हिंदू हिताय : भाग ६ - राष्ट्र प्रथम

    दिनांक  15-Jan-2019   


आपला एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे, मी प्रथम भारतीय आहे. इथे भारतीय याचा अर्थ ‘मी मूल्य परंपरा आणि विचार परंपरेने हिंदू आहे.’ असाच करावा लागतो. हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही. सत्तेवर कोणाला बसवायचे, हे आपण ठरविले पाहिजे.

 

राहुल गांधी गुजरातच्या निवडणुकांपासून वेगवेगळ्या मंदिरांत जाऊ लागले आहेत. मानसरोवराची यात्राही त्यांनी केली. ‘मी हिंदूविरोधी नाही, हिंदू आस्थांची मी कदर करतो,’ हा संदेश त्यांना सर्व मतदारांना द्यायचा होता. मतदाराने राहुल गांधी यांचे घराणे, राज्यकर्ते घराणे म्हणून मानलेले आहे. त्यामुळे या राजघराण्यातील राजपुत्र आपण जात असलेल्या मंदिरांत जातो, प्रसाद घेतो, याचा आनंद सामान्य मतदाराला होणे स्वाभाविक आहे. परंतु, आजच्या काळात मंदिरात जाणे, यात्रा करणे यामुळे मी हिंदू हिताची काळजी करणारा आहे, असा अर्थ होत नाही आणि कोणीही करता कामा नये, अशी भावना करणे हे अत्यंत धोकादायक आहे. यापूर्वीच्या लेखात वारंवार एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की, हिंदू असण्याचा आणि मंदिरांत जाण्याचा काहीही संबंध नाही. हिंदू आस्थांचे विषय फार वेगळे आहेत. त्याबद्दलच्या भूमिका कोणत्या, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते.

 

जगाच्या पाठीवर भारत एकच असा देश आहे की, ज्या देशात हिंदू निर्वासित होतो. १९९० सालापासून काश्मीरमध्ये हिंदूंना वेचून वेचून ठार करण्याचा ‘प्रोग्रॅम’ (या पुरोगामी शब्दाचा अर्थ अगोदर दिलेला आहे.) राबविण्यात आला. काश्मीरमधून जवळपास साडेतीनशे ते चार लाख हिंदूंचे स्थलांतर झाले. आपली घरेदारे, शेतीवाडी, मालमत्ता सर्व सोडून त्यांना पंजाब, दिल्ली, जम्मू येथे यावे लागले. त्यांची अवस्था दयनीय झाली. त्यांच्या वाईट स्थितीबद्दल एकाही पुरोगाम्याने अश्रू ढाळलेले नाही. जावेद अख्तर, आमीर खान, अरुंधती रॉय, प्रणव रॉय या फलटणीतील कोणीही या काश्मिरी हिंदूंसाठी रडल्याचे मी पाहिलेले नाही. राजघराण्याच्या सोनिया गांधींनीदेखील त्यांच्याविषयी चार सहानुभूतीचे शब्द उच्चारल्याचे माझ्या वाचनात नाहीत. राजपुत्र राहुल या विषयावर मिठाची गुळणी धरून बसलेले असतात.

 

या सर्व गँगने २००२ साली गुजरात दंगलीचा असा काही विषय केला की, नरेंद्र मोदी म्हणजे, दुसरा चंगेज खानच आहे, असा समज व्हावा. सोनिया गांधींनी तेव्हा नरेंद्र मोदींना म्हटले की, “ते मौत का सौदागर आहेत.” काश्मीरमध्ये हिंदूंना वेचून-वेचून ठार करणारे कोण आहेत? ते परमेश्वराचे दूत आहेत का? की मानवतेचे पुजारी आहेत? हीच गोष्ट आसाम आणि बंगालच्या संदर्भातही आहे. आसाममध्ये बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की, लोकसंख्येचे सर्व संतुलन बिघडत चालले आहे. पश्चिम बंगालमधील अनेक जिल्हे मुस्लीमबहुल झालेले आहेत. हे सर्व बांगलादेशी ममता बॅनर्जींचे व्होटर्स आहेत. ’माँ, मानूष, माटी’ची घोषणा करणारी ममता बंगालमध्ये ‘हिंदू माणूस’ला चिरडण्याचे राजकारण करते. इतिहासाच्या एका वळणावर पूर्व बंगाल, मुस्लीम बहुसंख्य झाला आणि ४७ साली भारतातून फुटला. ममता बॅनर्जी या दुसर्‍या फुटीची पायाभरणी करीत आहेत.

