वय वाढल्यावर माणसाला नैसर्गिकरीत्याच थोडीफार प्रगल्भता येते. राहुल गांधी हे या नियमालाही अपवाद! त्यांना आजही राजकीय वास्तव काय आहे, याचे आकलन होत नाही. अर्थात, त्यांनी जे राजकीय सल्लागार नेमले आहेत, ते त्यांना योग्य सल्ला देत नाहीत, अन्यथा ज्या तरुण नेत्यांकडे थोडीफार क्षमता आणि करिश्मा होता, ते त्यांना सोडून निघून गेले नसते.
काँग्रेसचे नेते हे वेगळ्याच विश्वात राहातात, असे दिसते. त्या पक्षाचे सर्वोच्च नेते असोत की, राज्य स्तरावरील नेते; त्यांची वक्तव्ये पाहता त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, ते समजणेच अवघड. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे,” असे वक्तव्य, या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. त्यांनी आपल्या पक्षाची स्तुती करणे हे स्वाभाविकच. पण, ते करताना त्याला वास्तवाचा थोडाफार तरी आधार असावा, ही अपेक्षा चुकीची नाही. काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यांना वास्तवाशी काही देणे-घेणे नसते. ते आपल्याच कल्पनेच्या विश्वात रमतात. त्यामुळे सपकाळांचा हा अतिशयोक्त दावा दुर्लक्ष करण्याजोगाच. पण, काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हेही अशाच प्रकारची वास्तवाचा आधार नसलेली वक्तव्ये करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. “ओमानजवळ एका तेलाच्या जहाजाचा ताबा घेताना अमेरिकी सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. त्याबद्दल मोदी यांनी ट्रम्प सरकारला धारेवर धरलेले नाही. कारण, मोदी हे ट्रम्प यांचे आज्ञाधारक सेवक आहेत,” अशी बेछूट टीका राहुल गांधी यांनी केली.
ज्या स्थितीत भारतीय खलाशांचा मृत्यू झाला, त्याबद्दल आपली नाराजी आणि जाब भारताने अमेरिकी सरकारला विचारला आहे. स्वत: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीच, अमेरिकेच्या राजदूतांमार्फत भारताची तीव्र प्रतिक्रिया अमेरिकेपर्यंत पोहोचविली. परराष्ट्र धोरणाच्या मर्यादेत राहून जे करणे शक्य आहे, ते भारताने केले. पण, आंतरराष्ट्रीय संबंधांमधील शिष्टाचार आणि सनदशीर निषेधाची माहिती नसलेल्या अज्ञानी नेत्यांकडूनच अशा प्रकारची टोकाची भाषा केली जाते. ट्रम्प सरकारच्या भारताविषयीच्या अन्याय्य धोरणांचा प्रभाव विफल करण्यासाठी, मोदी यांनी अवलंबिलेल्या उपायांमुळे ही धोरणे निष्प्रभ ठरली. ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांवर मोदी यांनी हाच उपाय यशस्वीपणे योजला होता. अमेरिकेशी होत असलेला व्यापारी करार अजूनही प्रत्यक्षात उतरलेला नाही, याचे कारण भारताने आपल्या अटींवर तडजोड करण्यास दिलेला नकार. तसेच अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांची पर्वा न करता, भारताने त्या देशाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदीही सुरूच ठेवली. त्यामुळे ट्रम्प यांच्यापुढे लाचारी पत्करण्याची टीका बिनबुडाची ठरते. पण, चीन करीत असलेल्या भारतविरोधी कारवायांबाबत काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याकडून एकदाही टीकेचे बोल भारतीय जनतेने का ऐकले नाहीत, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे.
