तिचा सांस्कृतिक वारसा

    दिनांक  17-Oct-2018   खेळ - स्त्रीजीवन सुंदर व समृद्ध करणारा सांस्कृतिक वारसा ...


प्रत्येक सणाचे स्वत:चे खेळ. जसे, नवरात्रीच्या दरम्यान खेळला जाणारा भोंडला. लहान मुलींना एकत्र आणणारा हा सोहळा.

 

स्त्रीला वारशाने मिळालेले अनेक खेळ आहेत. सागरगोट्या, पट, कवड्या, सारीपाट, सापशिडी वगैरे बैठे खेळ. त्या शिवाय बाहेर खेळायचे खेळ वेगळे. प्रत्येक सणाचे स्वत:चे खेळ. जसे, नवरात्रीच्या दरम्यान खेळला जाणारा भोंडला. लहान मुलींना एकत्र आणणारा हा सोहळा. मध्ये रांगोळीने एक सुबक हत्ती काढून त्याची पूजा करायची. मग त्याच्या भोवती फेर धरून मजेदार गाणी म्हणायची. मनसोक्तपणे एकमेकीच्या उखाळ्या पाकळ्या काढून, थट्टा मस्करी करत हसत आणि हसवत चालणारा हा कार्यक्रम. गणेश वंदनेने सुरु होणारी गाणी, कारल्याचा वेल, माहेरचा वैद्य, झिपरं कुत्रं, नणंद – भावजय करत करत आडात शिंपला टाकून भोंडला संपवतात. तसाच श्रावणात नागपंचमीचा सण. सहसा आदल्या दिवशी रात्री मैत्रिणींनी एकत्र येऊन हातावर मेंदी काढण्यापासून नागपंचमीची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, स्त्रिया व मुली नवीन कपडे व दागिने घालून गावाबाहेर किंवा शेतावर जातात. तिथे नागाची पूजा करतात. या दिवसात मोठ्या वृक्षांच्या फांद्यांना झोके बांधले जातात. नागपंचमीचा थरारक खेळ म्हणजे या झोक्यांवर उंचच उंच झोके घेणे. गाणी म्हणणे, खेळ खेळणे.

 

नवविवाहितांसाठी असलेली मंगळागौरीची पूजा आपले वेगळे खेळ घेऊन येते. मंगळागौरीला शंकर-पार्वती या आद्य जोडप्याची पूजा केली जाते. शिव-पार्वती एक आदर्श जोडपं म्हणून पुरण कथांमधून येते. ते दोघे मिळून सारीपाट खेळतात. त्यात पार्वती हरली की ती शंकरावर रुसून बसते. मग पुढच्या डावात शंकर मुद्दाम हरून पार्वतीला जिंकू देतो. कधी पार्वती शंकराला, “फार कंटाळा आलाय, एखादी गोष्ट सांगा!” म्हणून हट्ट धरते. आणि शंकर तिला छानशी गोष्ट सांगतो. आणि बऱ्याच कथांची सुरुवात – “एकदा काय झालं? शंकर-पार्वती दोघे मिळून विमानातून जात होते. त्यावेळी...” अशी होते. शिव - पार्वती या प्रेमळ जोडप्याची पूजा मंगळागौरीला केली जाते. या पूजेला नव्या नवरी नटून थटून, दागदागिने घालून येतात. महादेवाची पिंड करून त्याची पूजा केली जाते. नव-याला दीर्घायुष्य मिळावे म्हणून नवरी प्रार्थना करते. दुपारी सुग्रास जेवण, रात्री मंगळागौरीची आरती आणि नंतर धम्माल जागरण. रात्री अनेक पारंपारिक खेळ खेळून, गाणी म्हणून मंगळागौर जागवली जाते.

 

“खुर्ची का मिरची जाशील कैशी”, “नाच ग घुमा, कशी मी नाचू” ... ही गाणी नव्या नवरीभोवती फेर धरून म्हटली जातात. “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर पिंगा घालतांना कंबरेतली ताकद पणाला लागते.गोफ विणू बाई गोफ विणू सारख्या खेळात सगळ्यांचा एकमेकींशी समन्वय आणि stamina चा कस लागतो, त्या शिवाय आगोटया पागोटया सारखे खेळ, कीस बाई कीस दोडका कीस, झिम्म्याचे अनेक प्रकार, कोंबडी आणि चक्कर येईपर्यंत फुगड्या असे अनेकविध खेळ होतात. मंगळागौर जरी नवीन नवरीची असली तरी खेळ खेळायला सर्व वयाच्या बायका असतात. या मजेदार व काही काही मिश्कील खेळात सगळ्याजणी दंग होऊन जातात. जागरणानंतर, देवीची आरती करून कार्यक्रमाची सांगता होते. कोणी असे म्हटले आहे की - We do not stop playing because we grow old; we grow old because we stop playing. वय झाल्यामुळे खेळणं बंद झालं हे चूक! खेळणं बंद झाल्याने वय झालं हे अधिक योग्य आहे. खरोखरच खेळण्याला वयाचं बंधन नाही. थोडा वेळ जरी खेळले तरी शरीर आणि मन दोन्ही हलकं होतं. त्या शिवाय खेळाचे इतर फायदे तर अनेक आहेतच, पण खेळाने तन आणि मन तरुण राहते हा सर्वात मोठा फायदा. स्त्रीला तारुण्याचा वर देणारा हा खेळांचा वारसा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/