 

मंदिरात जाणार्‍या राहुल गांधींना प्रश्न विचारला पाहिजे की, ‘मंदिरात जाऊन देवाकडे तुम्ही काय मागता? देवाकडे हे मागता का की, ‘हे देवा नरेंद्र मोदीचे सरकार जाऊदे आणि मला पंतप्रधानपद मिळूदे.’ की, हे मागता, ‘हे परमेश्वरा तुझी भक्ती-अर्चना करणार्‍यांची बहुसंख्या काश्मीरमध्येही झाली पाहिजे आणि बंगालमध्येही झाली पाहिजे, त्यासाठी मला शक्ती दे.’ हा हिंदू आस्थेचा विषय आहे. हिंदूंना भारतात जगायचे आहे, राहायचे आहे. सन्मानाने जगायचे आहे. केवळ स्वत:ला जगायचे नसून आपल्याबरोबर सर्वांना सन्मानाने जगवायचे आहे. एवढेच नव्हे तर एक अशी समाजरचना उभी करायची आहे जिथे, सर्व उपासना पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतील. आपापसात संघर्ष करणार नाहीत. ही हिंदू आत्म्याची हाक आहे. राहुल गांधी तिची पूजा करतात का? चार पैशाची फुले घेतली, नारळ घेतला, उदबत्या लावल्या, कपाळाला टिळा लावला ही काही देवाची पूजा नव्हे. देवाची पूजा म्हणजे, देवरक्षणाची पूजा, देवरक्षण करणार्‍या सामर्थ्याची पूजा. हे सामर्थ्य देणार्‍या समाजशक्तीची पूजा. परमेश्वराला अशी पूजा आवडते. गंध, हार, तुरे करणार्‍यांचे रक्षण देवाने कधी केल्याचे आपला इतिहास सांगत नाही. सोमनाथाचे मंदिर फुटले. त्याचे भक्त काय कमी होते का? परंतु, ते सर्व स्वत:साठी देवाकडे मागणारे होते. त्यांच्यात सामूहिक शक्ती काहीही नव्हती. देवाने त्याचे रक्षण केले नाही.

 

समर्थ रामदास स्वामी सांगून गेले की, ‘धर्मासाठी मरावे-पण केवळ मरू नये, मरणात पुरुषार्थ नाही-मरोनी अवघ्यासी मारावे.’ म्हणजे आपल्या शत्रूंचा निःपात करावा, एकट्याने मरू नये आणि त्याच्यापेक्षा चांगली अवस्था म्हणजे, ‘मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले.’ भारत आपला देश आहे, म्हणून भारतात आपलेच राज्य पाहिजे. येथे मरावे, मारावे याचे शब्दश: अर्थ घ्यायचे नसतात. त्याचे अर्थ होतात की, आपण झुंजत राहिले पाहिजे, प्रयत्न करीत राहिले पाहिजे. रामदास स्वामींच्या काळात तलवारीला तलवार भिडविल्याशिवाय राज्य मिळविता येत नसे. आजच्या काळात मतदानाची शक्ती निर्माण केल्याशिवाय राज्य मिळविता येत नाही. काळात झालेला हा फरक आहे. हिंदू समाजाची मतदानाची शक्ती एकवटू नये, असा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात झाला. जाती-पातीत आपल्याला कसे विभागले याची पुनरावृत्ती येथे करण्याचे कारण नाही. इथे आपल्याला एवढेच लक्षात ठेवायला पाहिजे की, जेव्हा राज्य मिळविण्याचा प्रश्न येईल, तेव्हा मी ब्राह्मण, हा कुंभार, तो कुणबी, तो चर्मकार, तो मातंग, असा कोणताही विचार आपण करता कामा नये. आपला एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे, मी प्रथम भारतीय आहे. इथे भारतीय याचा अर्थ ‘मी मूल्य परंपरा आणि विचार परंपरेने हिंदू आहे.’ असाच करावा लागतो. हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही. सत्तेवर कोणाला बसवायचे, हे आपण ठरविले पाहिजे. आपण ही गोष्ट तेव्हाच ठरवू शकतो, जेव्हा संघटितपणे आणि विचारपूर्वक आपण मतदान करायला सिद्ध होऊ.

