राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा एका भीषण अग्नितांडवाने हादरली आहे. दिल्लीतील मालवीय नगर परिसरातून बुधवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली. हौझ राणी भागातील पाचमजली लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जातेय. प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आग इतक्या वेगाने पसरली की रेस्टॉरंटमधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, आणि अनेक जण वरच्या मजल्यावर अडकून पडले. तर काहींनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या. याशिवाय मृतांपैकी बहुतांश परदेशी नागरिक असल्याचा दावाही आता करण्यात येतोय. मात्र ही आग नेमकी कशी लागली? यापूर्वी अशा किती घटना घडल्यात? आणि या अग्नितांडवाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर जाणून घेऊयात.... (Delhi Fire Tragedy)
राजधानी दिल्लीतील या अग्नितांडवाने पुन्हा एकदा शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सकाळी सुमारे ९ वाजून ४५ मिनिटांनी घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन पथके घटनास्थळी रवाना झाली, मात्र प्राथमिक माहितीनुसार ही आग सुमारे ८.५० च्या सुमारास लागली असल्याचं समजतयं. आग लागलेल्या इमारतीत रेस्टॉरंटसोबत हॉटेल सुविधाही असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे या इमारतीत ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ होती. आग लागल्यानंतर काही क्षणांतच धुराचे लोट पसरले आणि संपूर्ण परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. (Delhi Fire Tragedy)
स्थानिक नागरिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि बालकनीमधून खाली उड्या मारल्या. काहींना वाचवण्यासाठी स्थानिकांनी खाली गाद्या अंथरल्या आणि लोकांना त्या दिशेने उडी मारण्यास सांगितले. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांच्या डोळ्यांसमोरच अनेक जण वरून खाली उड्या मारत होते. एक व्यक्ती उडी मारताना गंभीर जखमी देखील झाली, तर काहींना गंभीर दुखापतही झाल्याचे सांगण्यात येतय. हे दृश्य इतके भीषण होते की संपूर्ण परिसरात भीती आणि संभ्रम निर्माण झालाय. (Delhi Fire Tragedy)
अग्निशमन दलाने ३७ जणांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, सुरुवातीला ११ जखमींना बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, मात्र नंतर बचावकार्य वेगाने सुरू ठेवत बऱ्याच लोकांना वाचवण्यात आले. एकूण १० अग्निशमन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आत कोणी अडकले आहे का, हे तपासण्यासाठी मोठ्या तत्परतेने बचावकार्य राबवण्यात आलं. दरम्यान वीजपुरवठा विभागाने तातडीने विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठी मदत झाल्याचेही सांगितलं जातयम. (Delhi Fire Tragedy)
प्राथमिक तपासात लेमन ग्रीन रेस्टॉरंटकडे अधिकृत परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच, ज्या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडली, ते ठिकाण नियमबाह्य पद्धतीने चालवले जात होते का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले. तरी, शॉर्ट सर्किट, गॅस गळती किंवा इतर तांत्रिक कारणांची शक्यता तपासली जात आहे. (Delhi Fire Tragedy)
दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही या दुर्घटनेची दखल घेण्यात आली असून, पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोक व्यक्त करत बाधित कुटुंबांना सर्वतोपरी वैद्यकीय आणि प्रशासकीय मदत दिली जात असल्याचे सांगितले. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Delhi Fire Tragedy)
त्याबरोबरच, दिल्लीमध्ये आगीच्या घटना काही नव्या नाहीत. मालवीय नगर अग्नितांडवाच्या अवघ्या एक दिवस आधी मुकुंदपूर परिसरात कथित एलपीजी सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळून १० जण जखमी झाले होते. त्याआधी ३ मे रोजी विवेक विहारमधील चार मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेत अग्निशमन दलाला १२ ते १४ जणांना वाचवण्यात यश आले होते. यापूर्वी १८ मार्च रोजी पालम परिसरातील रामफल चौकाजवळील पाच मजली इमारतीला भीषण आग लागून तीन मुलांसह एका कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. ही आग एवढी भीषण होती की, ३० हून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. या सलग घटनांमुळे राजधानीतील व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. परवाने, इमारतीतील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, वीजव्यवस्था आणि गॅस सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले तर अशा दुर्घटना कशा भयावह रूप धारण करतात, हे या घटनांतून स्पष्ट दिसते. आता एवढ्या लोकांनी आपले जीव गमावल्यावर आता तरी या घटना थांबनार का हे पुढे पाहाण्यासारखं असणार आहे. (Delhi Fire Tragedy)