पर्यावरण दिन विशेष – कचऱ्यातील धन

    दिनांक  05-Jun-2017   दोन आठवड्या मागे, ‘नाद बागेश्री’ तून प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न मांडला होता. समुद्रातील सूक्ष्म जीवांपासून व्हेल मास्या पर्यंत, गायींपासून हत्तींपर्यंत आणि पक्ष्यांपासून माणसांपर्यंत सर्वांच्या पोटात जाणारे प्लास्टिक एक मोठी आरोग्य समस्या होत आहे. पाणी, जमीन आणि हवा प्रदुषित करणारे प्लास्टिक, पुढील पिढ्यांसाठी एक गंभीर प्रश्न होऊ पहात आहे.

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलतांना, श्री मोदी म्हणाले, आपण जे निसर्ग उपभोगतोय ते आपल्या पूर्वजांनी झाडे लावली, पाण्याचे स्रोत शुद्ध ठेवले, हवा शुद्ध ठेवली म्हणून. आता ती जबाबदारी आपली आहे. आपण जर पर्यावरण शुद्ध ठेवले तरच पुढील पिढ्यांना ते मिळेल, नाहीतर त्यांच्यावर ऑक्सिजनचे मास्क लावून हिंडायची वेळ येईल. वृक्षारोपण करून झाडांना आपल्या परिवारातील एक सदस्य करणे जसे गरजेचे आहे, तसेच कचरा व्यवस्थापन व कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणे गरजेचे आहे.

कचऱ्यापासून खत आणि उर्जा अशी संपत्ती निर्माण केली तर कचऱ्याचा प्रश्न निश्चित सुटू शकतो.

मागील लेखात आवाहन केल्याप्रमाणे, आम्हाला अनेक वाचकांनी प्लास्टिकच्या कचऱ्याचे ते काय करतात या बद्दल माहिती पाठवली. अनेकांनी सांगितलेला एक उपाय होता, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधनाची निर्मिती! घरातील प्लास्टिक वेगळे साठवून ‘रुद्र’ या संस्थेला पाठवतात. ‘रुद्र’ मध्ये विकसित करण्यात आलेल्या यंत्राद्वारे ५० ते ५०० किलो पर्यंतच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक कचऱ्याचे ८ तासात विघटन करता येते. या विघटन प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिकचे विघटन होताना कोणताही दूषित वायू किंवा पाणी निर्माण होत नाही. या प्रक्रियेतून polyfuel ची निर्मिती होते. Polyfuel चा उपयोग केरोसीन प्रमाणे करता येतो, सहजच चुलीसाठी होणारी वृक्षतोड कमी होते. शिवाय polyfuel पासून वीजनिर्मिती सुद्धा होऊ शकते.

श्रीमती मेधा ताडपत्रीकर आणि श्री शिरीष फडतरे, यांनी २ वर्षांच्या अथक संशोधनानंतर या यंत्राची निर्मिती केली व ‘रुद्र एन्विरॉन्मेंटल सोल्यूशन’ हा उद्योग उभा केला. पुण्यातील अनेक ठिकाणांहून, महिन्यातील ठराविक दिवशी रुद्र द्वारे प्लास्टिकचा कचरा गोळा करून PolyFuel निर्मिती केली जाते. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या गरजेप्रमाणे या यंत्राची निर्मिती करून या प्रकल्पाद्वारे आपापल्या गावातील प्लास्टिक कचऱ्यापासून वीज निर्मिती करता येऊ शकते. ही वीज सार्वजनिक बागांमध्ये, किंवा रस्त्यावरच्या दिव्यासाठी वापरता येऊ शकते.
ठाणे येथील ‘उर्जा फौंडेशन’ द्वारे महिन्यातून एकदा किंवा दोनदा प्लास्टिकचा कचरा गोळा केला जातो. मागच्या एप्रिल मध्ये ‘उर्जा’ ने २.५ टन प्लास्टिक ‘रुद्र’ ला पाठवले. उर्जाची पुढीची Plastic Collection Drive ११ जून रोजी आहे, तेंव्हा ठाणे परिसरातील नागरिकांनी जरूर भाग घ्यावा.

ठाणे येथील श्री. कौस्तुभ ताम्हणकर मउ व स्वच्छ प्लास्टिक चक्क विकत घेतात. व त्यापासून लहान लहान packing pouch तयार करतात. हे packing pouch ते त्यांच्या उद्योगात packing साठी वापरतात.

पुणे येथील Poornam Ecovision ही संस्था पुण्यात ठिकठिकाणी दर रविवारी Plastic Collection Centers चालवते. या केंद्रांवर नागरिक घरात साठवलेले प्लास्टिक आणून देतात. या प्लास्टिक पासून पुनश्च प्लास्टिकच्या वस्तू जशा – कुंड्या किंवा dust bins तयार करून विकल्या जातात. काही प्लास्टिकचे Fuel मध्ये रुपांतर केले जाते. तर काही प्लास्टिक ‘आरोहाणा’ या संस्थेकडे दिले जाते. आरोहाणा मध्ये प्लास्टिकचे धागे करून त्याचे handloom वर अतिशय सुंदर पिशव्या तयार केल्या जातात.


 

श्री सुधीर तळवलकर रोज सकाळी फिरायला जातांना एक पिशवी सोबत घेऊन जातात. घरी परत येतांना प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या गोळा करून आणतात आणि रविवारी ‘पूर्णम’ च्या Plastic Collection Drive मध्ये देतात. त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन अनेकांनी दर रविवारी आठवड्याभराचे प्लास्टिक, पूर्णम केंद्राला देण्याचा संकल्प केला आहे!


 

पुण्याच्या सौ. प्रभा तासगावकर घरात आलेली प्रत्येक प्लास्टिकची पिशवी व्यवस्थित ठेवून, महिन्यातून एकदा ठरलेल्या भाजीवाल्याकडे देतात. सहजच ती पिशवी किमान दोनदा वापरली जाते.
पुण्यातील सौ नीला पंचापोर या प्लास्टिकचे लहान मोठे डबे तसेच बाटल्या झाडे लावायला व कंपोस्ट करायला वापरतात. त्या नवीन कुंडी विकत घेण्यापेक्षा भंगार मधून स्वस्त आणि मस्त जुने डबे घेतात. आणि जे ‘कचरा’ म्हणून फेकून दिले असते, त्याचे रुपांतर लहानशा बागेत करून, त्याची चांदी करतात!

पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या वाचकांनी आम्हाला अनेक उपाय पाठवले. जागे अभावी सर्व येथे लिहू शकत नाही, पण ते उपाय आमच्या पर्यत पोचवल्या बद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद!
हे उपाय वाचल्यावर, प्लास्टिक हा खरच कचरा आहे का, की नीट वापरल्यास संपत्ती आहे, असा प्रश्न पडला!

Notes:

⦁ Poornam Ecovision, Pune – 9075008994
⦁ Koustubh Talwalkar, Thane – 9819745393
⦁ Rudra Recycling, Pune - 020 25448900
⦁ Urja Foundation, Thane –
⦁ Minal - 9967540339
⦁ Vidya Paranjpe - 9820807362
⦁ Arohana Bags, Pune – 9702422111

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचा हा व्हिडियो निश्चितच प्रत्येकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.

Embeded Object