हिंदू हिताय : भाग १ - राज्यशक्ती आणि हिंदू

    दिनांक  10-Jan-2019   


 


भारतभूमीवर जन्मलेला हिंदू, धर्मप्रामाण्यवादी हिंदू, सर्वधर्मसमभाव मानणारा हिंदू, सहिष्णू हिंदू, सोशिक आणि लढवय्या हिंदू, शरणागताला क्षमा करणारा हिंदू यापासून हिंदूंच्या सामाजिक स्वरूपापासून ते राजकीय अंगापर्यंत मनाला भिडणारे विचार मांडणारी ‘हिंदू हिताय’ ही आठ लेखांची लेखमाला आजपासून प्रकाशित करत आहोत...

 

जगाच्या पाठीवरील सर्वात प्राचीन समाज हिंदू समाज आहे. हिंदू हे त्याचे आजचे नाव आहे. वेदकाळात त्याला वैदिक समाज म्हणत, आर्य समाज म्हणत. ग्रीक आणि मुसलमानी आक्रमणानंतर आर्यावर्तात किंवा जम्बूद्वीपात राहणाऱ्या लोकांना नाव पडले ‘हिंदू’. सप्तसिंधूच्या प्रदेशात राहणारे लोक म्हणजे हिंदू, कारण ग्रीकांना ‘स’चा उच्चार करता येत नसे. त्यांनी सप्तसिंधूला हप्तहिंदू म्हटले आणि या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे नाव ‘हिंदू’ असे पडले. हिंदू ही वंशवाचक संज्ञा नाही, कारण हिंदू नावाचा कोणताही मानववंश नाही. भारतात अनेक मानववंशाचे लोक राहतात. त्यांचा परस्परांशी संकर झालेला आहे. यामुळे कोण कोणत्या मानववंशाचा, हे शोधणे अशक्य झाले. समुद्रात अनेक नद्या येऊन मिळतात आणि त्या समुद्राचे पाणी होतात. यातील कोणते पाणी गंगेचे, कोणते अ‍ॅमेझॉनचे, कोणते टेम्सचे, कोणते नाईलचे, कोणते जॉर्डन नदीचे आणि कोणते डॅन्यूबे नदीचे, हे कोणालाच सांगता येत नाही, तसे भारताचे आहे. हिंदू ही धर्मवाचक संज्ञा नाही, कारण आजच्या काळात धर्माचा अर्थ एक ग्रंथ, एक प्रेषित, एक देव, एक पूजापद्धती असा केला जातो. या अर्थाने हिंदू नावाचा धर्म भारतात अस्तित्त्वात नाही. भारतात धर्म म्हणजे शाश्वत सनातन नियम आणि धर्म म्हणजे माणासाने एकमेकांशी वागण्याचे नियम आणि कर्तव्य असा केला जातो. हा धर्म शाश्वत आणि सनातन आहे, तो एकच आहे. पूजापद्धती अनेक आहेत. हिंदू म्हणजे ज्या अनेक पूजापद्धती आहेत आणि ईश्वराला जो विविध रूपात पाहतो किंवा ईश्वराला जो निर्गुण रूपातच अनुभवतो, असा अर्थ करावा लागतो. ही हिंदू जीवनपद्धतीची वैशिष्ट्ये इतिहासकाळापासून चालत आलेली आहेत. यामुळे भारतात राहणाऱ्या लोकांचे जीवन एकमेकांचा सन्मान करीत, एकमेकांच्या पूजापद्धती स्वीकारीत सुखरूपपणे चालू राहिले. त्यामध्ये विघ्न आणण्याचे काम इस्लामी आक्रमणाने केले. त्यांनी आपली पूजापद्धती भारतीयांवर म्हणजे हिंदूंवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला. काही भागात त्यांना मोठे यश मिळाले. तेथे त्यांची लोकसंख्या वाढली. अनेक पिढ्या परधर्मात राहिल्यामुळे आम्ही हिंदू नाही, म्हणजे आम्ही भारतीय नाही, म्हणजे आम्ही भारतीय मूल्यपरंपरा न मानणारे आहोत, अशी त्यांची भावना झाली.

