मी पण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो!

Total Views |
Leonardo Da Vinci Legacy
 
फ्रान्समधील अँबोये या ठिकाणी दि. २ मे १५१९ या दिवशी लिओनार्दो-द-विंची हा महान कलावंत मरण पावला. फ्रान्सचा सम्राट फ्रान्सिस पहिला हा त्याचा मित्र आणि आश्रयदाता त्याच्या उशाशी बसला होता. "मी परमेश्वराचा आणि मानवजातीचाही अपराधी आहे. कारण, माझे काम ज्या उंचीवर जायला हवे होते, त्या उंचीला ते पोहोचू शकले नाही.” हे लिओनार्दोचे अखेरचे शब्द होते. अशा महान कलावंतांबद्दलही हल्ली स्वत:ला संशोधक म्हणवणारे आचरट लोक वाटेल ते बोलत आणि लिहीत असतात.
 
पाश्चिमात्य संशोधकांना नवनवीन संशोधन करण्यासाठी काही जुन्या व्यक्ती फार आवडतात. उदा. येशू ख्रिस्त, अलेक्झांडर, विल्यम शेक्सपिअर, नेपोलियन बोनापार्ट यांच्या संदर्भात सतत काहीतरी बोलले, लिहिले, संशोधिले जात असते. यातलेच आणखी एक नाव म्हणजे लिओनार्दो-द-विंची.
 
खरे पाहता यात गैर काहीच नाही. गेली किमान पाच शतके यातले सगळेच जण इतके लोकप्रिय आहेत की, त्यांच्याबद्दल सतत संशोधन करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा नव्याने वेध घ्यायला संशोधकांना आवडते.
 
सुरुवातीला ही संशोधने निरोगी दृष्टीने केली जात. पाश्चिमात्य संशोधकांचे एक कौतुक करण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या संशोधन विषय असलेल्या व्यक्तीचे गुण जसे दाखवून देत, तसेच अवगुणही ठणकावून मांडत असत. कसलीही लपवाछपवी करत नसत.
 
पण, हळूहळू त्यांच्यात विकृती शिरली. दुसर्‍या महायुद्घानंतर पाश्चिमात्य समाज नैतिकदृष्ट्या कमालीचा अधःपतित झाला. त्यामुळे नव्या-नव्या संशोधकांना आपल्या संशोधन विषय व्यक्तिमत्त्वाची लैंगिक लफडी-कुलंगडी चघळणे फार आवडू लागले. म्हणजे समजा, रशियन सम्राज्ञी कॅथरिन-द-ग्रेट असेल किंवा ब्रिटिश सम्राज्ञी पहिली एलिझाबेथ असेल, तर त्यांनी कसे अनेक पुरुषांना ‘खेळवले’ याचे वर्णन ते अगदी मिटक्या मारीत करतात. अगदी तसेच ‘मोनालिसा’ या लिओनार्दोच्या चित्रातील स्त्री प्रत्यक्षात कोण होती, तिचे आणि लिओनार्दोचे काय ‘संबंध’ होते वगैरे मांडणी करताना हे विद्वान अगदी तल्लीन होत होते. गंमत म्हणजे, ही सगळी अटकळबाजीच बरे का! प्रत्यक्ष पुरावा काहीच नाही.
 
गेल्या २० वर्षांपासून हा विकृतीचा प्रवाह पण बदलतोय. हे सगळे महान लोक स्त्रीलंपट होते, अशी संशोधने मांडण्यापेक्षा ते समलिंगी म्हणजे ‘गे’ होते, अशी संशोधने अगदी धडाक्याने मांडण्यात येत आहेत. शेक्सपिअर आणि नेपोलियनला ‘गे’ ठरवून झाले. रॉबिन हुड आणि त्याचा जानी दोस्त जॉन लिट्ल (मराठीत धाकला जॉन) यांना ‘गे’ ठरवून झाले. शेरलॉक होम्स आणि त्याचा दोस्त डॉ. वॉटसन या काल्पनिक व्यक्ती आहेत, तरी त्यांनासुद्धा ‘गे’ ठरवून झाले. ‘टाईम्स लिटररी रिव्ह्यू’, ‘न्यूयॉर्कर’ वगैरे वृत्तपत्रे वाचणार्‍या आपल्याकडच्या काही आचरट पत्रपंडितांनी यावरून प्रेरणा घेऊन आपल्या ‘शोले’मधल्या वीरू आणि जय यांनाही ‘गे’ ठरवून टाकले होते.
 
