मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या नमाज पठणामुळे वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून रस्त्यावरील नमाज पठण तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या मागणीत प्रामुख्याने माडलेल्या मुद्द्यांनुसार, दर शुक्रवारी भर दुपारी, कामकाजाचा दिवस असतानाही रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर नमाज पठण केले जाते. यामुळे सुमारे एक तास संपूर्ण भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडते आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही एका समाजातील काही लोकांना अशा प्रकारे भरदिवसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवस्थेत आणि कामात अडथळा आणण्याचा अधिकार देता येणार नाही, असे सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.
सध्या काही मर्यादित ठिकाणी होत असलेल्या या प्रकारांचे उदाहरण देऊन भविष्यात संपूर्ण मुंबई शहरात धर्माच्या नावाने अशीच 'दादागिरी' सुरू होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. काही धर्मांध, जिहादी मुस्लिम आणि दादागिरीच्या प्रवृत्तीचे लोक 'नमाज हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे' अशा अविर्भावात वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खेळाची मैदाने, उद्याने किंवा खुल्या जागांवर धार्मिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर न्यायालयाचे स्पष्ट निर्बंध आहेत. असे असताना रेल्वे स्टेशनबाहेर किंवा चौकात नमाज पठण कसं करू दिलं जातं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर इथे परवानगी दिली, तर उद्या इतर ठिकाणीही अशीच मागणी केली जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रस्त्यावरील हे नमाज पठण रोखणे ही मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस सहआयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने यावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.