
मागील तीन लेखांमध्ये आपण हलाल संकल्पना काय आहे ते पाहिले. कुराण मध्ये मांस किंवा आहार यापुरत्या मर्यादित असलेल्या या संकल्पनेचा आज प्रचंड विस्तार झालाय.... नव्हे जाणीवपूर्वक केला गेलाय आणि आता खाद्य पदार्थ ते 'हलाल अर्थव्यवस्था' असा बराच पल्ला गाठला गेला आहे!! खाद्य उद्योगच नव्हे तर सर्व उद्योगक्षेत्रांना सामावून घेणारी 'हलाल अर्थव्यवस्था' उभी करण्यात आली आहे. जगात वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थेविषयी माहिती करून आणि समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे.
हलाल अर्थव्यवस्थेचा प्रारंभ मलेशियमध्ये झाला. अर्थव्यवस्था सबळ करायची असल्यास बँक आणि उद्योग हे एकमेकांना अनुकूल असणे आवश्यक असते. त्यासाठी मलेशिया मध्ये सर्वप्रथम 'हलाल उत्पादने उद्योग' आणि 'इस्लामिक बँक' यांना इस्लामिक विचारांच्या आधारे एकमेकांना पूरक बनविण्यात आले. इस्लामिक बँकेच्या आधाराने हलाल उत्पादने बाजारात आणली जात आहेत. शरीयत कायद्यानुसार मुसलमानांना व्याज घेणे आणि देणे प्रतिबंधित आहे. त्या तत्वांच्या आधारावर इस्लामिक बँकेची रचना करण्यात आली. १९८३ मध्ये मलेशिया मध्ये 'इस्लामिक बँकिंग ॲक्ट' नुसार 'इस्लामिक बँकिंग अँड फायनान्स (IBF)' सुरू झाले. हलाल उत्पादने आणि इस्लामिक बँकिंग यांच्या आधारावर हलाल अर्थव्यवस्थेची संकल्पना निर्माण केली गेली. २०११ मध्ये मलेशिया शासनाने हलाल उत्पादने उद्योग (हलाल प्रॉडक्ट इंडस्ट्री) सुरू केला. सन २०१३(*६)मध्ये मलेशियातील कौलालंपुर येथे 'वर्ल्ड हलाल रिसर्च' आणि 'वर्ल्ड हलाल फोरम' यांच्या अधिवेशनात हलाल अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर सन २०१३ मध्ये झालेल्या जागतिक हलाल सप्ताह परिषदेत हलाल उत्पादने उद्योग आणि इस्लामिक बँकिंग अँड फायनान्स यांच्यात समन्वय साधून हलाल अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे निश्चित करण्यात आले.
हलाल उद्योगांचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, हलाल उत्पादनातील मिळालेला नफा पुन्हा बँकेत जमा करायचा आणि त्यातून पुन्हा हलाल उद्योगांना सहाय्य करायचे. त्यामुळे इस्लामिक बँकिंग च्या स्थितीत लक्षणीय पालट झाल्याचे दिसून येते. मलेशियाचेच उदाहरण घ्यायचे तर इस्लामिक बँकेच्या संपत्तीमध्ये वर्ष २००० मधील ६.९ टक्क्यांचा वृद्धी च्या तुलनेत २०११ मध्ये २२ टक्के एव्हढ्या वृद्धीची नोंद झाली आहे. यातील इस्लामिक बँक संकल्पना आणि त्याचा वापर यासंबंधी नंतर जाणून घेऊयात.
हलाल उत्पादने उद्योगांचा संकल्पने संबंधी थोडी माहिती घेऊ.
