इराण आणि इस्रायल युद्धाची दुसरी फेरी झटापटीची...

    12-Jun-2026   
Total Views |
 
Israel, America-Iran war
 
अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा अंत दृष्टिपथात दिसत असताना, आखातात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली. युद्धविरामास १०० दिवस पूर्ण झाले असताना, इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या दुसर्‍या फेरीस सुरुवात झाली. अमेरिका या युद्धामध्ये उतरल्यास हे युद्ध आणखी काही महिने पेटलेले राहणार, अशी भीती वाटत असतानाच, इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी आपण हे युद्ध तात्पुरते थांबवत असल्याची घोषणा केली. नेमके काय झाले हे समजून घ्यायचे असेल, तर पडद्यामागे चाललेल्या नाट्यमय घडामोडींचा आढावा घेणे आवश्यक आहे.
 
एकाच वेळेस अनेक घड्याळे धावत आहेत. दि. ११ जून रोजी अमेरिकेमध्ये ‘फुटबॉल विश्वचषका’स सुरुवात झाली. या स्पर्धेत अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश सहभागी झाले आहेत. या क्रीडा महोत्सवास गालबोट लागावे, अशी अमेरिकेची मुळीच इच्छा नाही. दि. ४ जुलै रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘जगातील सर्वांत जुनी लोकशाही’ म्हणवून घेणार्‍या अमेरिकेसाठी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही ऐतिहासिक संधी आहे. दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अमेरिकेत प्रतिनिधीगृहाच्या सर्व, सिनेटच्या एक तृतीयांश, तसेच अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. सध्याच्या मतचाचण्यांनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता रसातळाला गेली असून, हे युद्ध असेच चालू राहिले; तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव होऊन दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत येण्याची भीती आहे. इस्रायलमध्येही नोव्हेंबर २०२६ मध्ये निवडणुका होणार होत्या. पण, आता त्या दि. १५ सप्टेंबरपूर्वीच घेतल्या जाणार आहेत.
 
नुकतेच इराणमधील युद्धाला १०० दिवस पूर्ण झाले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या शीर्षस्थ नेतृत्वाची संपूर्ण फळी कापली गेली. इराणचे नौदल आणि वायुदल जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. इराणचे अणू-इंधन समृद्धीकरण प्रकल्प, तसेच क्षेपणास्त्रांचे साठे अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये जमिनीखाली गाडले गेले. तुलनेत अमेरिका आणि इस्रायल यांचे फारसे नुकसान झाले नसले, तरीही इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून युद्धात रणनीतीच्या दृष्टीने विजय मिळवल्याचे चित्र निर्माण केले. इराणमध्ये जुने चेहरे जाऊन नवीन चेहरे आले असले, तरी राजवटबदल काही झाला नाही. इराणकडील समृद्ध केलेल्या युरेनियमचे साठे अमेरिका आजवर हस्तगत करू शकली नाही. त्यापासून इराण सुमारे दहा अण्वस्त्रे बनवू शकेल, असा अंदाज आहे. इराणच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे साठे जमिनीखाली गाडले गेले असले, तरी ते नष्ट झाले नसून, त्यातील अनेक क्षेपणास्त्रे परत मिळवण्यात इराण यशस्वी होईल. या युद्धाची दुसरी आघाडी लेबनॉनमध्ये आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात, तसेच पेजर स्फोटांमुळे ‘हिजबुल्ला’चे शीर्षस्थ नेतृत्व मारले गेल्यानंतर त्यांनी युद्धविराम स्वीकारला होता. पण, त्यांची लढण्याची क्षमता शाबूत होती.
 
इराणचे हस्तक संपूर्ण पश्चिम आशिया खंडामध्ये आहेत. त्यात इराकमधील ‘शिया’ दहशतवादी संघटना, येमेनमधील ‘हुती’, गाझापट्टीमध्ये ‘हमास’ अशा अनेक संघटनांचा समावेश असला, तरी ‘हिजबुल्ला’शी इराणचे वेगळे नाते आहे. १९७९ साली ‘इस्लामिक क्रांती’ झाल्यानंतर इराणने लेबनॉनमधील ‘शिया’ लोकांना संघटित करून ‘हिजबुल्ला’ची स्थापना केली होती. ‘हिजबुल्ला’वर इराणचे नियंत्रण असून, त्यांना इशारा करताक्षणीच ते इराणसाठी युद्धाच्या मैदानात उतरतात. त्यांच्याकडे इस्रायलशी लढण्याचा १८ वर्षे युद्धाचा अनुभव असल्यामुळे ते दीर्घकालीन लढाई लढू शकतात. इस्रायलसाठी इराणमधील राजवट बदलणार नसेल, तर ‘हिजबुल्ला’ची नांगी ठेचणे आवश्यक होते.
 