 

आपली मतदानाची शक्ती एकवटण्यासाठी जात, भाषा, उपासनापंथ, याचा काहीही विचार न करता, आपल्या आस्थांचा विचार केला पाहिजे. हिंदू समाजाशी शेकडो वर्षे इस्लामने शत्रुत्वाची भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तान हे त्याचे जिवंत प्रतीक आहे. भारताला होता होईल, तेवढे जखमी करीत राहायचे, हे पाकिस्तानचे धोरण आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी लढताना आपले जवान शहीद होतात. कुठेतरी थांबून आपल्याला आपल्याशीच प्रश्न केला पाहिजे की, हे किती काळ सहन करायचे? याचा कायमचा सोक्षमोक्ष लावता येणार नाही का? त्यासाठी युद्ध करावे लागले तर तेही केले पाहिजे. ते करण्याची हिंमत असणारे राज्यकर्ते निवडले पाहिजेत. अनेक राजकीय नेते लोकांना भुलविणारी भाषणे करण्यात हुशार असतात. काही राजकीय नेते जातींची राजकीय समीकरणे बांधण्यात हुशार असतात. काही राजकीय नेते अनेक अर्थ निघणारी वक्तव्ये करण्यात वाक्बगार असतात. यापैकी कोणताही नेता आपल्या अस्तित्वाच्या संकटाशी लढण्यास अपात्र आहे, हे विसरता कामा नये.

 

देश, देशाची सुरक्षा, आपली मूल्यव्यवस्था, आपली संस्कृती यांचे डोळ्यात तेल घालून रक्षण कसे करायचे असते, हे समजण्यासाठी जगातील काही थोर नेत्यांची चरित्रे वाचायला पाहिजेत. अब्राहम लिंकन, थियोडोर रुझवेल्ट, फ्रँकलिन रुझवेल्ट, मन्रो हे अमेरिकेचे असे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले ज्यांनी अमेरिकेचे ऐक्य, अमेरिकेची मूलव्यवस्था, अमेरिकेचे संविधान यांच्या रक्षणाच्या संदर्भात काडीचीही तडजोड केली नाही. ते युद्धाला घाबरले नाहीत. युद्ध आपल्या दाराशी येईपर्यंत वाट बघत बसलेले नाहीत. स्वरक्षणाच्या बाबतीत त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही. हिंदू म्हणून आपण लक्षात ठेवले पाहिजे की, वायव्य सरहद्दीवर पाकिस्तान आहे. उत्तरेला चीन आहे. चीन-पाकिस्तानची दोस्ती आहे. दक्षिण महासागराला लागून असलेल्या अनेक देशांमध्ये चीनचे वर्चस्व आहे. चीनचे आरमार प्रबळ आहे. चीनची आर्थिक ताकद अफाट आहे. भारताच्या नकाशावर जर नजर टाकली तर, आपण सर्व बाजूंनी घेरलेलो आहोत, हे लक्षात येईल. श्रीलंका, ब्रह्मदेश हे आपले परममित्र नाहीत. नेपाळ आपला जिवलग मित्र आहे, असे आपण म्हणू शकत नाही. यासाठी आणि आपल्या भवितव्यासाठी जातवादी, वंशवादी, घराणेशाहीवादी राज्यकर्ते आपण सत्तेवर आणता कामा नये. आपल्या हाताने आपली कबर खणण्याचे पाप करू नये.

 

(क्रमशः)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/