हलाल ची मुळ संकल्पना ही पशू मांस आणि काही खाद्यपदार्थ या पुरती मर्यादित होती. मागील लेखात आपण पाहिल्या प्रमाणे एकूणच खाद्यपदार्थ यात समाविष्ट करण्याचा विचार झाला. त्याप्रमाणे हलाल अर्थव्यवस्थेची मूळ संकल्पना 'शेतातून ग्राहकापर्यंत' (Farm to Fork) अशी होती. त्याअनुषंगाने उत्पादन करणाऱ्या पासून ते ग्राहकापर्यतची साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. जसं जसा हलाल अर्थव्यवस्थेचा विचार वाढू लागला तेव्हा शेतातून ग्राहकापर्यंत उत्पादने पोचविणे आणि त्यातून अर्थनियोजन करण्याचा व्यापक विचार मांडला जाऊ लागला. त्यातून हलाल अर्थव्यवस्थेचा व्यापक विचार पुढे आला. हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) या बँकेची एक शाखा 'HSBC अमानाह मलेशिया' ही इस्लामिक बँक आहे. याचे कार्यकारी अधिकारी रेफ हनीफ हे काय म्हणतात पहा "जर आपल्याला हलाल अर्थव्यवस्थेकडे पाऊल टाकायचे असेल, तर आपण अधिक व्यापक विचार केला पाहिजे आणि अर्थनियोजनापासून ते उत्पादनापर्यंत संपूर्ण साखळी हलाल करण्याचा प्रयत्न करायला हवा" हलालच्या व्यापकतेचा अंदाज यातून आपल्याला येऊ शकतो!!
यातूनच सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींमध्ये हलालचा आग्रह सुरू झाल्याचे दिसते. इस्लामी धर्मग्रंथांमध्ये मांस वगळता अन्य क्षेत्रांसाठी हलाल संकल्पना स्पष्टपणे मांडलेली नाही. त्यामुळे हलाल कशाला म्हणायचे हे स्थानिक स्थितीनुसार ठरविले जात आहे आणि त्याद्वारे हलाल संकल्पनेचा विस्तार केला जात आहे. आता हलाल ही संकल्पना केवळ मांस पदार्थ याच्याशी निगडित न रहाता अर्थव्यवस्थेशी जोडली गेल्यामुळे काही वर्षांपूर्वी ज्याला हराम ठरविले गेले होते त्या गोष्टीही आज हलाल ठरविल्या जात आहेत!! दोन उदाहरणे पाहू....
अजानची हाक हा ईश्वराचा पवित्र ध्वनी मानला जाई, त्यासाठी मानवनिर्मित यंत्रांचा वापर करणे हराम मानले जाई, वाढती जनसंख्या आणि अन्य धर्मियांकडून होणारा वापर लक्षात घेऊन त्याच ध्वनिक्षेपक यंत्राला नंतरच्या काळात हलाल ठरविण्यात आले आणि आज सर्व मशिदींवर हेच ध्वनिक्षेपक मोठया आवाजात लावले जातात.
काही वर्षांपूर्वी सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून मेकअप करण्याला हराम मानले जात होते. ISIS किंवा अन्य अतिरेकी संघटना किंवा अफगाणिस्तान येथे सौंदर्य प्रसाधने वापरली म्हणून महिलांना शिक्षा दिल्याची वर्णने आपण वाचली असतीलच. नुकतेच एकाने आपल्या पत्नीने आयब्रोज वापरले म्हणून तलाक दिल्याची घटनाही वाचली असेल!! परंतु हलाल अर्थव्यवस्थेचा विचार करून आता मात्र सौंदर्यप्रसाधनांनाच हलाल प्रमाणपत्र दिले जात आहे. अशाप्रकारे नियमांमध्ये पालट करून हलाल संकल्पना व्यापक करण्यात येत आहे.
अशी ही हलाल संकल्पना आज केवळ उत्पादनांपुरती मर्यादित न राहता सर्व प्रकारच्या सेवांनाही व्यापून राहिली आहे. याची काही उदाहरणे पाहुयात....
१. हलाल मॉल्स - हलाल प्रमाणित साहित्याची दुकाने, हलाल प्रमाणित खाद्यपदार्थ, तसेच मुसलमानांना प्रार्थना करण्यासाठी वेगळी प्रार्थना सुविधा यांचा समावेश
२. हलाल प्रमाणित गृह संकुल - केरळ येथील कोची येथे असे पहिले संकुल बनत आहे. गुगल वर सर्च केल्यास बंगळुरू तसेच अन्य ठिकाणच्या हलाल गृहसंकुलांची माहिती मिळू शकेल. यात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगळे तरण तलाव, वेगवेगळी प्रार्थना घरे काबाच्या दिशेपासून दूर असणारी शौचालये, नमाजाची वेळ दाखविणारी घड्याळे, प्रत्येक घरात नमाज ऐकू येण्याची व्यवस्था अशा विविध शरीयतच्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यवस्था/सुविधा आहेत.
