धुळ्यातील लांडग्यांचा रक्षक

    11-Jun-2026   
Total Views |
 
 Dhule Wolf Conservation Hero
 
धुळ्यातील गवताळ प्रदेशाच्या संवर्धनाचे काम करत, इथल्या लांडग्यांचा रक्षक ठरलेल्या उमाकांत पाटील यांच्याविषयी...
 
उमाकांत यांचा जन्म दि. १५ फेब्रुवारी १९८४ रोजी धुळे जिल्ह्यातील नेर गावी झाला. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यात. मात्र, वडील ‘एमएसईबी’मध्ये नोकरी करत असल्याने पाटील कुटुंबीय धुळ्यात स्थायिक. उमाकांत यांना प्राण्यांप्रतिची ओढ जन्मत:च होती. मुलामधील आवड पाहून वडिलांनीदेखील त्याला कबूतर आणि ससे पाळायला दिले. आपल्या मूळ गावी जाताना हे चौकोनी कुटुंब मोटारसायकलने प्रवास करायचे. या प्रवासात पुढे बसणारे लहान उमाकांत झोपी जात. अशा वेळी, "झोपू नको, प्रवासात लांडगे दिसतील,” असे सांगून वडील त्यांना जागे ठेवत.
 
गावी गेल्यावर माळरानावर लांडगे पाहण्यात उमाकांत यांचा दिवस जाई. यातूनच, लांडगा आणि पर्यायाने गवताळ प्रदेशाशी त्यांची नाळ जोडत गेली. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निसर्ग फिरण्यास सुरुवात केली. वन्यजीवांची आवड असतानाही दहावीच्या शिक्षणानंतर उमाकांत ‘बायोलॉजी’ विषयाकडे न वळता, अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळले. यामागचे कारण निराळेच होते. उमाकांत हे शुद्ध शाकाहारी आहेत. ‘बायोलॉजी’कडे वळण्याचा निर्णय घेताना, त्यांना कोण्या एकाने सांगितले की, त्या शिक्षणात बेडकांना कापावे लागते. ते ऐकूनच उमाकांत यांनी आपला मोर्चा अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळवला. मात्र, या गोष्टीचा आज पश्चाताप होत असल्याचे ते सांगतात. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी आपला कल पूर्णपणे पक्षीनिरीक्षणाकडे वळवला. कुणाल पाटील हा धुळ्यातील समविचारी मित्र ‘ऑर्कुट’वर त्यांना भेटला. त्याच्याकडे डॉ. सलीम अली यांची पुस्तके होती. ती वाचून ‘नखाने’ तलावामधील पक्ष्यांचे फोटो कुणाल यांनी समाजमाध्यमांवर टाकले होते. ते फोटो पाहून उमाकांत यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली.
 
इथवरच्या प्रवासामध्ये उमाकांत यांच्या डोळ्यासमोर लांडगे होतेच. मात्र, २०१३ पासून उमाकांत यांनी धुळ्यातील लांडग्यांची छायाचित्रे टिपायला सुरुवात केली. तोपर्यंत उमाकांत यांचा वन्यजीव छायाचित्रणात जम बसला होताच. या प्रवासात लांडग्यांना आणि त्यातही धुळे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशाची स्थिती आणि तिथल्या समस्यांची जाणीव झाली. त्यामुळे प्रत्येक खेड्यात जाऊन लांडग्यांची आणि गवताळ प्रदेशाची माहिती घेण्यास त्यांनी सुरुवात केली. धनगरांना भेटल्यामुळे लांडग्यांच्या विश्वाचे दर्शन त्यांना झाले. त्यातून गवताळ अधिवासावर असलेल्या संकटाची दाहकता त्यांना अवगत झाली. लांडग्यांना भटया कुत्र्यांपासून निर्माण होणार्‍या समस्यांची जाणीव झाली. कुत्रा-लांडगा संकरातून जन्मास आलेले संकरित लांडगे धुळ्याच्या माळरानावर फिरताना त्यांना दिसू लागले. त्यामुळे त्या समस्येला प्रकाशझोतात आणण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, सगळ्याच क्षेत्रांप्रमाणे चांगली-वाईट माणसे उमाकांत यांनादेखील या प्रवासात भेटली.
 
उमाकांत यांची धुळ्यातील संकरित लांडग्यांवरची निरीक्षणे काही लोकांनी स्वत:च्या नावावर खपवली. संकरित लांडग्यांच्या स्थानाविषयी चुकीची माहिती शास्त्रीय शोधनिबंधातून मांडली. यातून फसवल्याची भावना निर्माण झाल्यावर उमाकांत यांनी न डगमगता स्वत:वर विश्वास ठेवला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. पक्षीनिरीक्षणाला पुन्हा जोमाने सुरुवात केली. त्यातून धुळे जिल्ह्यातून पक्ष्यांच्या ३६४ प्रजातींची नोंद केली.
 
यादरम्यान, धुळ्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले श्रीकांत धिवरे हे स्वत: वन्यजीवप्रेमी होते. त्यांनी उमाकांत व सहकारी राज पाटील यांना या कामास संघटित स्वरूप आणण्याचा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून धुळ्यातील गवताळ अधिवाससंवर्धनासाठी काम करण्याचे ठरले. त्यातून ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’सारख्या नामांकित संस्थेने जिल्ह्यातील गवताळ अधिवाससंवर्धनासाठी एक प्रकल्प उमाकांत यांना देऊ केला. त्यासाठी त्यांनी २०२५ साली ‘गोल्डन अर्थ बायोप्रीझर्व्ह फाऊंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत ते संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 
‘गोल्डन अर्थ बायोप्रीझर्व्ह फाऊंडेशन’ सध्या धुळे वनविभाग आणि ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’सोबत काम करत आहे. या कामाच्या माध्यमातून लांडग्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे; ज्यातून धुळे आणि साक्री तालुयात लांडग्यांचे प्रजनन होऊन त्यांच्या संख्येत भरभराट होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. गवताळ प्रदेशावर होणारी वृक्षलागवड थांबवत, त्याठिकाणी स्थानिक गवताच्या प्रजातींची लागवड संस्थेमार्फत होत आहे. या माध्यमातून गवताळ अधिवासाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम संस्था करत आहे. संस्थेच्या माध्यमातून उमाकांत यांच्या कामाला एक दिशा मिळाली. त्यांची धुळ्याच्या ‘मानद वन्यजीव रक्षक’पदीदेखील नियुक्ती झाली आहे.
 
एका दुर्लक्षित प्रदेशात शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानादेखील तळमळीने काम करणार्‍या उमकांत यांच्यासारख्या संवर्धकाची आज निसर्गाला गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.