हरहुन्नरी रंगकर्मी शुभांगी पाठक

Total Views |
Shubhangi Vijay Pathak
 
क्रीडा, नाट्य, अभिनय या क्षेत्रांना आपल्या कवेत घेण्याबरोबरच पक्ष्यांसोबत गट्टी करण्यासाठी गावोगावी भ्रमंती करत इतर क्षेत्रांतही लीलया वावरणार्‍या शुभांगी विजय पाठक यांच्याविषयी...
 
क्रीडांगणावर घाम गाळत विजय मिळवणारी जिद्द, रंगमंचावर व्यक्तिरेखांना जिवंत करणारी अभिनयशक्ती आणि दिग्दर्शनातून कलाकृतींना आकार देणारी सर्जनशील दृष्टी, या तिन्ही गुणांचा अप्रतिम संगम म्हणजे शुभांगी विजय पाठक! कलेप्रति निष्ठा, अथक परिश्रम आणि प्रत्येक क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द, यामुळे त्यांनी क्रीडा आणि नाट्यविश्वात मानाचे स्थान मिळवले. त्या केवळ अभिनेत्रीच नाहीत, तर मराठी रंगभूमीवरील एक समर्पित, अभ्यासू आणि बहुआयामी रंगकर्मी म्हणून ओळखल्या जातात. शालेय जीवनापासूनच त्यांच्या आयुष्यात खेळाला महत्त्वाचे स्थान होते. ‘बास्केटबॉल’ या खेळाची विशेष आवड आणि त्यासाठी घेतलेली अथक मेहनत, यामुळे त्यांनी लवकरच आपली स्वतंत्र छाप उमटवली. ‘मिनी बास्केटबॉल’ संघापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ‘रौप्यपदक’ मिळवले, हा त्यांच्या क्रीडाप्रवासातील अभिमानास्पद क्षण ठरला. ‘महाराष्ट्र ज्युनिअर संघा’त सलग चारवेळा निवड होणे, ही त्यांच्या सातत्याची व जिद्दीची साक्ष आहे. त्यापैकी एका स्पर्धेत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संघाला ‘सुवर्णपदक’ मिळवून दिले. ‘महाराष्ट्र महिला संघा’तही चारवेळा निवड होऊन त्यांनी तब्बल २२ वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तीनवेळा कर्णधारपद भूषवत त्यांनी नेतृत्व, शिस्त आणि संघभावना यांचा आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे, त्यांचे संपूर्ण शिक्षण क्रीडा शिष्यवृत्तीवर पूर्ण झाले. त्यांच्या कष्टाची आणि गुणवत्तेची ही अधिकृत पोचपावतीच ठरावी. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या बास्केटबॉल संघात सलग तीनवेळा निवड होत, त्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. एका स्पर्धेत कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने ‘कांस्यपदक’ पटकावले. क्रीडा क्षेत्रात यशाची शिखरे गाठतानाच त्यांच्या मनात रंगभूमीची ओढ कायम होती. घरातूनच नाट्यसंस्कार लाभल्याने अभिनयाची आवड लहानपणापासूनच जोपासली गेली. आई-वडील आणि भावंडांच्या कलात्मक वातावरणात वाढलेल्या शुभांगी यांनी बालनाट्यांपासून अभिनयास सुरुवात केली आणि रंगभूमीशी आयुष्यभराचे नाते जोडले.
 
आजपर्यंत त्यांनी तब्बल २८ एकांकिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेतून भावविश्व प्रभावीपणे उभे करण्याच्या त्यांच्या ताकदीमुळे त्यांना अनेक वेळा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून गौरवण्यात आले. दोन अंकी राज्य नाट्यस्पर्धांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांचा रंगप्रवासही तितकाच व्यापक आणि प्रभावी. जवळपास ६२ नाटकांमध्ये त्यांनी अभिनय करत विविध स्तरांवरील व्यक्तिरेखा जिवंत केल्या. त्यांच्या अभिनयातील सहजता, भावनांची ताकद आणि संवादफेकीचा प्रभाव प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी खिळवून ठेवतो. अनेक नामांकित नाट्यसंस्था आणि स्पर्धांमधून त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रंगभूमीपलीकडेही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ११ मराठी मालिकांमधील भूमिका आणि १७ मराठी चित्रपटांमधील विविध व्यक्तिरेखांमधून त्यांनी आपल्या अभिनय वैविध्याची प्रचिती दिली. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. राज्य नाट्यस्पर्धेतील अनेक नाटकांचे दिग्दर्शन करत त्यांनी आशयघन मांडणी, नेपथ्यरचना आणि व्यक्तिरेखांचा सखोल अभ्यास, यांमुळे स्वतंत्र दिग्दर्शकीय शैली निर्माण केली. त्यांच्या दिग्दर्शनाला ‘उत्कृष्ट दिग्दर्शिका’ म्हणून सन्मान मिळाले आहेत. नाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांना परीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आले. ‘पुरुषोत्तम करंडक’, ‘राज्य बालनाट्य स्पर्धा’, ‘राज्य नाट्यस्पर्धा’, तर ‘कामगार नाट्यस्पर्धे’ची अंतिम आणि इतर फेर्‍यांमध्येही त्यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यासोबतच ‘लेडीज स्पेशल स्कूटर’ स्पर्धेत प्रथम क्रमांक, ‘बेस्ट ब्युटिशियन’ स्पर्धेत ‘श्रीमती नाशिक’ या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
 
पक्षीनिरीक्षण आणि विविध पक्ष्यांचे छायाचित्रण हा तर त्यांचा अत्यंत आवडीचा छंद. जीवनाचे बारकाईने निरीक्षण करणे आणि त्यातील मोहक क्षणांना कॅमेर्‍यात टिपणे यात त्यांना अपार आनंद मिळतो. या छंदासाठी त्या गावोगावी, तसेच देशोदेशी भटकंती करतात. सर्जनशीलतेचा ध्यास घेत नवीन नाट्यलेखन करणे आणि त्या साहित्यकृतींना दिग्दर्शनातून रंगमंचावर साकार करणे, या कामातही त्या तितक्याच तन्मयतेने कार्यरत असतात. क्रीडांगणातील जिद्द, रंगभूमीवरील संवेदनशीलता, दिग्दर्शनातील सर्जनशील दृष्टी आणि निसर्गप्रेमातील शांत समाधान या सर्व गुणांचा सुरेख मिलाफ म्हणजे शुभांगी विजय पाठक. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्तृत्व, परिश्रम, समर्पण आणि कलानिष्ठतेची प्रेरणादायी गाथा होय. मराठी रंगभूमीला लाभलेली ही प्रतिभावान, समर्पित आणि बहुआयामी रंगकर्मी ही कला क्षेत्रासाठी खर्‍या अर्थाने अभिमानाची बाब आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!

विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.