आरोपांनंतरही पाठबळ

Total Views |
 
DG Suryawanshi
 
तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष स्वतःच्या ताब्यात घेत सवत सुभा केल्यानंतर, ठाकरेंसोबत राहून स्वत:चा राजकीय अस्त करून घेण्यापेक्षा अनेक बिनीच्या शिलेदारांनी शिंदे यांनाच जवळ केले. त्यामुळे राज्यभर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत फिरणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट, नाशिकमध्ये पुरता क्षीण झाला आहे. नाही म्हणायला, महापालिका निवडणुकीत नाशिकरोड भागाने तारल्याने, महापालिकेत थोडे-फार तरी नगरसेवक निवडून आले. नाहीतर, तेथेही पानिपत अटळच होते. त्यातही सध्या नाशिकमध्ये उबाठा गटात सारे काही आलबेल नसल्याचे, नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट झाले. उबाठा गटातील महिला पदाधिकाऱ्याने विद्यमान जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत, पक्ष नेतृत्वाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यात नुकत्याच नाशिक भ्रमंतीवर आलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासमोरही या महिला पदाधिकाऱ्याने दाद मागितली. पण, मुंबईला गेल्यानंतर या प्रकरणावर निर्णय घेऊ असे सांगत, या महिला पदाधिकाऱ्याची बोळवण करण्यात आली.
 
आदित्य ठाकरे मुंबईला गेल्यानंतर लगोलग नाशिकची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आलेल्या डी. जी. सूर्यवंशी यांना अभय देताना, त्यांच्याकडील पदभार कायम ठेवण्यात आला. त्यामुळे संसदेत आणि संसदेबाहेरही महिला सक्षमीकरणासाठी गळे काढणारे ठाकरे यांचे पदाधिकारी, खरंच महिलांचा प्रश्न पोटतिडकीने मांडतात का? यावरच भले-मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झालेल्या आरोपांनंतर पक्षनेतृत्वाने कोणती भूमिका घ्यावी, याबाबत उबाठा गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे. विशेषतः आरोप समोर आल्यानंतरही सूर्यवंशी यांना पदावर कायम ठेवण्यात आल्याने, विविध प्रश्नांना तोंड फुटले आहे. या प्रकरणात उबाठा पक्षाने महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आणि आरोप गांभीर्याने घेणे आवश्यक असून, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांना काही काळ तरी घरी बसविण्याची गरज होती.
 
‌‘उबाठा‌’ गटाची माघारी
 
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय आखाडे रंगण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचे बघायला मिळाले. याउलट, महाविकास आघाडीच्या गोटात मात्र भयाण शांतताच नजरेस पडली. काल-परवापर्यंत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा करणाऱ्या उबाठा गटाने, नाशिकच्या जागेसाठी माजी आमदार वसंत गिते आणि अनिल कदम आमचे उमेदवार असतील अशा वल्गनाही केली. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याचेदेखील कष्ट त्यांनी घेतले नाही. महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेतल्यास, विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव महत्त्वाची ठरते. उबाठा गटाचे स्थानिक पातळीवरील संख्याबळ अगदीच मर्यादित आहे. त्यामुळे निवडणूक लढवून स्वतःचा कपाळमोक्ष होणार हे माहित असल्याने, पराभवाची नामुष्की टाळण्यासाठीच असा निर्णय घेतला असावा. म्हणूनच नरेंद्र दराडे यांच्यावर आगपाखड करत, निवडणुकीतून माघार घेण्याचा पर्याय निवडण्यात आल्याचे राजकीय विलेषक सांगत आहेत.
 
त्यातच पक्षाचा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला लढत देऊ शकेल, इतके मतदारांचे पाठबळ महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले तरी त्यांच्याकडे नाही. पक्षातील फूट, पदाधिकाऱ्यांचे स्थलांतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी होत गेलेले प्रतिनिधित्व, यामुळे उबाठा गटाची ताकद अगदीच क्षीण झाली. अशा परिस्थितीत, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी माघार घेण्याचा निर्णय हा राजकीय अपरिहार्यताच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा निर्णय वास्तवातील कमकुवत संघटनात्मक स्थिती लपविण्याचाच प्रयत्न म्हणावा लागेल. नाशिक विधान परिषद निवडणुकीतून उबाठा गटाची माघार ही राजकीय वास्तव स्वीकारल्याची कबुली म्हणायाची की रणनीतिक चाल, यावर मतभेद असू शकतात. मात्र, या निर्णयामुळे पक्षाच्या संघटनात्मक क्षमतेवर आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निश्चित मानले जात आहे.




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.