अमेरिकन वाईल्ड वेस्ट, लासो आणि पाश

Total Views |
American Wild West Lasso

‘हॉलिवूड’मधील वेस्टर्न चित्रपटांमध्ये बव्हंशी झळकणारे एक पात्र असते ते ‘काऊबॉय’चे. हे ‘काऊबॉईज’ पिस्तुलापेक्षा दोरीचाच उपयोग जास्त करतात, ज्याला ‘लासो’ म्हणून संबोधले जाते. भारतीय संस्कृतीतही काही देवीदेवतांच्या हातात परशू, अंकुश यांच्यासह ‘लासो’सारखेच ‘पाश’ हे आयुध दिसून येते. त्यानिमित्ताने लासोपासून ते पाशापर्यंतचा आजचा हा विश्वसंचार...

अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर ओरेगॉन नावाचा प्रांत आहे. पॅसिफिक महासागराच्या काठावर असलेल्या या प्रांतात पश्चिमेला ‘कॅस्केईड’ नावाची पर्वतरांग आहे नि तिच्या पूर्वेला अफाट असे कोलंबियाचे पठार विस्तीर्णपणे पसरले आहे. साहजिकच, या गवताळ भागात गुरांची खिल्लारे आणि ती बाळगणारे ‘काऊबॉय’ अगदी आजही आहेत. रॉबर्ट बोरबा हा असाच एक ‘काऊबॉय’ आहे. पण, तो आधुनिक ‘काऊबॉय’ असल्याने एका ट्रेलर ट्रकमध्ये बसून तो शेजारच्या कॅलिफोर्निया राज्यात चालला होता. ट्रेलर ट्रकमध्ये त्याचे अख्खे कुटुंबच होते. बायको, मुले, कुत्रे आणि हो... ‘खोगीर’ घालून सज्ज असलेला घोडासुद्धा! ‘काऊबॉय’ म्हटल्यावर घोडा हवाच! वाटेत ‘ईगल पॉईंट’ नावाच्या एका शहरात एका मॉलच्या बाहेर त्याने ट्रेलर थांबवला होता. चहापाणी चालले होते. तेवढ्यात बाजूच्या दुचाकी वाहनांच्या पार्किंग लॉटमधून एका बाईची किंकाळी त्याच्या कानावर आली. "चोर, चोर; माझी बाईक पळवतोय.” एक भुरटा वाहनचोर बाईची बाईक उभ्या-आडव्या वाहनांच्या फटींमधून झपाट्याने घेऊन चालला होता.

