हलालच्या नावाखाली नेमके काय घडतेय?

    02-Jun-2026   
Total Views |
 
माझ्या प्रास्ताविक असलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे हलाल संकल्पना ही आता केवळ मांसान्न एव्हढ्यावरच सीमित न रहाता सर्वस्पर्शी केली गेली आहे. त्यासंबंधी विस्तृत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोतच. तूर्तास मूळ हलाल संकल्पना काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात!

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे 'हलाल' या शब्दाचा अर्थ आहे वैध आणि 'हराम' या शब्दाचा अर्थ आहे अवैध/ निषिद्ध. कुराण आणि हदीस या इस्लामी ग्रंथांमध्ये काही ठिकाणी याचे उल्लेख आलेले आहेत. सुरह २, आयत १७३ आणि सुरह ५, आयत ३ या मध्ये यासंबंधी उल्लेख सापडतात. त्यात असे म्हटले आहे की स्वतःहून मेलेला प्राणी, रक्त, डुकराचे मांस, बळी देताना अल्लाहशिवाय अन्य कुणाचे नाव घेतले गेले असेल, जे जनावर गळा दाबल्यामुळे गुदमरून किंवा मार लागल्यामुळे किंवा उंचावरून खाली पडल्यामुळे मरण पावले असेल किंवा इतर प्राण्याने आपल्या शिंगाने भोसकून ठार केले असेल असे प्राणी आणि ज्यास जंगली जनावरांनी फाडून खाल्ले असेल ते तुमच्यासाठी निषिद्ध (हराम) ठरविले आहे. परंतु तो प्राणी ज्यास तुम्ही जिवंत प्राप्त करून उचित रितीने बळी दिले असेल तर ते वैध (हलाल) आहे.... पण ज्याची कत्तल वेदीवर करण्यात आली आहे ते मात्र निषिद्ध आहे. वेदी म्हणजे चबुतरा जिथे अनेकेश्वरवादी लोक देवतांसमोर जनावरांचे बळी देतात!!

हराम अन्न खाणे हे निषिद्ध ठरविण्यात आलेले आहे आणि ते खाल्ल्यास त्याला गुन्हा समजण्यात येते. मात्र वरील आयतांमध्ये पुढे असेही म्हटलेले आहे की जो कुणी भुकेने फार व्याकुळ झाला असेल आणि गुन्हा करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नसेल आणि त्याने मनाई केलेलूं वस्तूंपैकी काही खाल्ल्यास त्याला अल्लाह माफ करून टाकेल कारण तो फार माफ करणारा आणि अत्यंत दयाळू आहे. या द्वारे असे लक्षात येईल की प्रतिकूल परिस्थितीत, उपासमारीतून जीव वाचविण्यासाठी.... हलाल भोजन उपलब्ध न झाल्यास हलाल नसलेले भोजन करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपद्धधर्मातही हलाल अन्नच ग्रहण केले पाहीजे अशी अनिवार्यता किंवा सक्ती दिसत नाही!!

हलाल पद्धतीनुसार पशुहत्येचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात
१. पशूची हत्या (कुर्बानी) करणारा इस्लामचे पालन करणारा (मुसलमान) असला पाहिजे.
२. ज्याची हत्या करायची आहे तो निरोगी आणि सुदृढ असला पाहिजे. त्याला मोकळ्या वातावरणात ठेवले पाहिजे. गळ्यावर सूरी फिरवे पर्यंत ती दिसू नये. एक पशूच्या गळ्यावर सूरी फिरवताना दुसऱ्या पशूने ते पाहू नये अशी व्यवस्था केली पाहिजे
३. पशूची हत्या करण्यापूर्वी 'बिस्मिल्लाह' किंवा ' बिस्मिल्लाह अल्लाहू अकबर' चे उच्चारण केले पाहिजे.
४. पशूच्या गळ्यावरून सूरी फिरवताना त्या प्राण्याचे मुंडके मक्केतील दिशेने केलेले असले पाहिजे.
५. धारदार सुरीने एकाच घावात त्या प्राण्याची श्वासनलिका, रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या आणि गळ्याच्या नसा कापल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर त्या पशुचे संपुर्ण रक्त वाहून जाऊन देऊन तो मृत झाला पाहिजे. रक्त हे हराम मानले गेले आहे त्यामुळे ते संपूर्ण वाहून जाऊ देणे आवश्यक आहे.
६. पशूची हत्या करताना त्याला वेदना होऊ नयेत म्हणून अगोदर विजेचा झटका देणे किंवा बधीर करणे हे निषेधार्ह आहे. 

एकूणच पाहिले तर वरील प्रमाणे हत्या म्हणजे पशूचा गळा कापून तो तडफडत असताना त्याचे संपूर्ण रक्त वाहू देणारी ही हलाल पद्धत ही अत्यंत अमानवीय असल्याचेच दिसते. परंतु हीच पद्धत कशी अल्प वेदनादायक आहे हे सिद्ध झाल्याचा दावा मुसलमानांकडून करण्यात येतो. वास्तविक २००९ मध्ये न्यूझीलंडच्या मॅसी विद्यापीठातील क्रेग जॉन्सन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत यावर एक प्रयोग केला आणि त्यातून हलाल पद्धतीने गळा कापल्याने पशूला अधिक वेदना सहन कराव्या लागतात हे सिद्ध केले आहे. हलाल पद्धत सुरक्षित असल्याचा दावा प्रा विल्हेम शुल्ज यांच्या वर्ष १९७८ मधील संशोधनाचा संदर्भ देऊन करतात. मात्र त्याच विल्हेम् शुल्ज यांनी २००२ मध्ये आपल्याच पहिल्या प्रयोगाची पद्धत संशयास्पद होती हे सांगितले आहे. 

