मुंबई : (Chhagan Bhujbal) " राज्यसभेबाबत पक्ष काय तो निर्णय घेईल.मला राज्यात मंत्रिपद असल्याने व मी ज्येष्ठ मंत्री असल्याने राज्यसभेसाठी प्रयत्न करण्याचे किंवा आग्रह धरण्याचे कारण उरत नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने राज्यसभा रिक्त झाली आहे.त्यांच्या जागी कोण राज्यसभेवर जाणार यावर अजून तरी चर्चा झालेली नाही आणि मला देखील याबाबत माहिती नाही. याबाबत जोपर्यंत एखादे नाव निश्चित होत नाही तोपर्यंत अनेक नावे समोर येतच राहणार आहेत." अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवार दि.७ रोजी दिली आहे.
राज्यसभेत सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल,पार्थ पवार आणि नितीन पाटील हे तीन खासदार आहेत.आता चौथ्या जागेसाठी जय पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे,छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे.पण छगन भुजबळ यांनी आपल्या नावाबाबत स्वतःहून पूर्णविराम दिला आहे.आता कुणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरू आहे.
जय पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवेळी २०२९ च्या निवडणुकीवेळी लोकांचे मत आहे की मी उमेदवारी करावी असे वक्तव्य केले होते.तर गुरुवार दि.७ रोजी बारामती येथील जनता दरबारा दरम्यान माध्यमांशी बोलताना जय पवार म्हणाले की , "मला राज्यसभाबाबत काहीही कल्पना नाही.माध्यमात,लोकांच्यात माझ्या नावाची चर्चा असली तरी मी राज्यसभेसाठी इच्छुक नाही आहे.मी दोन दिवसांत मुंबईत येईन तेव्हा माहिती घेऊन सांगेन. आई सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीवरून येतील त्यानंतरच याबाबत समजेल.तसेच २०२९ साली देखील आई सुनेत्रा पवारच बारामतीच्या विधानसभेसाठी उमेदवार असतील."