नवी मुंबई : Airoli-Katai High-Speed Corridor मुंबई महानगर प्रदेशातील रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी ऐरोली-कटाई नाका हाय-स्पीड कॉरिडॉर आता प्रत्यक्षात आकार घेत असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि अखंड होणार आहे.
सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरची उभारणी तीन टप्प्यांत सुरू आहे. त्यापैकी दुसरा टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्पा अंतिम अवस्थेत आहे. तिसऱ्या टप्प्याचे कामही वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जात आहे.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, प्रकल्प पूर्ण होण्याची वाट न पाहता टप्प्याटप्प्याने नागरिकांसाठी सुविधा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळे पूर्ण झालेली पायाभूत सुविधा नागरिकांना त्वरित वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.
बोगद्यामुळे मिळणार थेट जोडणी
या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ऐरोली ते राष्ट्रीय महामार्ग-४ (NH-04) यांना जोडणारा दुहेरी बोगदा. सुमारे १.६९ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामध्ये प्रत्येकी तीन वाहतूक लेन आणि एक आपत्कालीन मार्ग असेल. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगद्याचे काम करण्यात आले आहे. बोगद्यामध्ये अत्याधुनिक वायुवीजन प्रणाली, अग्निशमन व्यवस्था, उच्च-दाब वॉटर मिस्ट सिस्टम, बुद्धिमान प्रकाश व्यवस्था आणि व्हेरेबल मेसेज सायनेजसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील.
पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रोड ते NH-04 दरम्यान बोगदा आणि उन्नत मार्ग तयार केला जात आहे. या टप्प्यातील सुमारे ९२ टक्के नागरी काम पूर्ण झाले असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोडदरम्यानचा असून तो पूर्ण झाला आहे. या टप्प्यामुळे मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा परिसरामध्ये थेट संपर्क निर्माण होणार आहे. तिसरा आणि अंतिम टप्पा NH-04 ते कटाई नाका दरम्यान उभारला जात आहे. सुमारे ६.७१ किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण उन्नत मार्ग २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या टप्प्यात सेवा रस्ते आणि विविध प्रवेश-निर्गम रॅम्प्सची उभारणीही करण्यात येणार आहे.
‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला चालना
हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मुलुंड ते कटाई नाका दरम्यानचे अंतर सुमारे ७ ते ८ किलोमीटरने कमी होईल. प्रवासासाठी लागणारा वेळ ३० ते ४५ मिनिटांनी घटेल. ऐरोलीतील अंतर्गत रस्ते, ठाणे–बेलापूर रोड, महापे रोड, शिळफाटा जंक्शन आणि कल्याण-शिळ रोडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.