मुंबई वॉटर मेट्रोमुळे देशात जलवाहतुकीचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे. हायके एएस यांच्यात सामंजस्य करार

Total Views |
Mumbai Water Metro
 
मुंबई : (Mumbai Water Metro) "मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे. हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान गुरुवार, दि.७ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
 
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आधुनिक जलयाने उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्रात जहाजबांधणी सुविधा निर्माण करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे,, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टरबर्ग, हायकेचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स आदी उपस्थित होते.
 
या सामंजस्य करारावर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आणि नॉर्वेच्या मे. हायके एएसचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स यांनी स्वाक्षरी केली. या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या नॉर्वेच्या मे. हायके एएस यांच्यासह अधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. विशेषत: या उपक्रमासाठी सर्वांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, संबंधित अधिकारी आणि भागीदार संस्थांचेही मुख्यमंत्री यांनी कौतुक केले.
 
यावेळी मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प हा राज्याच्या सागरी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मे. हायके एएस यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीसोबत होणारा हा करार महाराष्ट्रातील बंदर विकास, जहाजबांधणी आणि सागरी कौशल्यविकासासाठी नवी दिशा देणारा ठरेल.
 
हेही वाचा : सातबारा उतारा बंद; गावठाणांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड महसुलमंत्र्यांचा निर्णय
 
देशातील इतर शहरांसाठीही मार्गदर्शक
 
"गेल्या दहा वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचे सातत्याने काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून, त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईसारख्या महानगरात जलमार्गांचा प्रभावी वापर केल्यास वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.आगामी काळात शाश्वत वॉटर ट्रान्सपोर्टची मागणी झपाट्याने वाढणार आहे. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरेल."
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.