हलाल पद्धती अमानवीय असल्याचे सिद्ध झाल्यावर युरोपमधील डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, लॅक्समबर्ग, बेल्जियम आदी देशात सचेत पशूला हलाल करण्यावर २०१७ मध्ये कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटन मध्ये लँकशायर कौन्सिलने शाळांमध्ये हलाल मांस पुरविण्यावर बंदी घातली आहे. युरोप मध्ये या हलाल विरोधी कायद्याला मुसलमानांनी न्यायालयात आव्हान दिले. मात्र २०२० मध्ये न्यायालयाने कायद्याचे समर्थन करून हलाल पद्धतीने पशू हत्या बंद करण्याचा आदेश दिला. सध्या सर्व युरोप मध्ये हलाल संबंधी बऱ्याच घडामोडी आणि राजकारणही होत आहे. 

त्याचवेळी भारतात काय केले गेले? इथे 'पशु क्रूरता निवारण अधिनियम, १९६०' या कायद्यात धार्मिक कारणांसाठी केलेल्या पशूहत्येला संरक्षण देण्यात आले आहे. या कायद्यात संकीर्ण भागात या क्रूरतेला संरक्षण देणारे सूत्र क्र २८ आहे. अभ्यासक आणि जाणकार यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असे वाटते! 

हलाल मानले जाणारे अन्य खाद्य पदार्थ
१. गाय, मेंढी, बकरी आणि उंट यांचे दूध
२. मध
३. मासे आणि जलचर
४. नशा न आणणाऱ्या वनस्पती
५. ताजी, तसेच सुकविलेली फळे
६. काजू, बदाम आणि सुकामेवा
७. गहू, तांदूळ आदी धान्ये

हराम मानले जाणारे मांस आणि प्रमुख खाद्यपदार्थ
१. डुक्कर, रानडुक्कर आदी प्रजातीतील प्राण्यांचे मांस आणि त्यांच्या अवयवांपासून बनविलेले जिलेटीन सारखे अन्य पदार्थ
२. तीक्ष्ण नखांचे पंजे असणारे आणि टोकदार सुळे असलेले हिंस्त्र आणि मांसाहारी प्राणी आणि पक्षी उदा. सिंह, वाघ, माकड, नाग, गरुड, गिधाड इत्यादी
३. ज्यांना मारणे इसलाम नुसार निषिद्ध आहे असे प्राणी उदा. मुंगी, मधमाशी, सुतार पक्षी
४. भूमी आणि पाणी या दोन्हींवर राहणारे प्राणी उदा. मगर, बेडूक इत्यादी
५. गाढव, खेचर तसेच सर्व प्रकारचे विषारी प्राणी
६. गळा दाबून मारलेले प्राणी तसेच नैसर्गिक रित्या मेलेले प्राणी आणि त्यांचे अवशेष
७. मानव किंवा पशू यांच्या शरीरातील पोकळीतून बाहेर पडणारे रक्त आणि मल-मुत्र
८. अंमली पदार्थ, नशा आणणाऱ्या वनस्पती
९. अल्कोहोल चा समावेश असणारी पेये आणि पदार्थ उदा. मद्य, स्पिरीट, सौसेजेस इत्यादी
१०. विषारी तसेच नशा आणणारी पेये आणि त्यांपासून बनविलेले पदार्थ आणि रसायन
११. कलमा न बोलता किंवा इस्लामला मान्य नसलेल्या पद्धतीने बळी दिलेल्या पशूंचे मांस

वरील सूची पाहिल्यास हलाल आणि हराम काय हे स्पष्ट होते. आणि या संदर्भात कुराणचा आदेश असल्याने आणि हराम पदार्थ भक्षण केल्याने अल्लाहच्या अवकृपेच्या भयाने सर्वसामान्य मुसलमान हलाल मांसान्नाचा आग्रह धरतात!

मंडळी, ही झाली हलाल आणि हराम संबंधी प्राथमिक माहिती. इतकी वर्षे आत्तापर्यंत आपल्याला हलाल मांस एव्हढेच माहिती होते.... आणि त्याचा आपल्यावर तसा काहीही फरक पडत नव्हता किंवा परिणाम होत नव्हता. मग असे आत्ता काय झाले की हलाल संकल्पनेने सर्व जगाला (त्यात भारतही आलाच!!) व्यापून टाकले आहे आणि जगाची अर्थव्यवस्था आणि कित्येक देशांची मानसिकता बदलत चालली आहे??..... हेच जाणून घ्यायचा प्रयत्न आपण पुढील काही भागात करणार आहोत. 

- अरविंद श्रीधर जोशी




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक