‘खतरे में इस्लाम’ ते ‘खतरे में पाकिस्तान’

    दिनांक  24-Aug-2018   


 


इस्लाम खतरे में है।म्हणून पाकिस्तान निर्माण झाले आणि आता इस्लामांमुळेच पाकिस्तान ‘खतरे में’ आलेला आहे. असे होण्याचे कारण असे की, मुळात राष्ट्र आणि राज्य म्हणजे काय? त्याची निर्मिती कोणत्या परिस्थितीत होते? का होते? कशी होते? याचा गंभीर अभ्यास पाकिस्तान निर्माण करताना ना जिनांनी केला, ना इक्बालने केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

पाकिस्तानच्या राज्यघटनेप्रमाणे पाकिस्तान हे ‘इस्लामिक स्टेट’ (राज्य) आहे. या राज्यघटनेने सार्वभौमत्त्व अल्लाला दिलेले आहे. भारतीय राज्यघटना कोणत्याही एका धर्मावर आधारित नाही आणि भारतीय राज्यघटनेने सार्वभौमत्त्व भारतीय जनतेला म्हणजे आपल्या सर्वांना बहाल केलेले आहे. 1946 साली अखंड भारताच्या संविधान सभेची निर्मिती झाली. 9 डिसेंबर,1946 पासून संविधान सभेच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांमध्ये मुस्लीम लीगने सहभाग घेतला नाही. मुस्लीम लीगचे संविधान सभेतील सभासद अनुपस्थित राहिले. ते येवोत अगर न येवोत, आपल्याला राज्यघटना तयार करायची आहे, या मनस्थितीत संविधान सभेचे उर्वरित सर्व सभासद होते. पं. नेहरू यांनी 13 डिसेंबर, 1946 ला संविधान सभेपुढे उद्देशक ठराव मांडला. त्यावर अनेक दिवस चर्चा झाली. बॅरिस्टर जयकर यांचे लांबलचक भाषण झाले. त्याचा सारांश असा की, संविधान सभेत लीगचे सभासद नसल्यामुळे आणि संस्थानांचे सभासदही नसल्यामुळे संविधान सभा आपण काही काळ स्थगित करावी. पण, त्यांची ही सूचना मान्य झाली नाही आणि नंतर आपली राज्यघटना मुस्लीम लीगशिवाय निर्माण झाली. ती कोणत्याही एका उपासना पंथावर आधारित नाही.

 

मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे जनक मानण्यात येते. पाकिस्तान कशासाठी? जिना म्हणाले, “इस्लामांमधील सगळ्यात मूल्यवान ठेव्याचे जतन करण्यासाठी.” पण मग आजची पाकिस्तानची स्थिती कशी आहे? अमेरिकन लेखिका पमेला कॉनस्टेबल यांच्या पुस्तकाचे शीर्षकच असे आहे - ‘प्लेईंग विथ फायर, पाकिस्तान अॅट वार विथ इटसेल्फ’ म्हणजे स्वत:शीच लढणारा पाकिस्तान जो आगीशी खेळ खेळत आहे. जिनांचा सगळ्यात मूल्यवान ठेवा कोणता असेल, तर पाकिस्तानचा स्वत:शीच चाललेला हिंसक आणि भक्षक लढा. भारतातील काही लोकांना, काही पत्रकारांना पाकिस्तानची स्थिती पाहून फार दु:ख होते, रडू येते आणि मग ते उपदेश करतात की, “पाकिस्तानची आर्थिक स्थिती फार खराब आहे. भारताने पाकिस्तानला मदत केली पाहिजे. विषारी सापाला दूध पाजले पाहिजे. त्याचा दंश सहन केला पाहिजे, हा आपला शेजारधर्म आहे.” असला उपदेश करायला यांच्या बापाचे काही जात नाही. काश्मीरच्या सीमेवर यांच्या घरातील कुणी मरत नाही. मुंबईच्या लोकलमधील बॉम्बस्फोटात त्यांचा भाऊ, बहीण किंवा बायको कुणी दगावत नाही. कारण, हे कधी रेल्वेने प्रवासच करीत नाहीत. आलिशान गाड्यांमधून प्रवास करणार्‍यांना आलिशान उपदेश करायला काय जातेइस्लाम, पाकिस्तानचा राज्यधर्म झाल्यामुळे अन्य धार्मिक अल्पसंख्यकांना पाकिस्तानात काही किंमत नाही. 1947 साली पाकिस्तानात 27 टक्के हिंदू होते. आता तीन ते चार टक्के राहिले आहेत. तेही बिचारे जीव मुठीत घेऊन जगत असतात. 1992 साली जेव्हा ‘बाबरी’चे पतन झाले, तेव्हा पाकिस्तानातील शेकडो मंदिरे मुसलमानांनी पाडली. हिंदुंच्या वस्त्यांवर हल्ले केले. त्यांना आगी लावल्या. ‘बाबरी शहीद झाली,’ अशी घोषणा त्यांनी केली. हिंदूद्वेषातून पाकिस्तान निर्माण झाले. हिंदूद्वेषावर ते उभे राहिले. हिंदूद्वेषावर ते आजपर्यंत चालत राहिले. यातील सगळ्यात मोठी विडबंना अशी की, पाकिस्तानातील 90 टक्क्यांहून अधिक मुसलमान पूर्वीचे हिंदू किंवा बौद्ध आहेत, काही जैनदेखील असतील. म्हणजे ‘बाटगे हिंदू’ हे शुद्ध हिंदूंचा द्वेष करतात, असा त्याचा अर्थ झाला. जेव्हा कधी त्यांना आपण बाटले गेलो आणि अरबस्तानातील धर्माचे गुलाम झालो, या गुलामीची जाणीव होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने पाकिस्तान ‘स्वतंत्र’ झाला किंवा ‘मुक्त’ झाला, असे म्हणता येईल. ज्याक्षणी पाकिस्तानच्या राज्यघटनेने पाकिस्तान इस्लामी राज्य राहील, असे घोषित केले, त्याक्षणी ‘इस्लामी’ कोण? असा प्रश्न उपस्थित झाला.

