मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील असंतोष वाढला असून पक्षात राजीनामा सत्र सुरुच आहे. शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आसाममधील गुवाहाटी येथून निवडणूक लढवणारे अविजित मजूमदार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ई-मेलद्वारे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना आपले राजीनामापत्र पाठवले. अविजित मजूमदार हे एकटे नाहीत तर यापूर्वी अनेक नेत्यांनी सत्तांतरानंतर राजीनामे दिले आहेत.
अविजित मजूमदार यांनी आरोप केला की, आसाममध्ये तृणमूल काँग्रेसची प्रतिमा केवळ मुसलमानांचा पक्ष अशी बनली आहे. केवळ आसाममध्येच नव्हे, तर पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेस फक्त मुसलमान समाजासाठी काम करत असल्याचे चित्र आहे. याच कारणामुळे आपण यापुढे या पक्षासाठी काम करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून ते आसाम तृणमूल काँग्रेसचे सदस्य आणि सचिव होते. तसेच त्यांनी टीएमसीच्या मीडिया सेलचे प्रमुख म्हणूनही काम केले असून यंदा गुवाहाटीमधून निवडणूकही लढवली. “हिंदुत्व मानणारा कोणताही व्यक्ती टीएमसीमध्ये राहू शकत नाही. आता टीएमसीचा अर्थ ‘तृणमूल मुस्लिम काँग्रेस’ असा झाला आहे. आसाममध्ये बांगलादेशी आणि मुसलमान समाजाकडे पक्षाचा अधिक कल आहे. हिंदूंच्या प्रश्नांवर पक्षाचे नेते कधीच बोलत नाहीत. मी हिंदू आहे आणि माझी स्वतःची विचारधारा आहे. त्यामुळे या पक्षात राहणे योग्य नाही.
माजी राज्यसभा सदस्य शांतनू सेन यांचा राजीनामा गुरुवारी माजी राज्यसभा सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शांतनू सेन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. आर. जी. कर बलात्कार व हत्या प्रकरण तसेच त्या संस्थेशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांनी पक्षावर कठोर टीका केली. त्यांनी ममतादीदींना पत्र पाठवून राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत; ज्यात बंगालच्या जनतेने आर. जी. कर प्रकरण, अभया प्रकरण, नोकऱ्यांच्या विक्रीसारखे घोटाळे आणि विविध अनैतिक कृत्ये व भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे आम्हाला नाकारले आहे. माझे अंतःकरण मला या घटनांचे समर्थन किंवा बचाव करण्याची परवानगी देत नाही.
नगरसेवकपद कायम ठेवत अरूप चक्रवर्ती, सुशांत घोष यांचा राजीनामा!
अरूप चक्रवर्ती यांनी महापालिकेच्या लेखा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, सुशांत घोष यांनी बरो-१२ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, मात्र, दोघांनीही नगरसेवकपद कायम ठेवले. त्यांच्या प्रतिक्रिया या राजीनाम्यांपेक्षाही अधिक तीव्र होत्या. चक्रवर्ती म्हणाले, अनेक वर्षे आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचताही आले नाही, कारण त्यांच्या भोवती काही विशिष्ट लोकांचा कायमच गराडा असायचा. पराभवानंतर त्यांपैकी अनेक नेते रस्त्यावरूनच गायब झाले आहेत.
वरपासून खालपर्यंत खिंडार! काही दिवसांपूर्वी नगरसेविका देबोलीना बिस्वास यांनी भवानीपूरमधील पक्षाच्या खराब कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत केएमसीच्या बरो-९ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वरिष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी अलीकडेच पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे अनेक नेते, आमदार आणि नगरसेवकांनी नेतृत्वाविषयीचा असंतोष उघडपणे व्यक्त केला. काहींनी ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या पक्ष बैठकींना हजेरी लावली नाही, तर काहींनी संघटनात्मक कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून किमान ६० तृणमूल नगरसेवकांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला दूर केले. पश्चिम बंगालमधील १२८ नगरपालिकांपैकी तब्बल १२५ नगरपालिकांवर अद्यापही नियंत्रण राखणाऱ्या तृणमूल काँग्रेससाठी ही परिस्थिती अत्यंत विसंगत आणि चिंताजनक मानली जात आहे.
दिलीप घोष यांचा हल्लाबोल!
भाजप नेते आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री दिलीप घोष यांनी या प्रकरणी तृणमून काँग्रेसविरोधात जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, तृणमूल काँग्रेसमध्ये वरच्या नेतृत्वापासून खालच्या स्तरापर्यंत भ्रष्टाचार पसरलेला असून संपूर्ण संघटना हळूहळू कोसळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमधील निधी लुटून स्वतःची संपत्ती उभी केली. हा पैसा गरीब जनतेचा आहे आणि यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना कायद्याच्या चौकटीत आणले गेले पाहिजे.
बंडखोरांना इशारा; पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना साद
स्वकीयांच्या कथित विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी एक भावनिक संदेश कवितेच्या माध्यमातून जारी केला आहे. विरोधक आणि पक्षातील बंडखोरांवर निशाणा साधण्यासाठी त्यांनी आपल्या नव्या कवितेला अत्यंत प्रतीकात्मक आणि उपरोधिक असे ‘गिरगिट’ हे शीर्षक दिल्याचे दिसतेय. या कवितेचा रोख थेट त्या टीएमसी आमदार, खासदार आणि नगरसेवकांकडे असल्याचे दिसते आहे, जे निवडणुकीनंतर पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत किंवा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
'गिरगिटांपेक्षाही अधिक धोकादायक,
काही लोक या बंगालमध्ये,
आपला रंग बदलत आहेत.
पण जनता सर्व काही पाहत आहे,
त्यांचे खरे चेहरे आता समोर येत आहेत.',
अशी काहीशी त्या कवितेची सुरुवात आहे. ममता बॅनर्जी यांची ‘गिरगिट’ ही कविता केवळ बंडखोरांसाठीचा इशारा नसून, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा आणि त्यांचे मनोबल उंचावण्याचा भावनिक प्रयत्न म्हणूनही पाहिली जात आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक