पुणे: (Pune Liquor Tragedy) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भीषण विषारी दारूकांडानंतर, अन्न आणि औषध विभागाच्या आयुक्तपदाचा नुकताच पदभार स्वीकारणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या एका आदेशाने राज्याच्या कानाकोपऱ्यात 'मृत्यूच्या व्यापाऱ्यांचे' धाबे दणाणले आहेत. पुण्यातील २२ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या त्या 'मृत्यू तांडवाचा' मुख्य सूत्रधाराचं 'भिवंडी कनेक्शन' अखेर एफडीए आणि पोलिसांनी शोधून काढलं. ते कनेक्शन नेमकं काय आहे? आणखी कोणत्या शहरांमध्ये कारवाई करण्यात आलीय? आणि या प्रकरणातील अपडेट्स काय आहे. (Pune Liquor Tragedy)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन केल्यामुळे बळी गेलेल्यांच्या संख्येत वाढ झालीय. तब्बल २२ निष्पाप नागरिकांचा यात मृत्यू झालाय. विषारी दारु सेवन करणारे आणखी काही जण उपचार घेतायेत, त्यातील काही गंभीर आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. इतकंच नाही तर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेत अधिक नफा कमवण्यासाठी चक्क मानवी जिवाशी खेळ खेळला जात असल्याचं आता तपासात समोर येतंय. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अवैध अन्न, औषधे आणि भेसळयुक्त उत्पादनांविरोधात धडक मोहीम सुरू केली. तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि समोर आले एक भयानक सत्य. पुण्यात झालेल्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विषारी दारू बनवण्यासाठी ज्या मुख्य केमिकलचा वापर करण्यात आला होता, त्याचा पुरवठा ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून होत होता. एफडीएच्या विशेष पथकाने तात्काळ भिवंडी परिसरातील 'मेसर्स रेक्स इंटरनॅशनल' कंपनीच्या गोदामावर अचानक छापा टाकला. (Pune Liquor Tragedy)
या छाप्यात मानवी जिवासाठी अत्यंत घातक असलेल्या 'मिथेनॉल' या विषारी रसायनाचा तब्बल ५ हजार ९२९ किलोचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या विषारी द्रव्याची कोणतीही अधिकृत खरेदी-विक्रीची नोंद कंपनीच्या नोंदवहीतही उपलब्ध नव्हती. (Pune Liquor Tragedy)
तपासात असेही समोर आले आहे की, भिवंडीतील हा मिथेनॉल साठा पुण्यातील गावठी दारू तयार करणाऱ्या गुन्हेगारी साखळीला पुरवण्यात आला होता. कर्नालसिंग विरका, मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि उरळी कांचन येथील राजू प्रजापती यांच्या माध्यमातून हा विषारी माल पुण्यात पोहोचल्याचा संशय आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी या रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू तयार करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या अड्ड्यांवर विकण्यात आली. (Pune Liquor Tragedy)
याच दारूचे सेवन केल्यानंतर २२ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणात केवळ बेकायदेशीर दारू विक्रीच नाही, तर मानवजीवाशी खेळ करणारी एक मोठी साखळी कार्यरत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. (Pune Liquor Tragedy)
या घटनेनंतर राज्य सरकार आणि प्रशासनावरही दबाव वाढला आहे. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनेला यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही. सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अवैध अन्नविक्री, औषधांची भेसळ, बेकायदेशीर साठेबाजी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यातील बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. (Pune Liquor Tragedy)
ठाणे जिल्ह्यातील FDA अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांवर केलेल्या तपासणीत तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. प्रतिबंधित आणि आरोग्यास हानिकारक अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी सहा मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेय. त्यांच्याकडून ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. याशिवाय, राज्यातील इतर ७ जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर केलेल्या कारवाईत ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बनावट औषधे, भ्रामक जाहिराती आणि औषध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. (Pune Liquor Tragedy)
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पुण्यातील मृत्यू तांडवाने गावठी दारूच्या अवैध व्यापाराचे भीषण स्वरूप उघड केले आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत पसरलेल्या या जाळ्यात स्वस्तात दारू मिळते, पण त्याची किंमत अखेर माणसांच्या प्राणांनी मोजावी लागते. भेसळयुक्त दारू, रासायनिक मिश्रण आणि बेकायदेशीर पुरवठा साखळी यामुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत FDA, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे सुरू केलेली कारवाई महत्त्वाची ठरतेय. मात्र केवळ धाडी टाकून हा प्रश्न संपणार नाही, तर साठेबाजी, पुरवठादार, वितरक आणि दारु बनवणाऱ्यांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई आवश्यक आहे. (Pune Liquor Tragedy)
नागरिकांनीही या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची गरज आहे. कोणत्याही संशयास्पद दारू, अन्नपदार्थ किंवा औषधांविषयी खात्री करुनच त्याचं सेवन करावं, तसंच अशा भेसळयुक्त पदार्थांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. संशयास्पद आस्थापनेचा पत्ता, उत्पादनाच्या नावाच्या तक्रारींवरच पुढील कायदेशीर कारवाई वेगाने होणार आहे. (Pune Liquor Tragedy)
एकूणच, पुणे-पिंपरी चिंचवडमधील ही घटना केवळ एका गुन्ह्याची नाही, तर सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या संपूर्ण साखळीची आहे. भिवंडीत सापडलेला मिथेनॉलचा साठा, तुकाराम मुंढेंची धडक मोहीम, आणि राज्यभर सुरू असलेली तपासणी यामुळं आता २२ बळींनंतर प्रशासनानं कडक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. मात्र या प्रकरणातून घेतला जाणारा धडा एकच आहे. नफ्यासाठी मानवी जीव धोक्यात घालणाऱ्यांना थांबवणे ही केवळ यंत्रणेची नाही, तर समाजाचीही जबाबदारी आहे. (Pune Liquor Tragedy)