#ओवी Live - स्वीकार

    दिनांक  05-Mar-2017   

पाय आपटत निधी आजीच्या जवळ येऊन बसली. आजीने पोथी बाजूला ठेवली, आणि निधीला म्हणाली, “तूला विष्णूची एक गोष्ट सांगू का?”

“सांग!”, निधी कोरडेपणाने म्हणाली.

“एकदा काय झाले? ‘भृगु संहिता’ हा ज्योतिषावरचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे भृगु ऋषी, ब्रह्माच्या सभेत गेले. आणि ब्रह्माला नमस्कार न करता सरळ आपल्या आसनावर जाऊन बसले. तेंव्हा ब्रह्माचा क्रोध पाहून भृगु ऋषी म्हणाले, ‘मी कशासाठी आलोय ही विचारपूस न करता, क्षुल्लक कारणाने अपमान झालाय असे वाटून तुला राग आला! मी शाप देतो – पृथ्वीतलावर कोणीही तुझे मंदिर बांधणार नाही!’

“इतके बोलून भृगु ऋषी तडक कैलासाकडे चालते झाले. इथेही त्यांनी शंकराला नमस्कार केले नाही. शिवाच्या नेत्रातील क्रोध पाहून भृगु ऋषींनी शिवालाही शाप दिला – पृथ्वीवर तुझ्या मूर्तीची पूजा होणार नाही!
“तिथून भृगु ऋषी निघाले ते विष्णूकडे. शेषशाई विष्णू निवांत पहुडले होते! तेंव्हा भृगु ऋषींनी विष्णूला छातीवर लाथ मारून उठवले. विष्णूने डोळे उघडले, आणि लगेच उठून ऋषींना विचारले, ‘तुमच्या पायाला लागले तर नाही ना? या बसा. कोणत्या कारणाने येणे केले?’ तत्काळ भृगु ऋषींचा राग निवळला आणि त्यांनी विष्णूला आशीर्वाद दिला – तुझी सर्वत्र पूजा होईल! जगभर तुझी मंदिरे बांधतील!”, आजी म्हणाली.

“विष्णूने ऋषींच्या त्राग्याचा स्वीकार केला, असेच ना?”, निधीने विचारले.

“आणि म्हणूनच त्या त्राग्याच्या पलीकडे ऋषींचे काय म्हणणे आहे ते ऐकता आले! तुला आता घरी आल्या आल्या आई रागावली, उशीर झाला म्हणून. पण त्या रागाच्या पलीकडेची तिची काळजी तुला दिसली का ग?”, आजीने हळुवारपणे विचारले.

“नाई ग आजी! चुकलच माझं. मी उगीच तिला काहीबाही बोलले. खरे तर तिचे प्रेमापायी माझ्यावरचे रागावणे मी accept करायला हवे होते.”, निधी म्हणाली.

ज्ञानेश्वर म्हणतात –

विष्णूने भृगु ऋषींनी केलेला अपकार, अपमान स्वीकारला. नुसता स्वीकारला नाही तर प्रसन्नपणे तो आपल्या छातीवर अलंकार म्हणून मिरवला! गुरुप्रसाद म्हणून विष्णूने श्रीवत्सलांच्छन चिन्ह बाळगले, तिथे आपल्यासारख्यांनी किमान घरच्यांनी जर काही कमी जास्त बोलले तर सहन करावे.

जी भृगीचा कैसा अपकारु | की जो मानुनी प्रियोपचारु |
तोषेचिना शारंगधरू | गुरुत्वासी || १६.२६ ||

 

-दीपाली पाटवदकर