इस्रायलला माहिती आहे की, एकदा का युद्ध थांबले की, अमेरिका पुन्हा युद्धाच्या मैदानात उतरणार नाही. त्यामुळे इस्रायल हे युद्ध थांबण्यापूर्वी ‘हिजबुल्ला’ला इस्रायलच्या सीमेपासून जेवढे मागे रेटता येईल, तेवढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलचे सैन्य लेबनॉनमध्ये सुमारे ५० किमी आत घुसले आहे. लिटानी नदी ओलांडून लेबनॉनच्या पूर्वेकडील असलेला डोंगराळ भाग इस्रायलने ताब्यात घेतला असून, या भागातील ‘हिजबुल्ला’च्या समर्थकांच्या गावांतील लोकांना देशाच्या उत्तरेकडे स्थलांतरित व्हायला भाग पाडले आहे. पण, जोपर्यंत बैरुतमधील दाहिया आणि अन्य उपनगरांवर नियंत्रण प्राप्त होत नाही, तोपर्यंत ‘हिजबुल्ला’चा बिमोड करणे अशय आहे. ‘हिजबुल्ला’ने इस्रायलमध्ये रॉकेट आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर इस्रायलने लेबनॉनमधील या भागाकडे आपला मोर्चा वळवला.
 
‘हिजबुल्ला’ अडचणीत असल्याचे पाहून इराणने त्यांच्या मदतीला जायचा निर्णय घेतला. इराणने इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणने आपल्यावर हल्ला करण्याचे निमित्त करून इस्रायलने इराणविरुद्ध हवाई हल्ले करून राजधानी तेहरान, महाशहर, ताब्रिझ आणि इस्पाहान या शहरांजवळील लष्करी केंद्रांवर हल्ले केले. इराणवर हल्ला केला म्हणून येमेनमधील ‘हुती’ गटानेही इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे डागली. इराणनेही इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रांची दुसरी फैर झाडली. इस्रायलवर हल्ला करताना इराणला माहिती होते की, आपल्या हल्ल्यामुळे इस्रायलचे काहीही नुकसान होणार नाही. उलट, इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात आपले नेते मारले जाऊ शकतात किंवा उरलेल्या लष्करी तळांचे मोठे नुकसान होऊ शकते. पण, तरीही इराणने हा हल्ला केला. कारण, त्यांना दाखवून द्यायचे होते की, ‘हिजबुल्ला’साठी आपण युद्धामध्ये उतरू शकतो. यामध्ये इराणचे तत्कालिक नुकसान असले, तरी दीर्घकाळच्या दृष्टीने इराणला इस्रायलच्या सीमेवर ‘हिजबुल्ला’ची डोकेदुखी कायम ठेवण्यात रस आहे. त्यामुळे हा हल्ला करताना इराणने तो लाक्षणिक असेल, याची काळजी घेतली.
 
इस्रायलने बैरुतमधील दाहिया भागावर हल्ला केला असता, ट्रम्प यांनी नेतान्याहूंना तत्काळ हल्ले थांबवायला सांगितले होते. नेतान्याहूंनी ट्रम्प यांचे ऐकले असते, तर इस्रायलच्या राजकारणात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर इस्रायलच्या हितापेक्षा अमेरिकेच्या हिताचा विचार करत असल्याचे आरोप केले असते. त्यामुळे नेतान्याहूंनी इराणवर हवाई हल्ले करण्याचे आदेश देताना त्यातून युद्धाचा भडका उडणार नाही, याची काळजी घेतली. त्यांनीही आपण इस्रायलच्या राष्ट्रीय हिताशी कटिबद्ध असून, त्यासाठी ट्रम्प यांचा सल्लाही धुडकावून लावू शकतो, हे दाखवून दिले. हल्ले आणि प्रतिहल्ले पार पडल्यानंतर इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी आपापल्या तलवारी म्यान केल्या. भविष्यात लेबनॉनमध्ये इस्रायलची कारवाई चालूच राहणार असून, काहीकाळ बैरुतला त्यातून वगळण्यात येईल.
 
या घटनांमुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम टिकला असून, पुढच्या काही दिवसांमध्ये युद्धबंदी होण्याची शयता वाढली आहे. ट्रम्प यांचे लक्ष अमेरिकेतील निवडणुका आणि जागतिक अर्थव्यवस्थेकडे असून, इराणसाठी गाळात गेलेली अर्थव्यवस्था सावरायची असेल आणि अराजकता पसरू द्यायची नसेल, तर लवकरात लवकर अमेरिकेचे निर्बंध उठून आपली गोठवलेली संपत्ती मिळणे आवश्यक आहे. गेले तीन महिने संपूर्ण जगाला वेठीस धरल्यानंतर आता अमेरिका आणि इराणसाठी युद्ध थांबवून स्थैर्य आणणे, ही प्राथमिकता बनली आहे. त्यामुळे आजवर वाटाघाटींमध्ये अडकून राहिलेले मुद्दे सोडवण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. हे युद्ध जरी संपले, तरी परिस्थिती लगेचच पूर्ववत होणार नाही. आखाती देशांमध्ये नवीन राजकीय आणि लष्करी गट तयार होत असून, त्यांच्यामध्ये एकमेकांविरोधात शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहील. या परिस्थितीत भारताला मार्ग काढावा लागणार आहे.




अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.