३. हलाल प्रमाणित रुग्णालय (*७)- चेन्नई, तामिळनाडू येथील ग्लोबल हेल्थ सिटी हे रुग्णालय हलाल प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहे. ते असा दावा करतात की आम्ही इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे स्वच्छता ठेवतो आणि हलाल आहार देतो.
४. हलाल वाहतूक (Logistics) - यात कोणत्याही अन्नपदार्थांची आणि त्याच्याशी संबंधित घटकांची आणि कच्य्या मालाची वाहतूक करताना त्यांना कोणत्याही हराम पदार्थांचा संसर्ग होणार नाही तसेच त्यामुळे अन्नपदार्थ दूषित होणार नाहीत याची काळजी घेतली जाते!!
५. हलाल पर्यटन - या अंतर्गत मुस्लिम देशात हलाल भोजन, हलाल विमानप्रवास, हलाल निवास, हलाल हॉटेल, प्रार्थना स्थळ आदी उपलब्ध करून दिले जाते. इस्लामी नसलेल्या देशात सुद्धा मुसलमान पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष इस्लामी सुविधा द्याव्यात यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अल हलाल टुरिझम हे अशा प्रकारची सेवा पुरवतात.
६. हलाल डेटिंग संकेतस्थळे - शरीयतवर आधारित हलाल डेटिंग वेबसाईट. यात मिंगल, मुस्लिमा (*९) अशी संकेतस्थळे आहेत.
यात अधिक उदाहरणेही देता येतील. विस्तारभयास्तव आत्ता एव्हढेच पुरेसे आहे.
अशी ही हलाल अर्थव्यवस्था उभी करायची झाल्यास त्याची काही रचना लावायला हवी. एखादे उत्पादन किंवा सेवा हलाल हे ठरवायचे कसे? त्यासाठी हलाल प्रमाणपत्राची सक्ती करणे सुरू झाले. हलाल सर्टिफिकेट हा हलाल अर्थव्यवस्थेचा आर्थिक आधारही बनला. वास्तविक हलाल अर्थव्यवस्थेत उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत संपूर्ण साखळीत इस्लामी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असला तरी बाजारात अगोदरपासून उपलब्ध असलेल्या जागतिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या ब्रँड्स ना आव्हान देणे किंवा त्या तोडीची दर्जेदार उत्पादने बनविणे आजतरी त्यांना शक्य नाही. तसेच सेक्युलर देशांमध्ये आस्थापनांमध्ये केवळ मुसलमान कर्मचारी नेमणे शक्य नसते. अशा देशातील उद्योजकांना तसेच इस्लामी देशात निर्यात करणाऱ्या उद्योजकांना हलाल सर्टिफिकेट घेण्यास बाध्य केले जात आहे.त्यासाठी मोठे शुल्कही आकारले जात आहे. या शुल्कातूनही हलाल अर्थव्यवस्थेला सहाय्य होत आहे. हा एक प्रकारचा जिझिया करच नव्हे काय?
या हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून इस्लामी व्यवस्थेकडे कशी वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे हे सहजपणे कळून येईल. हलाल प्रमाणपत्र सक्तीचे करण्यामागची जी कारणमीमांसा सांगितली जाते ती अशी.....
इस्लाम मध्ये जे हराम मानलेले आहे त्याचा मुसलमानांनी स्वीकार केल्यास त्यांना परलोकात अल्लाहची शिक्षा भोगावी लागेल. त्यामुळे मुसलमान ग्राहक खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेऊ इच्छितात.... जसे....
* ते खाद्यपदार्थ इस्लामच्या शरीयत कायद्यानुसार उत्पादित केले गेले आहेत का?
* त्यातील घटक इस्लामनुसार ग्राह्य (हलाल) आहेत का?
* त्यात इस्लामनुसार कोणतेही अशुद्ध (हराम) पदार्थ समाविष्ट नाहीत ना?
इस्लामी संस्था या संदर्भातील पडताळणी करतात आणि उत्पादन वरील निकषांनुसार हलाल असल्यास त्याला हलाल प्रमाणपत्र देतात. असे पदार्थ मुसलमान निःसंशय खरेदी करू शकतात.
या हलाल प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा काही अटी आहेत.... (*२ /८)
१. हलाल प्रमाणपत्रासाठी कोणतीही पडताळणी ही उत्पादनाच्या चालू प्रक्रियेच्या दरम्यान केली जाईल.