 

स्वातंत्र्य आंदोलनात त्यांना महंमद अली जिना नावाचा बुद्धिमान नेता सापडला. जो स्वतः विचाराने प्रागतिक होता, परंतु राजकारणाने तो कट्टर धर्मांध होता. त्याने मुसलमानांच्या मनात भारतात न राहण्याची भावना जागवली. इस्लामी आक्रमणामुळे भारताचा जो भाग मुस्लीम बहुसंख्य झाला, तो भारतातून फुटून वेगळा झाला. आज त्याला आपण पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणतो. हे दोन्ही प्रदेश आपल्या प्राचीन भारताचे म्हणजे जम्बूद्वीपाचे अविभाज्य भाग होते. तेथे राहणारे लोकदेखील आपलेच आहेत. ते परकीय धार्मिक विचाराचे गुलाम झाले. आपली ओळख विसरले. आपले सनातनत्व विसरले. आपलेच लोक त्यांना आपले शत्रू वाटू लागले आणि ते जिनांच्या मागे धावले. इस्लामसारखेच दुसरे आक्रमण ख्रिश्चनिटीचे झाले. इंग्रजांची राजवट स्थिर होण्यापूर्वीपासून ते चालू होते. हे आक्रमण पोर्तुगीज लोकांनी केले. नाविक सामर्थ्यात ते आपल्यापेक्षा सरस ठरले. पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागात त्यांनी आपली सत्ता निर्माण केली. मुंबई-ठाणे जिल्हा त्यांच्या ताब्यात गेला. मुंबईतील असंख्य गावे त्यांनी बळजबरीने बाटवली. सहार, मरोळ, गोंदविली, वांद्रे, कुर्ला, ख्रिश्चन व्हिलेज, आंबिवली, मढ, वसई, माहिम, अशी कितीतरी गावांची नावे सांगता येतात. अंधेरीत चकालाजवळ बामणपाडा नावाचे गाव आहे. (आज होते, असे म्हणावे लागेल) या बामणपाड्यात एकही बामण नाही, सगळे ख्रिश्चन आहेत, याचा अर्थ कोणे एकेकाळी तो बामणांचा पाडा असावा. पूर्वांचलातील अनेक राज्ये ख्रिश्चनबहुल झाली आहेत. केरळमधील काही भागांत फिरत असताना आपण जेरूसलेममध्ये आहोत का, असे वाटायला लागते आणि गोव्याची परिस्थिती तर सर्वांना माहीतच आहे.

 