 

या प्रश्नाचे उत्तर पाकिस्तानातील मुल्ला-मौलवींनी देऊन टाकले. हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन, मुसलमान नाहीत, हे आपोआप ठरले. परंतु, कुराणाचे पठण करणारे, प्रेषितांना मानणारे, अल्लाला मानणारे, सगळेच मुसलमान आहेत का? पाकिस्तानच्या राज्यघटनेने अहमदिया मुसलमान हे मुसलमान नाहीत, असे घोषित करून टाकले. पाकिस्तानी नागरिकाला पासपोर्ट काढताना ‘मी अहमदिया नाही’ असे घोषित करावे लागते. 1950 ते 1960 या दशकात पाकिस्तानात अहमदियांविरूद्ध दंगली झाल्या. त्यांची प्रार्थनास्थळे पाडण्यात आली. त्यांना ठार करण्यात आले. आजही पाकिस्तानात अहमदियांना सहजपणे मशीद बांधता येत नाही. पाकिस्तानात 25 टक्क्यांहून अधिक ‘शिया’ मुसलमान आहेत. राज्य करणारे सगळे ‘सुन्नी’ आहेत. पाकिस्तानात सुन्नींच्या अनेक दहशतवादी संघटना आहेत. या संघटना शियांच्या मशिदीवर हल्ला करतात. दर्ग्यांवर हल्ले करतात. यात्रेकरूंना ठार करतात. ‘शिया’ आणि ‘सुन्नी’ हा संघर्ष इस्लामच्या जन्मापासूनचा आहे. पाकिस्तानला लागून असलेला इराण ‘शिया’ पंथीय आहे. म्हणून पाकिस्तानातील शियांवर सुन्नींचा फारसा विश्वास नसतो. बलुचिस्तान भागामध्ये इराणीयन वंशाचे शिया मुसलमान आहेत, त्यांना ‘हजारा म्हणतात. त्यांना वेचून वेचून ठार करण्याचे काम चालते. त्यांच्याकडे संशयाने बघितले जाते. इस्लामचे भाष्य करणारे दोन प्रवाह पाकिस्तानात आहेत. एकाला ‘बरेलवी मुसलमान’ म्हणतात आणि दुसऱ्याला ‘देवबंदी मुसलमान’ म्हणतात. ही दोन्ही स्थाने (बरेलवी आणि देवबंदी भारतात आहेत) पाकिस्तानात बरेलवी मुसलमानांची संख्या जास्त आहे, पण राज्य देवबंदी मुसलमान करतात. हे दोन्ही सुन्नी मुसलमान आहेत. ‘बरेलवी’ आणि ‘देवबंदी’ या इस्लामच्या दोन शाखांचा जन्म ब्रिटिशांचे राज्य असताना झाला. मुसलमानांच्या मुसलमानत्वाचे रक्षण करणे आणि राज्य मिळविण्याची आकांक्षा जागृत ठेवणे, या दोन्ही गोष्टी दोघांत समान आहेत. ‘देवबंदी’ हे अल्ला सोडून कोणाला मानत नाहीत, तर ‘बरेलवी’ थडग्यांचीदेखील पूजाअर्चा करतात. यावरून दोघांच्यात इस्लामच्या मूलतत्त्वावरून वाद आणि भांडणे आहेत. इस्लाममधील भांडणे शांततामय नसतात, तर ती हिंसक असतात. पाकिस्तानातील त्यांचे स्वरूप असे आहे.