२. उत्पादन किंवा ते टिकविण्याची प्रक्रिया यासाठी रक्त, डुकराचे मांस, डुकराची चरबी, त्याची घटक उत्पादने आणि अल्कोहोल यापासून बनविलेली एंझाईमस आणि इमल्सिफायर वापरले जाऊ नयेत. ते वापरायचे असल्यास हलाल स्त्रोतातूनच घेतलेले असावेत.
३. हलाल उत्पादनांची निर्मिती करताना, त्यावर प्रक्रिया करताना, त्यांची वाहतूक करतांना किंवा साठवणीच्या वेळी ती उत्पादने हराम मानलेली उत्पादने किंवा घटक यांच्या संपर्कात नसावीत.
४. उत्पादनांची निर्मिती करणे, ती गोळा करणे, धुणे किंवा साठवणे या प्रक्रियांमध्ये हलाल असलेले किंवा हलाल नसलेले पदार्थ एकत्र येऊन त्याचे मिश्रण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनाच्या सर्व प्रक्रियात हलाल आणि हराम पदार्थांसाठी वेगवेगळी उपकरणे वापरणे अथवा व्यवस्था करणे आवश्यक आहे.
५. हलाल उत्पादन विभागामध्ये काही मुसलमान कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. तसेच त्या विभागात काम करणाऱ्या अन्य सर्व कर्मचाऱ्यांवर हलाल नसलेले खाद्यपदार्थ किंवा पेये त्या उत्पादन क्षेत्रात आणण्यास बंदी असावी
मंडळी, या अटी आणि शर्ती यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येईल की
• हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचा निरीक्षक हा मुसलमानच असणार. म्हणजेच धार्मिक आधारावर याचा आग्रह धरला आहे.
• उत्पादन विभागात मुस्लिम कर्मचारी नियुक्त करण्याची सक्ती करण्यात येत आहे. एका अर्थी धार्मिक आधारावर उद्योगांचे इस्लामीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकप्रकारे मुस्लिम आरक्षणाची ही व्यावस्थाच नव्हे काय?
• सर्व कर्मचाऱ्यांना हलाल नसलेले खाद्यपदार्थ किंवा पेये उत्पादन क्षेत्रात आणण्यास बंदी घातली जात आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, खानपान स्वातंत्र्य यावर घालाच नाही का?
नीट पाहिल्यास लक्षात येईल की मुसलमानांच्या धार्मिक मान्यतेनुसार खाद्यपदार्थ विकत घेता येण्याच्या आडून हलाल अर्थव्यवस्था पुष्ट करणे हा हलाल प्रमाणपत्रामागील खरा उद्देश आहे!!
वास्तविक पहाता कोणत्याही खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करण्याची काही सूत्रे शासकीय यंत्रणांमार्फत तपासली जातातच. त्यासाठी तांत्रिक चाचण्या, काही विशेष चाचण्या असतात. FDA हे त्यानुसार प्रमाणपत्र देते. हलाल प्रमाणपत्रासाठी वरील सूत्रात कोणतीही तांत्रिक चाचणी किंवा विशेष कौशल्य आढळत नाही. या हलाल प्रमाणपत्राच्या द्वारे विशिष्ट धार्मिक तांत्रिक मुलामा देऊन एक अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.
या हलाल प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारणी केली जाते. नवीन नोंदणी, नूतनीकरण, उत्पादनावर हलाल लोगोची छपाई, निरीक्षकाचा (ऑडिटर) खर्च यासाठी मोठ्याप्रमाणात शुल्क आकारले जाते. भारतातील उत्पादनांची संख्या, विदेशात निर्यात होणाऱ्या उत्पादनांची संख्या लक्षात घेता हा आर्थिक व्यवहार किती प्रचंड मोठा आहे हे लक्षात येईल!!
हलाल प्रमाणित उत्पादनांच्या वेस्टनांवर (पॅकिंग) हलाल लोगो वापरण्यात येतो जेणेकरून ते उत्पादन हलाल असल्याची खात्री करता येते. आपण जर निरीक्षण केलेत तर मुसलमान ग्राहक मॉल मध्ये सुद्धा हलाल प्रमाणित वस्तूच घेतात. अन्य घेत नाहीत. आणि त्यासाठी हलाल लोगो असलेल्या मलाचाच शोध तिथे घेत असतात!!