ट्रेलरच्या पुढच्या भागाशी हॅम्बर्गरचे लचके तोडत उभा असलेला बोरबा क्षणार्धात ट्रेलरच्या मागे धावला. एका उडीत वर चढला. दुसर्‍या उडीला घोड्याच्या पाठीवर चढला आणि तिसरी उडी घोड्यासकट ट्रेलरच्या बाहेर पडली. घोडेस्वार बोरबा भरधाव बाईकचोराचा पाठलाग करू लागला. आपण जर अमेरिकन वेस्टर्न चित्रपट पाहिले असतील, तर हे दृश्य आपल्याला पूर्ण ‘फिल्मी’ वाटेल. अमेरिकन चित्रपट क्षेत्रात म्हणजे, ‘हॉलिवूड’मध्ये वेस्टर्न चित्रपटांची एक फार मोठी परंपरा आहे. मैलोगणती पसरलेली विस्तीर्ण भूमी, तिच्यावर चरणारे गुरांचे कळप, त्यांची देखरेख करणारे ‘काऊबॉईज’ किंवा ‘काऊगर्लस्’; तगडे, देखणे घोडे; राकट, रांगडे नायक; त्यांच्या खरखरीत जीन पॅन्टस्, कातड्याची जाकिटे, रुंद कडांच्या भल्या थोरल्या हॅटस्, कमरेला लटकणारी पिस्तुले; गावांमधले झुलत्या दारांचे अड्डे, तिथला तीनपत्त्यांचा जुगार, छातीवर चांदीचा बिल्ला लावलेला आडदांड शेरीफ ; किड्या-मुग्यांइतक्याच सहजपणे माणसे मारणारे खलनायक आणि प्रचंड गोळीबार हे वेस्टर्न चित्रपटांचे विश्व आहे. ग्रेगरी पेक, अ‍ॅन्थनी क्वीन, यूल ब्रायनर, चार्ल्स ब्रॉन्सन, ओमर शरीफ, हेन्री फोंडा, जेम्स कॉबर्न, कर्क डग्लस, क्लिटं ईस्टवुड ही सगळी वेस्टर्न चित्रपटांची झगमगती दैवते होती. पण, त्यातही सर्वाधिक लोकप्रिय नायक म्हणजे जॉन वेन. वेस्टर्न चित्रपटातला तगडा, रांगडा, दणकट, अव्वल पिस्तुलबाज नायक रंगवायचा, तर जॉन वेननेच, असे एकेकाळी समीकरणच होते.
आपण अमेरिकन वेस्टर्न चित्रपट पाहिला नसेल, तरी काही हरकत नाही. आपला ‘शोले’ तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अनेक उत्तमोत्तम वेस्टर्न चित्रपटांमधला मसाला एकत्र करून, त्याला आपल्याकडच्या चंबळ खोर्‍यातल्या डाकूंची फोडणी देऊन, पटकथा लेखक सलीम-जावेद यांनी ‘शोले’ तयार केला. मात्र, रमेश सिप्पीचे दिग्दर्शन आणि संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ, अमजद खान यांच्यासह सर्वच कलावंतांनी जीव ओतून काम केल्यामुळे ‘शोले’ कोणत्याही हॉलिवूड वेस्टर्न इतकाच उत्कृष्ट झाला आहे, यात शंकाच नाही.
तर सांगायचा मुद्दा असा की, १८व्या शतकात अमेरिकेत खरोखरच अशी स्थिती होती. युरोपातून अटलांटिक महासागर ओलांडून धाडसी दर्यावर्दी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर उतरले. आजच्या अमेरिका या देशापुरते बोलायचे तर, इ.स. १६०७ साली इंग्लंडमधल्या लोकांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर ‘जेम्सटाऊन’ ही वसाहत उभी केली.
मग खुद्द इंग्लंडमधले आणि युरोपमधल्या अनेक देशांमधले धाडसी, साहसी लोक या नव्या भूमीवर उतरले. ते सतत पश्चिमेकडे जात राहिले. अफाट, सुपीक जमीन, प्रचंड पर्वत, समुद्रासारख्या नद्या, विस्तीर्ण जंगले, निसर्गाचे मुक्त वरदान हे सगळे पाहून हे लोक वेडेच झाले. या संपन्न भूमीवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करताना यांनी स्थानिक ‘रेड इंडियन’ जमातींची कत्तल केली. पण, ते सतत पश्चिमेकडे जात राहिले. अखेर पॅसिफिक महासागराच्या काठी पोहोचल्यावरच ते थांबले. हा प्रवास १००-१२५ वर्षे चालूच होता. पुढे १७७६ साली अमेरिका हा स्वतंत्र देश बनला. १८६५ साली तो यादवी युद्धातून तावून-सुलाखून बाहेर पडला. पण, पश्चिम ही पूर्वेपेक्षा लगडी, रांगडी आणि मनमोकळी हे वैशिष्ट्य कायम राहिले. म्हणूनच, खुद्द अमेरिकेतच पश्चिमी प्रांतांना म्हटले जायचे- ‘दि वाईल्ड वेस्ट’ किंवा ‘दि ओल्ड वेस्ट!’
इ.स. १९०३ साली अमेरिकेच्याच हेन्री फोर्डने स्वयंचलित मोटार कारचा कारखाना काढला आणि घोड्यांचा जमाना संपला. पण, अमेरिकेच्या पश्चिमी प्रांतांमध्ये विस्तीर्ण कुरणे आजही आहेत. त्यांच्यावर चरणारी गुरांची खिल्लारे आजही आहेत. त्यांची देखभाल करणारे ‘काऊबॉईज’ आणि ‘काऊगर्लस्सुद्धा आहेत. त्यांच्याकडे मोटारीच का, ट्रेलर ट्रकसारखी अवजड वाहनेसुद्घा आहेत. पण, विस्तीर्ण रँचेसवर फिरताना घोडा जास्त उपयोगी पडतो, हा त्यांचा अनुभव असल्यामुळे त्यांनी घोडेही बाळगलेले आहेत. चित्रपटातले ‘काऊबॉईज’ लिमलेटच्या गोळ्यांप्रमाणे पिस्तुलाच्या गोळ्यांची खैरात करत असतात. पण, प्रत्यक्षातले ‘काऊबॉईज’ पिस्तुलापेक्षा दोरीचा उपयोग जास्त करतात. या दोरीला म्हणतात, ‘लासो’. उत्कृष्ट ‘काऊबॉयला’ घोडेस्वारीप्रमाणेच ‘लासो’चा प्रभावी उपयोग करता येतो. एका मजबूत दोरखंडाचा फास आवळलेला असतो. घोडेस्वार ‘काऊबॉय’ आवश्यकतेप्रमाणे फास लांब-जवळ करून, तो फेकून बेफाम, अनावर झालेल्या एखाद्या बैलाला वा टोणग्याला नियंत्रणात आणतो. हे काम अतिशय कौशल्याचे असते. फास कमी-जास्त करणे, तो अचूक अंतरावर फेकणे आणि सावज जेरबंद होईल; पण मरणार नाही अशा कौशल्याने तो आवळणे, यासाठी शक्ती, युक्ती, चपळाई, प्रसंगावधान सगळेच लागते.
सुरुवातीला सांगितलेल्या प्रसंगातला रॉबर्ट बोरबा हा असा तरबेज ‘काऊबॉय’ आहे. ट्रेलर ट्रकमधून घोड्यावर बसून उडी घेऊन त्याने वेड्यावाकड्या पळणार्‍या बाईकचोराचा पाठलाग सुरू केला. ईगल पॉईंटच्या रहिवाशांना खराखुरा चित्रपट पाहायला मिळाला. अडचणीच्या रस्त्यावरून मोठ्या रस्त्यावर आल्यावर बाईकचोराला आडोसा मिळेना. त्याने बाईक सोडून दिली आणि तो मुद्दाम वेडावाकडा पळू लागला. क्षणार्धात बोरबाने घोड्याच्या खोगिराला लटकणारा ‘लासो’ काढला आणि हवेत फिरवून फेकला. चोर जेरबंद होऊन अर्धा रस्त्यावर नि अर्धा फुटपाथवर धाडकन आदळला. मग पोलीस आले. सगळे रीतसर झाले. बोरबाने गोळी न झाडता ‘लासो’चा उपयोग करून चोराला जिवंत पकडले, याचे सगळ्यांनाच कौतुक वाटले. स्वतः बोरबाला मात्र विशेष काही वाटले नाही. तो म्हणाला, "लासोचा वापर करणे हा माझ्या व्यवसायाचा भागच आहे. मी व्यावसायिक काऊबॉय आहे. आम्ही लासोला ‘रोपिंग’ म्हणतो आणि आमच्या ‘रोपिंग’च्या स्पर्धासुद्धा होतात.”
 
