आधी पक्ष सांभाळा!

Total Views |

चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कंटाळून, तत्कालीन नगरविकासमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मंत्री, खासदार, आमदार यांच्याबरोबरच पक्षातील जुने-जाणते पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. परिणामी, मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेले उद्धव ठाकरे यांना पदावरून खाली उतरावे लागले. आता चार वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंचे नऊपैकी सात खासदार त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्याअनुषंगाने नेपथ्यरचना झाली असून, हे खासदार लवकरच शिवसेना शिंदे पक्ष अथवा लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, यापूर्वी ‌‘मातोश्री‌’वर झालेल्या बैठकीत ठाकरे पिता-पुत्रांनी घराच्या बाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी, ठाकरेंच्या बहुतेक खासदारांनी केली होती. परंतु, दोन ते तीन महिन्यांनंतरही ठाकरे घराच्या बाहेर काही पडले नाहीत. आता येत्या 10 ते 15 दिवसांत आदित्य ठाकरे नाशिक दौरा करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकले आहे. या दौऱ्यात ते नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील विलंबाचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने सरकारवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावरही, विरोधकांकडून जोरदार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिंहस्थासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचा आरोप करत, आदित्य ठाकरे नाशिकमध्ये पाहणी करणार आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि घाटांच्या विकासासारख्या कामांबाबत ते सरकारला जाब विचारणार असल्याचेही सांगितले जात आहे. परंतु विरोधकांच्या मते, सत्तेत असताना ‌‘उबाठा‌’ गटालाही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात अपयशच आले होते. त्यामुळे आज विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांनी, आधी त्यांच्या कारकिदचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी जोर धरत आहे. ‌‘उबाठा‌’ गटातील सात खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांमुळे, पक्षाची अंतर्गत स्थितीही चर्चेत आली आहे. तेव्हा नाशिक दौऱ्यावर येण्याआधी आदित्य यांनी आधी पक्ष सांभाळावा.

गोकुळात दराडेंची धाकधूक

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत, शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे हे एकमेव उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उरले आहेत. महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार उभा नसल्याने आणि भाजप बंडखोर प्रसाद हिरे आणि गोकुळ गिते यांनी दराडेंना जाहीर पाठिंबा दिल्याने, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवरही शिंदे गटाला आपल्या नगरसेवकांना आणि मतदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ आल्याने, राज्याच्या राजकारणात विविदह चर्चांचा महापूर आला आहे. एखादा उमेदवार निवडून येण्याच्या स्थितीत असेल, तर पक्षात आत्मविश्वासाचे वातावरण दिसून येते. परंतु, नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी असल्याचेच चित्र आहे. या निर्णयामागे केवळ विरोधकांचीच भीती नसून, पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांतील अस्वस्थताही कारणीभूत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मागील आठ वर्षांत आमदार नरेंद्र दराडे यांनी कोणत्याही प्रकारचे ठोस काम, तसेच पक्षाबरोबरच मित्रपक्षांतील कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवला नसल्याचा आरोप त्यांच्यावर सतत करण्यात येत आहे. त्यामुळेच प्रसाद हिरे आणि गोकुळ गिते यांनी पक्ष आदेशाच्या विरोधात जात उमेदवारीही कायम ठेवली होती. मात्र, महायुतीमध्ये समन्वय नसल्याचा संदेश राज्यात जाऊ नये, म्हणूनच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमधील ही बंडखोरी शमवली होती. त्यानंतर हिरे आणि गिते या दोघांनाही महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबाही जाहीर केला होता. तरीही, मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदार एकसंध राहावेत, यासाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून ‌‘हॉटेल पॉलिटिक्स‌’चा अवलंब केला जात आहे. स्वतः नरेंद्र दराडे यांनाच नाशिकमध्ये प्रचंड विरोध असल्याने, पक्षनेतृत्व दराडे यांच्याबाबत कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत सध्या नाही. त्यामुळे दराडेंचा विजय निश्चित असतानाही मतदारांचे व्यवस्थापन करण्यावरच सध्या भर दिला जात आहे. यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की, जर उमेदवार एकमेव असेल आणि विजय जवळपास निश्चित असेल, तर अशी खबरदारी घेण्याची गरज का भासते? तर, याला सर्वस्वी दराडे यांचा कारभारच जबाबदार आहे.





विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.