हे हलाल प्रमाणपत्र अधिकाधिक जणांनी घ्यावे यासाठी हलाल पदार्थ ग्रहण न केल्यास पाप लागेल आणि दंड होईल हे सामान्य मुस्लिमांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मुस्लिम मंडळी हलाल चा आग्रह धरू लागली आहेत. मध्यंतरी X (ट्विटर) वरील Zomato वरील हलाल संबंधी ट्विट आपण वाचली असतीलच. व्यापार वृद्धीचे आमिष दाखवून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गळी ही संकल्पना उतरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेसारख्या देशात हलाल ब्रॅण्डिंग चे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत. एव्हढेच नाही तर मागील लेखात पाहिल्याप्रमाणे धार्मिक अधिकारात कायदेशीर खटले भरूनही दबाव आणला जातोय. 'युनायटेड वर्ल्ड हलाल डेव्हलपमेंट' (UNWH) मार्फत प्रत्येक वर्षी १ नोव्हेंबर या दिवशी जगाच्या वेगवेगळ्या भागात 'जागतिक हलाल दीन' साजरा केला जातो. या दिवशी 'जागतिक हलाल एक्स्पो' हे प्रदर्शन ठिकठिकाणी आयोजित केले जाते..... एकूणच जागतिक स्तरावर हलाल अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात स्थापित होताना दिसत आहे आणि त्याचे परिणाम लवकरच सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडताना दिसून येतील!!
भारतात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था प्रामुख्याने पुढीलप्रमाणे:-
१. हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
२. हलाल सर्टिफिकेशन सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
३. जमियत ऊलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट
४. जमीयत उलेमा - ए - महाराष्ट्र
५. हलाल कौन्सिल ऑफ इंडिया
६. ग्लोबल इस्लामिक शरीया सर्विसेस
या सर्व अशासकीय संस्था असून काही तर विश्वस्त संस्था आहेत. त्यांना अशा प्रकारचे व्यापारिक कार्य करण्याची किंवा प्रमाणपत्र देण्याची कुठलीही अनुमती नाही. यापैकीच काही संस्थांवर उत्तरप्रदेश सरकारने नुकतीच कारवाई सुरू केल्याचे लक्षात येईल!
हलालची ही अशी प्रचंड वाढलेली व्याप्ती आहे.
तूर्तास थांबू. पुढील भागात आपण हलाल चा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचे विवेचन करुयात आणि नंतर इस्लामिक बँकिंग आणि फायनान्स याची थोडीशी माहिती करून घेऊयात.
- अरविंद श्रीधर जोशी
(टीप - धार्मिकतेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम या संदर्भात झालेले संशोधन आणि अभ्यास सर्वांसमोर मांडला जावा आणि त्या द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम समजावा आणि ती सुदृढ व्हावी हा या लेखांचा उद्देश आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे किंवा कोणामध्ये तेढ निर्माण करणे हा यामागील उद्देश नाही.)
संदर्भ :-
१. हिंदू जनजागृती समिती प्रकाशित पुस्तक " भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण? हलाल जिहाद?" या पुस्तकात आणखीन काही संदर्भ दिले आहेत
२. www.jamiathalaltrust.org
३. https://youtu.be/nNtV-egWGS8 - Halal Economy and Zatka meet movement - Ravi Ranjan Sing
५. https://myislam.org
या शिवाय कुराणाच्या भाषांतर असलेल्या अन्य साइट सुद्धा आहेत
६.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.gayatravel.com.my/world-halal-week-2013-reaches-a-significant-milestone-for-the-nations-halal-industry/&ved=2ahUKEwjuu6L8--GCAxVSUGwGHdfGCqMQFnoECBcQAQ&usg=AOvVaw0Ja2ijnTVaolS9xkWqiCcz
७.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://halalfocus.net/india-first-hospital-in-india-to-achieve-halal-certification/&ved=2ahUKEwj_2M7h_eGCAxU8s1YBHYuVDFYQFnoECCkQAQ&usg=AOvVaw27fi133EZIwwDFNFLjKtBL
८.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://halalindia.co.in/halal-certification/&ved=2ahUKEwjYk9-N_uGCAxUDtlYBHTqgCJgQFnoECDUQAQ&usg=AOvVaw0lZdR8pZNawgmD6-w-tEKD