असे लोक लिओनार्दोला कसा बरे सोडतील? सध्याचे त्यांचे ताजे संशोधन म्हणजे लिओनार्दो ‘गे’ होता आणि तो त्याच्या बापाला एका नोकराणीपासून झालेली अनौरस संतती होता. आता हा दुसरा मुद्दा खराच आहे. पृथ्वीच्या पाठीवर सदासर्वकाळ श्रीमंत, प्रतिष्ठित आणि सत्ताधारी पुरुष अंगवस्त्रे बाळगत आलेले आहेत. आजचा काळही त्याला अपवाद नाही. फक्त आता चोरून ठेवतात. पूर्वी राजरोस ठेवायचे. किंबहुना, अंगवस्त्रे असणे हेच एक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. फक्त यातला महत्त्वाच भाग असा की, पूर्वीचे लोक अंगवस्त्रांपासून झालेल्या संततीच्याही पोटापाण्याची काळजी घेत असत. त्यांना वार्‍यावर सोडत नसत.
असो. तर पूर्वी लिओनार्दो अनौरस होता, हे सत्य इतक्या गर्जून सांगितले जात नसे. आता ते जोरात सांगणे हीच फॅशन झालीय आणि तो ‘गे’ होता याला सबळ पुरावा आहे का? तर नाही; पण एकंदर सर्व गोष्टी ध्यानात घेता ‘आम्हाला तसे वाटते’ म्हणे! अतिशय योजनाबद्ध रीतीने समलिंगी विकृती समाजात सर्वत्र फैलावण्याचे हे उद्योग आहेत.
 
ते कसेही असो. पाश्चिमात्य समाजातही चांगले लोक आहेत आणि ते निर्मळ, निरोगी मनाने लिओनार्दोच्या कलाकृतींचे, लेखनाचे, संशोधनाचे पुन:पुन्हा आकलन करीत आहेत. पुन:पुन्हा आश्चर्याने थक्क होत आहेत. मध्य इटलीतला टक्सनी प्रांत, फ्लोरेन्स हे प्रख्यात शहर ही त्याची राजधानी. फ्लोरेन्सजवळच्या विंची नावाच्या खेड्यात राहाणारा पिएरो फु्रओसिनो डि अँटोनिओ या धनाढ्य इसमाला कॅतरिना नामक नोकराणीपासून झालेला मुलगा म्हणजे लिओनार्दो. पण, हा पोरगा अलौकिक प्रतिभेचे लेणेच घेऊन जन्माला आला होता. वयाच्या ऐन विशीत देखणा चेहरा आणि व्यामायाने कमावलेले बांधेसूद शरीर, यामुळे लिओनार्दो मर्दानी सौंदर्याचा आदर्श समजला जाई. पण, एवढ्यावर थांबायला तो काही कुणी हिंदी चित्रपटातला खान नव्हता. त्याची ज्ञानलालसा अत्यंत तीव्र होती. सरणार्‍या प्रत्येक वर्षाबरोबर लिओनार्दोे अधिकाधिक ज्ञानवंत होत गेला. त्याने मानवी शरीरशास्त्राचा कसून अभ्यास केला. तो उत्तम चित्रकार बनला. तो उत्तम मूर्तिकार बनला. तो एकाच वेळी उत्कृष्ट आर्किटेक्टही होता आणि इंजिनिअरही होता. तो संगीताचाही जाणकार होता नि गणितज्ज्ञही होता. तो तज्ज्ञ व्यायामपटूही होता आणि तज्ज्ञ निसर्ग अभ्यासकही होता. सुदैवाने त्याला आश्रयदातेही चांगले मिळाले. पहिल्यांदा मिलानचा ड्युक लॉरेंझो डि मेडिसी आणि नंतर अखेरपर्यंत फ्रान्सचा सम्राट पहिला फ्रान्सिस या दोघा राजपुरुषांनी लिओनार्दोला आश्रय दिला. त्याला अत्यंत आदराने वागवले. त्याच्या गुणांची कदर केली. त्याच्यावर अनेक कामे सोपवली.
 