वय वाढल्यावर नैसर्गिकपणेच माणसाला थोडीफार प्रगल्भता येते. राहुल गांधी हे या नियमालाही अपवाद ठरले आहेत. वयाची 55 वर्षे उलटली, तरी त्यांना वास्तव परिस्थितीचे भान आलेले नाही, हे आश्चर्यच! आपल्या पक्षापुढील आव्हाने कोणती? आपला पक्ष वारंवार निवडणुकीत पराभूत का होतो? मोदी यांची लोकप्रियता टिकून का राहिली आहे? यांसारखे प्रश्न त्यांना पडतच नाहीत. निवडणुकीत पराभव झाल्यावर त्या पराभवाचे विश्लेषण करणे दूरच, ते तो पराभव आहे, हेच मुळी मान्य करीत नाहीत. हा एकतर थिल्लरपणा आहे किंवा अज्ञानीपणा. स्वाभाविकच, ज्यांना राजकारणात काही कार्य करायचे आहे, अशा काही तरुण नेत्यांनी काँग्रेसपासून दूर होऊन आपला मार्ग निवडला आणि ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले. सर्व नेत्यांना सांभाळून घेणे, हे राहुल गांधी यांच्या स्वभावातच नाही. राहुल गांधी यांच्या आडमुठेपणामुळेच आज ‘इंडी’ आघाडी विखुरली गेली आहे.
मोदी यांची लोकप्रियता टिकून राहण्याची कारणे अनेक असली, तरी आपल्या मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देणे आणि आपल्या यशात त्यांनाही सामावून घेणे, हे त्यांपैकीच एक. मोदी यांनी नुकताच भारताचे सर्वाधिक काळ लोकनियुक्त पंतप्रधान राहण्याचा विक्रम प्राप्त केला. त्याबद्दल ‘रालोआ’च्या घटकपक्षांनी, त्यांच्या अभिनंदनाचा एक सोहळा आयोजित केला होता. त्यात सर्व नेत्यांनी मोदी यांची प्रशंसा केली. नंतर या भाषणांना उत्तर देणारे भाषण मोदी यांनी केले. त्यात त्यांनी आपल्या सरकारने संपादन केलेल्या अनेक यशांमध्ये, या घटकपक्षांच्या सहकार्याचाही वाटा असल्याचे प्रतिपादन केले. पण, ही केवळ आजचीच घटना नाही. भाजपने यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत प्राप्त केले होते. तरीही, मोदी यांनी आपल्या सरकारमध्ये सर्व घटकपक्षांना मंत्रिपदे दिली होती. सर्वांना सांभाळून घेऊन पुढे जाणे, हेच मोदींच्या यशाचे एक गमक आहे. ती गोष्ट स्वकेंद्रित आणि अहंमन्य राहुल गांधी यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचीच. आपल्या (वैयक्तिक आणि पक्षीय) नसलेल्या कुवतीचा राहुल गांधी यांना इतका गर्व आहे की, नुकत्याच झालेल्या ‘इंडी’ आघाडीच्या बैठकीतही राहुल गांधी यांनी सर्वच घटकपक्षांच्या नेत्यांवर टीका केली. मोदी सरकारला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे केवळ आपल्यालाच समजते, तुम्हाला नाही, असा त्यांच्या भाषणाचा एकूण सूर होता.
काँग्रेस हा मोदी किंवा भाजप यांना पर्याय असल्याचे आजघडीला तरी जाणवत नाही. देशाच्या प्रत्येक राज्यात या पक्षाचे आजही थोडेफार तरी अस्तित्व आहे, हेच काँग्रेसचे एकमेव बलस्थान. इतक्या पराभवांनंतरही काँग्रेसची ही जमेची बाजू कायम राहिली आहे. पण, त्याची जाणीवच या पक्षाच्या नेतृत्वाला नसल्याने त्याचा फायदा उठवण्याच्या स्थितीत काँग्रेस नाही. राहुल गांधी हा मोदी यांना पर्याय कधीच नव्हता, नाही आणि भविष्यातही नसेल, ही गोष्ट जनतेने ओळखली आहे. काँग्रेसने एक खरोखरच सक्षम पर्याय दिल्यास, त्या पक्षाच्या या पराभूत स्थितीत थोडाफार फरक पडू शकतो. पण, हे मुळात मान्य करण्याइतके शहाणपण काँग्रेस नेत्यांमध्ये शिल्लक तरी आहे का, हाच खरा प्रश्न!