 

शिया मुसलमानांना भय वाटते की, देवबंदी मुसलमानांप्रमाणे किंवा पाकिस्तानातील अन्य धार्मिक अल्पसंख्याकांप्रमाणे त्यांनाही दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा दिला जाईल का? शिया आणि सुन्नी या दोन गटांच्या जोडीला पाकिस्तानात, अरबस्तानातील ‘सलाफी इस्लाम’ आहे. हे सलाफी अतिशय कडवे समजले जातात. तालिबानी आणि अल-कायदाचे जिहादी बहुतेक सलाफी असतात. ते अल्ला सोडून कुणाला मानत नाहीत. प्रेषित मोहम्मद अल्लाचे दूत होते आणि मनुष्य होते, असे त्यांचे म्हणणे असते. ते मोहम्मदांची पूजाअर्चा मान्य करीत नाहीत. थडग्यांची पूजा करणाऱ्या मुसलमानांना ते दुय्यम मुसलमान समजतात. सलाफी इस्लामला मानणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेत, लष्करी तोयबाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पाकिस्तान इस्लामी राज्य आहे आणि जिनांच्या भाषेत सांगायचे, तर इस्लामच्या सर्वश्रेष्ठ ठेव्याचे त्यांना जतन करायचे आहे. आधुनिक काळात राज्य आणि ईश्वर व ईश्वराचे कायदे यांची फारकत करण्यात येते. राज्य चालविणे हा ऐहिक विषय आहे. अर्थकारण, अर्थकारणात येणाऱ्या बँकांसारख्या संस्था, उद्योग, व्यापार, परराष्ट्र संबंध, अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षण इत्यादी सगळे विषय हे ऐहिक विषय असतात आणि देवाचे विषय हे प्रार्थना, आत्मविकास, आध्यात्मिक साधना, पूजाअर्चा, तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी असतात. या दोघांची गल्लत करता कामा नये. पाकिस्तानने जन्मापासून ऐहिक विषयात अल्ला आणल्यामुळे कोणाचा अल्ला खरा, कोणाचे कुराण खरे, यातूनच वादविवादाला सुरुवात झाली. राज्यसंस्थेला आपल्या बाजूने खेचण्यासाठी इस्लाममधील प्रत्येक पंथ पाकिस्तानात प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळे राज्यसंस्थेला जी ऐहिक कामे करायची आहेत, ती करण्यासाठी योग्य ती फुरसत आणि परिस्थिती गेल्या सत्तर वर्षांत काही निर्माण झालेली नाही. इस्लाम आणि राज्य यांचाच पाकिस्तानात संघर्ष सुरू आहे आणि ही सर्वात मोठी विटबंना आहे. ‘इस्लाम खतरे में है।’ म्हणून पाकिस्तान निर्माण झाले आणि आता इस्लामांमुळेच पाकिस्तान ‘खतरे में’ आलेला आहे. असे होण्याचे कारण असे की, मुळात राष्ट्र आणि राज्य म्हणजे काय? त्याची निर्मिती कोणत्या परिस्थितीत होते? का होते? कशी होते? याचा गंभीर अभ्यास पाकिस्तान निर्माण करताना ना जिनांनी केला, ना इक्बालने केला. आम्हाला हिंदूंच्या प्रभुत्वाखाली राहायचे नाही, एवढी एकच तबकडी ते वाजवत बसले. हिंदूंपासून फुटून राहून आपण जगू शकतो का? सुरक्षित राहू शकतो का? याचा विचार त्यांनी केला नाही. त्यांना ‘राष्ट्रनिर्माते’ म्हणणे किंवा मुत्सद्दी नेता म्हणणे, हा जगातील राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान समजला पाहिजे. ‘राष्ट्र’ आणि ‘राज्य’ होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट निश्चित करावी लागते की, ‘आम्ही कोण आहोत?’ ‘आम्ही मुसलमान आहोत,’ एवढ्यावरून राष्ट्र तयार होत नाही. ‘मुसलमान’ या एका भावनेने राष्ट्र झाले असते, तर संपूर्ण अरब जगताचे एकराष्ट्र झाले असते. अरबस्तानात 20-25 देश आहेत. प्रत्येकाची राष्ट्रीयता वेगळी आहे. ते आपापसात मारामाऱ्या करतात, मुसलमान असूनही. म्हणून ‘मुसलमान असणे’ हा राष्ट्राचा आधार होऊ शकत नाही.

 

राष्ट्राचा आधार नेहमीच संस्कृती असतो. संस्कृती दोन-चार वर्षांत निर्माण होत नाही, दोन-चारशे वर्षांतही निर्माण होत नाही, तिला दीर्घकाळ जावा लागतो. संस्कृती निर्माण करण्याचे कार्य लेखक, कवी, इतिहास, सांस्कृतिक जीवन, कलाजीवन, महापुरुष, तत्त्वज्ञानी, साधू-संत, वीर स्त्री-पुरुष, जीवनमूल्ये, कौटुंबिक व्यवस्था इत्यादी असणाऱ्या घटकांतून होते. संस्कृती निर्माण करण्याचे श्रेय कधीही कोणाही एका व्यक्तीला जात नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. संस्कृतीचे संस्कार रोजच्या जीवनातून, बोलीभाषेतून आणि आईच्या दुधातून बालकाकडे येतात. हे कार्यदेखील आपोआप होत जाते. ते कधी थांबत नाही. ते कुणाला थांबविता येत नाही. स्वकीय सत्ता असेल, तर हे कार्य निरधोकपणे होते आणि परकीय सत्ता असेल, तर अडथळे पार करून केले जाते. या सर्वाचा विचार करताना ‘पाकिस्तानी म्हणजे कोण?’ याचे उत्तर आज पाकिस्तानकडे नाहीपाकिस्तान म्हणतो, ‘आम्ही इस्लामी आहोत आणि जगात पाकिस्तानची प्रतिमा इस्लामी दहशतवादी देश अशी आहे.’ ‘पाकिस्तानात जाऊ नका,’ अशा सूचना अमेरिका, इंग्लड, फ्रान्स इत्यादी देश आपल्या नागरिकांना देत असतात. जगात कुठेही मोठी दहशतवादी घटना घडली की, त्याचे काही धागेदोरे पाकिस्तानापर्यंत जाऊन पोहोचतात. अफगाणिस्तान आणि भारतात जेवढे म्हणून दहशतवादी हल्ले होतात, ते सर्व पाकिस्तानने घडवून आणलेले असतात. रझा रूमी नावचे पाकिस्तानी लेखक आहेत आणि त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे, ‘आयडेंटिटी, फेथ अॅण्ड कॉनफ्लीक्ट’ या पुस्तकात रूमी एक पाकिस्तानी म्हणून जगात प्रवास करत असताना आपल्याला काय काय सहन करावे लागतात, याचे किस्से सांगतात. आपला देश सर्व मतांचा आदर करणारा आणि सहिष्णू देश व्हावा, यासाठी ते आपल्यापरिने संघर्ष करीत आहेत. आपली ओळख एकमात्र धर्माच्या आधाराने करून देण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचे ‘शोकांतिक परिणाम’ कसे कसे झालेले आहेत, हेदेखील ते आपल्या पुस्तकात सांगतात. सामान्यत: पाकिस्तानातील प्रत्येक उदारमतवादी लेखक सध्या आपल्या ओळखीच्या शोधात गुंतलेला दिसतो. ती ओळख त्यांना लवकर सापडो आणि आम्ही पाकिस्तानी असलो तरी संस्कृतीने ‘आम्ही भारतीय आहोत,’ यांचा त्यांना लवकरात लवकर साक्षात्कार होवो, अशी अपेक्षा आपण बाळगूया.

 

9869206101

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/