लिओनार्दोने या दोघांसाठी काही किल्ले-गढ्या उभारल्या. सैनिकी दृष्टीने त्यांचा उत्तम बंदोबस्त केला. अनेक राजवाडे उभारले. ते फारच उच्च कलेने सजवले. अनेक चौक, कारंजी, बगीचे उभारले. हे करताना बहुधा तब्येतीने चित्रे काढायला त्याला वेळ मिळाला नसावा. कारण, त्याच्या पूर्ण चित्रांची संख्या पुरी २० देखील नाही. अपूर्ण चित्रे मात्र खूप आहेत. त्याच्या रेखाटनांची वही ही अद्भुत वस्तू आहे. त्यावरून असे दिसते की, त्याला भौतिकशास्त्रातही जबरदस्त गती होती. त्याने कच्ची रेखाटने केलेली अनेक यंत्रे नंतरच्या काळात संशोधित झाली. उदा. सायकल आणि विमान.
 
लिओनार्दोला खगोलशास्त्रातही गती होती का? आणि पृथ्वी व इतर ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरतात, तसेच पृथ्वी चपटी नसून गोल आहे, हे त्याला माहिती होते का? असावे.
 
आता गंमत पाहा हं! लिओनार्दो १५१९ साली मरण पावला. त्यानंतर १५६४ साली इटलीतच गॅलिलिओ हा प्रख्यात शास्त्रज्ञ जन्मला. तो १६४२ साली मरण पावला. मृत्यूपूर्वी काही वर्षे त्याने गणित आणि प्रत्यक्ष निरीक्षण यावर आधारित सिद्धांत मांडला. त्याचा आशय असा की, हे विश्व पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे. सूर्य हा स्थिर असा तारा असून, पृथ्वीसह अन्य ग्रह हे त्याच्याभोवती भ्रमण करतात. शिवाय, पृथ्वी ही चपटी नसून गोल आहे. झाले! इटलीतले धर्ममार्तंड खळवले. कारण, गॅलिलिओचे हे संशोधन ख्रिश्चन धर्ममताविरुद्ध होते. त्यावेळचा धर्मप्रमुख पोप उर्बान आठवा हा गॅलिलिओचा मित्र होता. पण, तोही भडकला.
 
गॅलिलिओवर खटला भरण्यात आला. देहांत शासन होता होता तो थोडक्यात बचावला. आपल्याकडचे विज्ञाननिष्ठ लोक अगदी गहिवरून ही गोष्ट सांगत असतात. पण, मग एकाएकी त्यांच्या लक्षात येते की, या कथेतले धर्ममार्तंड म्हणजे आळंदी, पैठण किंवा देहूचे सनातनी हिंदू धर्ममार्तंड नव्हेत. गाठ अत्यंत प्रबळ असा ख्रिश्चन धर्मपीठाशी आहे. मग ते एकदम सौम्य बनतात.
 
असो. तर गॅलिलिओच्या जन्मापूर्वी ६४ वर्षे अगोदर म्हणजे सन १५०० साली लिओनार्दोने काढलेले ‘साल्वादोर मुंडी’ म्हणजे ‘पृथ्वीचा तारणहार’ या नावाचे एक चित्र अलीकडेच उजेडात आले. दि. १५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ‘ख्रिस्टीज’ या जगप्रसिद्ध लिलावगृहाने न्यूयॉर्कमध्ये त्याचा लिलाव केला. ४५०.३ दशलक्ष डॉलर्स एवढ्या विक्रमी किमतीला ते विकले गेले. त्या चित्रात लिओनार्दोने असे दाखवलेय की, तारणहार म्हणजे अर्थातच येशू ख्रिस्त, त्याच्या डाव्या तळहातावर पृथ्वीचा पारदर्शक असा गोल आहे आणि उजवा हात उंचावून तो दोन बोटे म्हणजे अभयमुद्रा दाखवतो आहे. म्हणजे गॅलिलिओच्या आधी लिओनार्दोलाही माहीत होते की, पृथ्वी ‘बायबल’मध्ये म्हटल्यानुसार चपटी नसून गोल आहे.
 
एकंदरीत लिओनार्दोला असंख्य विद्या, असंख्य शास्त्रे अवगत होती, असेच म्हटले पाहिजे. त्याच्या मृत्यूला ५०० वर्षे उलटून गेली, तरी विद्वान त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध, शोध घेतच आहेत. आकलन आणि पुनर्मूल्यांकन करीतच आहेत.
 
मल्हार कृष्ण गोखले 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.