी काही मंडळी बसली होती. निवडणुकांचे कल पुढे-मागे झाले की, त्यांचे भाष्यही बदलत जाई. अशा प्रकारचे भाष्य आत्मचिंतनासाठी फारसे उपयोगाचे नसते. जसा वारा वाहील, तशी भाष्याची दिशा बदलते. भाजपचा विचार करता, २०१४ साली भाजपने शिवसेनेबरोबर युती केली नव्हती, तेव्हा युती न करता भाजपला १२२ जागा मिळाल्या. २०१९च्या निवडणुकीत युती केली आणि जागा घटल्या. आत्मपरीक्षणाचा विषय होतो की, युती न केल्यामुळे जागांमध्ये वाढ होते की नाही? आणि केल्यास जागांमध्ये घट होते, हे खरे आहे का? याचा वस्तुनिष्ठ अभ्यास भाजपच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे. युतीचे सरकार पाच वर्षे उत्तम चालले. जेवढी करण्यासारखी कामे होती, ती त्यांनी केली. निवडणुकांचा अनुभव असा आहे की, केवळ कामावर मते मिळत नाहीत. चांगले काम केले म्हणून मतदार मतपेटी भरून टाकेल, या भ्रमात राहण्याचे कारण नाही. सरकारचे कामच मुळी काम करण्याचे आहे. त्यामुळे तुम्ही चांगले काम केले, यात विशेष काय केले? तुम्ही तुमचे कर्तव्य बजावले आहे. मतदारांना आपल्या पक्षाला मत देण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी आणखी खूप विषय असतात. भाजपची मंडळी आम्ही चांगले सरकार चालविले, या भ्रमात राहिली का? याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे.

 

निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठमोठे नेते आले. दुय्यम स्तराचे नेतेही आले. त्यांना तिकिटे देण्यात आली. त्यातील काही निवडून आले, काही पडले. बाहेरून भरती केली की, वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाचे निष्ठापूर्वक काम केले, त्यांच्यावर अन्याय होतो. राजकीय पक्षाचे काम करण्याच्या प्रेरणा वेगळ्या असतात. सत्तेची पदे सर्वांना हवी असतात. नगसेवक पद, आमदारकी, खासदारकी हवे असणारे पक्षात असंख्य कार्यकर्ते असतात. त्यांच्या इच्छा-आकांक्षा डावलून बाहेरून आलेल्या लोकांना पक्षात बसविण्यात चूक झाली की योग्य निर्णय झाला, हादेखील एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधी पक्षांना नगण्य लेखले गेले. लढण्यासाठी समोर कुणीच नाही, अशी भाषणे झाली. लोकशाहीतील राजकीय पक्षांचा इतिहास हे सांगतो की, कोणताही पक्ष नगण्य नसतो आणि कोणताही राजकीय नेता अर्थहिन होत नसतो. राजकीय नेता आणि पक्ष यांचे अस्तित्व संपत नसते. त्यात चढ-उतार होत असतात. जनसंघापासूनचा भाजपचा इतिहास जर बघितला तर पहिली २०-२५ वर्षे जनसंघ भाजपला कुणी फारसे विचारत नव्हते. परंतु, नंतर हळूहळू पक्षाची राजकीय शक्ती वाढत गेली. शक्ती वाढता-वाढता दिल्लीची सत्तादेखील हातात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नगण्य लेखण्याची चूक झाली का? त्यांच्या शक्तीचा अंदाज आला नाही का? त्यांना परंपरागत जनसमर्थनाचा पुरेसा अंदाज आला नाही का? हे सर्व प्रश्न कठोर आत्मपरीक्षण करण्याचे आहेत.

 

दूरचित्रवाहिन्यांवर ज्या चर्चा चालल्या, त्यामध्ये पाच वर्षे सत्तेवर राहिल्यामुळे सत्तेचा माज आला. २०१९ साली मोठा विजय मिळाल्यामुळे आता आपल्याशी कोण लढणार, असा अनावश्यक आत्मविश्वास निर्माण झाला. लोक आपल्यालाच मत देणार आहेत, आपल्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही, अशी भावना निर्माण झाली. यातील सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत, असे म्हणणे धाडसाचे होईल. कुठल्याही निवडणुकीत मतदारांना गृहित धरता येत नाही. मतदार आता शहाणा झाला आहे. लोकसभेला ज्याप्रकारे तो मतदान करील, त्याप्रकारे तो विधानसभेला करीत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही करीत नाही. हे राजकीय क्षेत्रातील सर्वांना समजत, हा त्यांच्या अनुभूतीचा विषय आहे. असे असताना मतदारांच्या मनाचा कानोसा घेण्यामध्ये कोठे आणि कोणत्या चुका झाल्या, याचे आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. सांगली-कोल्हापूर भागात पाऊस प्रचंड पडला, धरणातून पाणी सोडले गेले, पूर आला, जनजीवन विस्कळीत झाले. अशा संकटाच्या वेळी लोकांची अपेक्षा शासनाने भरीव काम करण्याची असते. लोकशाहीत शासनाला ‘मायबाप सरकार’ म्हणतात. ‘मायबाप सरकार’ आईच्या ममतेने आणि बापाच्या कर्तव्य-कठोरतेने कामाला लागले पाहिजे. सरकारात बसलेले म्हणतील आम्ही काम केले. ते खरेही आहे. परंतु, सरकारात बसलेल्यांना काय वाटते हे महत्त्वाचे नसून जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. जनतेची भावना चांगली झाली नाही. यात आपण कोठे कमी पडलो, कसे कमी पडलो, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. युतीचे सरकार स्थापन होईल. ते धडाधडीने कामही करील. युती असल्यामुळे कुरबुरी होत राहतील. पण, २०२४ची निवडणूक जिंकायची असेल तर त्याची बांधणी आत्तापासून करायला पाहिजे. संघटनात्मक बांधणी ही जितकी आवश्यक आहे, तेवढीच मतदाराराजाची मर्जी राखणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे काम आहे. संघटना बांधणीने एक बूथ दहा कार्यकर्ते उभे राहतील. हजार मते केवळ कार्यकर्त्यांमुळे मिळतील, हा भ्रम आहे. मतांसाठी हे सरकार माझे आहे. माझ्यासाठी ते काम करत. सरकारातील मंत्री माझ्या हितासाठी अहोरात्र धडपड करतात, याची अनुभूती मतदाराला यावी लागते. निवडणूक जिंकण्याचा हाच एक खात्रीचा मार्ग आहे.