यावरून आठवण झाली गणपतीची. त्याच्या हातात परशू, अंकुश यांच्यासह ‘पाश’ हेही आयुध असते. संकटे, विघ्ने यांना तो त्या ‘पाशा’ने बांधून टाकतो, असा संकेत आहे. सरस्वतीच्या हातातही ‘पाश’ आहे. ‘नमस्ते शारदे देवि, पाश पुस्तक धारिणी’ अशीच मुळी तिच्या स्तोत्राची सुरुवात आहे. ‘रामायणा’त अशोकवन उद्ध्वस्त करणार्‍या मारुतीला इंद्रजिताने ‘ब्रह्मपाशा’त बांधून रावणासमोर उभे केले होते. ‘महाभारता’त कौरवांनी भीमाला विषारी मोदक खायला घालून आणि ‘नागपाशा’ने बद्ध करून गंगेत ढकलून दिलेे होते. तरी सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे ‘यमपाश’, ज्यापासून कुणाची कधीही सुटका होत नाही. आत्म्याला देहातून बाहेर काढून यमलोकात नेण्यासाठी यमदूत ‘पाश’ हेच आयुध वापरतात. अन्य काही नाही; असा संकेत आपल्या ऋषिमुनींनी का बरे निर्माण केला असेल?
 
इजिप्तमध्ये अ‍ॅबिडोसमधल्या प्राचीन मंदिरात फारोह राजा सेती हा हातात ‘पाश’ घेऊन बैल पकडायला निघाला आहे, असे दृश्य आहे. हे मंदिर ख्रिस्तपूर्व १२८० या काळातले आहे. हिरोडोटस हा पश्चिमेतला सर्वात प्राचीन इतिहासकार. सनपूर्व ४८४ ते ४२४ हा त्याचा काळ आहे. तो आपल्या ग्रंथात ‘सॅगारशियन’ नावाच्या जमातीबद्दल लिहितो की, "हे लोक रणांगणात, आपल्या शत्रूंवर लांबून फास टाकून त्यांना घोड्यावरून खाली खेचतात आणि जवळ खेचून त्यांची मुंडकी उडवतात.”
 
यावरून असा तर्क करता येतो की, ‘पाश’ या आयुधाचा वापर करून लढल्या जाणार्‍या युद्धाची एक स्वतंत्र कला असावी. ती जगभर प्रचलित असावी नि शिवाच्या गणांचा सेनापती जो गणपती, तो त्याही कलेचा एक आचार्य असावा.




मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.