हिंदूंचे संख्याबळ इतिहासकाळापासून झपाट्याने कमी होत चालले आहे. पुन्हा या ठिकाणी हिंदू म्हणजे कोण, हे स्पष्ट करायला पाहिजे. हिंदू याचा अर्थ केवळ हिंदूधर्मीय लोक नव्हेत. कारण पूजापद्धती या अर्थाने हिंदू या नावाचा कोणताही एक धर्म नाही. हिंदू याचा अर्थ भारताची सनातन मूल्य परंपरा आणि संस्कृती याचे जो पालन करतो, तो हिंदू, असा करावा लागतो. सनातन मूल्य म्हणजे निसर्ग आपली माता आहे, तिचे रक्षण करायला पाहिजे. सर्व प्राणिमात्र एका चैतन्याचे बनलेले असल्यामुळे त्यांना त्रास देऊ नये आणि संस्कृती म्हणजे आमची मूल्यपरंपरा आहे, भरणपोषण करणाऱ्या सर्व गोष्टीत आम्ही मातृत्त्वाचा अंश पाहतो. आम्ही सर्व उपासना पद्धतींचा आदर करतो, सर्वांना सामावून घेण्याची आमची तयारी असते, आम्ही केवळ आमच्यापुरते पाहणारे नसतो. ही आपली संस्कृती, तिचे पालन करणारा तो हिंदू, तिचा तिरस्कार करणारा तो अहिंदू. अशा सर्वसमावेशक हिंदूंची संख्या या देशात सातव्या-आठव्या शतकापासून कमी कमी होत चालली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील लोक इतिहास काळात हिंदूच होते. आज ते हिंदू राहिलेले नाहीत. इतिहासाचा नियम असा आहे की, ज्या भूभागात हिंदू अल्पसंख्य होतो, तो भूभाग भारतात राहत नाही. काश्मीर घाटीत मुसलमानांची बहुसंख्या आहे. ते आजादीचे आंदोलन करतात. दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात, सैन्यावर दगड मारतात, पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देतात. हा सत्य इतिहास आपण याच भाषेत सांगतो तेव्हा तो ऐकताना अनेकांना कापरे भरते आणि ते म्हणू लागतात, “तुम्ही धर्मांध लोक आहात, तुम्ही जातीयवादी आहात, तुम्हाला मुसलमान आणि ख्रिश्चन नको आहेत, त्यांचे तुम्ही शत्रू आहात. हिटलरने जसा ज्यूंचा ‘प्रोग्रेम’ (हा या मंडळींचा आवडता शब्दप्रयोग आहे - त्याचा अर्थ होतो शिरकाण) केला, तसा तुम्हाला मुसलमान आणि ख्रिश्चनांचा करायचा आहे.” सत्य असे फार बोचरे असते, पण ते आम्हाला दिसते आणि मी काही ए.जी. वेल्सच्या कथेतील आंधळा माणूस नाही.

 

केवळ जन्मांधाचे एक गाव असते. ते गाव एका घळीत असते. माणसाला डोळे असतात आणि त्या डोळ्यांनी बघायचे असते, हे तेथील कोणालाही माहीत नसते. माणूस म्हटलं की, तो आपल्यासारखाच-बिनडोळ्यांचा, अशी तिथल्या सर्व लोकांची ठाम समजूत होती. ते आपली कामे सवयीनुसार उत्तम करीत. शेती करीत, पशुपालन करीत, त्यांचे स्पर्शज्ञान खूप तगडे होते. या गावात एक डोळे असणारा तरुण चुकून येतो. सगळी आंधळी माणसे बघून त्याला आश्चर्य वाटते. त्यांची कामे बघूनही त्याला आश्चर्य वाटते. तो त्या गावात त्यांच्याबरोबर राहतो. अधूनमधून तो लोकांना डोळ्याने काय काय दिसते, हे सांगत असे. वेगवेगळे रंग सांगत असे. गावातील एका तरुणीवर त्याचे मन जडते. तिच्याशी लग्न करण्याचा तो विचार करतो. रोज तो सर्वांना डोळ्याने काय काय दिसते, हे सांगत राही. लोकांना ते पटत नसे. ते म्हणत डोळे-पाहणे ही काय भानगड आहे, याला काहीतरी विकार झालेला आहे. गावातील चार बुजुर्ग माणसे एकत्र येतात. याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, असे ठरवितात. सळ्या तापवून डोळ्याला डाग देण्याचा निर्णय ते करतात. हे जेव्हा त्या तरुणाला समजते तेव्हा रात्रीच तो एक दोर घेऊन पहाड चढून वर येतो आणि गावाला राम राम ठोकतो. हिंदूंचे घटत्या संख्याबळाचे आकलन आमच्या पुरोगामी आंधळ्यांना होत नसेल तर आपण डोळस लोकांनी गावातील तरुणाप्रमाणे पळून जाऊन काही उपयोग नाही. साऱ्या विश्वात ज्यांना हिंदू म्हणतात, त्यांना राहण्यासाठी केवळ भारतच आहे. बाकीच्या देशात आपण पाहुणे असतो, त्या देशाच्या मनात येईल तेव्हा ते आपल्याला लाथ मारून हाकलून देऊ शकतात. म्हणून विचार करूया की, आपण आणि आपल्या भावी पिढ्या सुखाने जगण्यासाठी काय करायला पाहिजे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/