एकीकडे शांतता चर्चेच्या वाटाघाटी सुरु असताना, दुसरीकडे अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले चढवले. त्यामुळे पुन्हा एकदा शांतिवार्ता फिस्कटण्याचीच चिन्हे अधिक. पण, तरीही अमेरिकेसोबतच इराणही अतिशय काळजीपूर्वक पावले टाकत असून, त्यातून नेमके काय साध्य होते, याकडे आता अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसत असली, तरी तो दिवस कधी उजाडणार, हे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. इराणच्या नौदलाने गेल्या २४ तासांमध्ये ३२ जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी पार करू दिल्याचा दावा केला आहे. दोहा येथे इराणची गोठवलेली संपत्ती मोकळी करण्याबाबत चर्चाही झाली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी इराणचा दौरा केला. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचा दौरा केला. ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये शांतता कराराच्या बृहत् मसुद्याबाबत एकवायता होत असल्याचे संकेत मिळाले. ट्रम्प यांनी सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान यांच्यासह आखाती अरब देशांच्या नेत्यांशी एकत्रित चर्चा केली. त्या सुमारास भारतात आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी लवकरच चांगली बातमी मिळू शकते, याचे सूतोवाच केले. त्यामुळे खनिज तेलाचे भाव एका बॅरलला १०० डॉलरपेक्षा खाली घसरले. त्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी शांतता करार करण्याची घाई न करता, प्रत्येक मुद्दा नीट तपासून घ्यायला सांगितले. अरब देशांशी बोलताना त्यांना हा करार झाल्यानंतर भविष्यात ‘अब्राहम करारा’चा विस्तार करून त्यात सौदी अरब, कतार आणि पाकिस्तानने इस्रायलला राजनयिक मान्यता देऊन त्याच्याशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत सुचवले. भविष्यात इराणही या करारामध्ये सहभागी होऊ शकेल, असा आशावाद व्यक्त केला.
युद्धविराम शांतता करारात बदलण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, याची दोन्ही बाजूंना कल्पना आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, इराणने आपण कधीही अण्वस्त्र बनवणार नाही, असे घोषित करावे. तसे न केल्यास, इराणने किमान २० वर्षे युरेनियम समृद्ध न करण्याची हमी द्यावी. अमेरिकेच्या हल्ल्यात जमिनीत गाडले गेलेले समृद्ध युरेनियम बाहेर काढून ते नष्ट करावे किंवा इराणच्या सीमेबाहेर पाठवावे. तसेच इराणने युरेनियम समृद्ध न करण्याचा वायदा करून आपले अणुप्रकल्प बंद करावेत, असे अमेरिकेला वाटते. इराणने अशी तयारी दाखवल्यास अमेरिका आखाताभोवतीचा वेढा उठवून इराणची गोठवलेली संपत्ती त्यांना परत करेल. इराणविरुद्धचे निर्बंधही टप्प्याटप्प्याने हटवण्यात येतील.
मात्र, इराणची भूमिका याविरुद्ध आहे. युद्धविराम दोन महिन्यांनी वाढवून याकाळात अमेरिकेने इराणची गोठवलेली संपत्ती त्यांना परत करावी. इराण आणि ओमानला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडणार्या जहाजांचे व्यवस्थापन करून त्यांवर कर लावण्याची परवानगी द्यावी. इराणच्या अणुप्रकल्पाबाबत स्वतंत्र वाटाघाटी करण्यात याव्यात. आपल्याला अण्वस्त्र बनवण्यात रस नाही, ही इराणची ऐतिहासिक भूमिका असली; तरी इराण त्याची हमी द्यायला तयार नाही. युरेनियम समृद्ध करणे हा आपला अधिकार असून, किती समृद्धीकरण करावे याबाबत इराणची चर्चेची तयारी असून, पुढची तीन ते पाच वर्षे समृद्धीकरण स्थगित करण्यास इराण तयार आहे. इराण आपल्या ड्रोन आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांबाबत वाटाघाटींसाठी तयार नाही. इराणने क्षेपणास्त्रनिर्मिती पुन्हा एकदा सुरू केल्याची बातमी इस्रायली माध्यमांनी दिली आहे. इराणचे समर्थन असलेल्या दहशतवादी इस्रायल आणि आखाती अरब देशांना इराणची ही भूमिका मान्य नाही. इराणी लोक वाटाघाटींमध्ये हुशार असून, त्यांना माहिती आहे की, अमेरिकेचे सैन्य एकदा माघारी गेले की, ते परत येणार नाही. नोव्हेंबर २०२६ मध्ये अमेरिकेत होणार्या निवडणुकीत जर सिनेट आणि प्रतिनिधीगृहामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला, तर तिथे त्यांच्याविरुद्ध ‘महाभियोग’ चालवला जाईल. तसे झाले नाही, तरी त्यांची सगळी शक्ती अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात खर्च होईल. त्यामुळे कोणत्याही वाटाघाटींमध्ये इराणचे युरेनियम काढून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरपारची लढाई लढावी लागली तरी लढावी, असे इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातींचे मत आहे.
अमेरिकेने पुन्हा युद्धाला सुरुवात केली, तर त्याचे सर्वाधिक परिणाम सौदी अरबला भोगावे लागतील. या युद्धाच्या पहिल्या फेरीत संयुक्त अरब अमिरातींनी इराणचे सर्वाधिक हल्ले झेलले होते. आता संयुक्त अरब अमिरातींच्या मदतीला इस्रायलची ‘आयर्न डोम’ प्रणाली असल्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शयता कमी आहे. त्यामुळे इराणकडून सौदी अरब आणि कतारविरुद्ध जास्त हल्ले केले जाऊ शकतात. इराणकडून जलशुद्धीकरण प्रकल्प, तसेच समुद्राखालून जाणार्या इंटरनेट केबलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. इराणने असे काही करण्याचा प्रयत्न केल्यास, अमेरिकेकडून इराणला अद्दल घडवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला जाऊ शकतो आणि इराणकडूनही अरब देशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जाऊ शकते. असे झाल्यास त्याचे केवळ आखातावरच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील. या भीतीमुळेच युद्धाला तोंड फुटत नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी इराणसोबतचा कोणताही करार हा बराक ओबामा सरकारच्या काळात सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य आणि जर्मनी यांनी इराणसोबत केलेल्या अणू-करारापेक्षा चांगला असल्याचे दाखवून देणे गरजेचे आहे. ट्रम्प यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी या कराराला कडाडून विरोध केला होता. २०१७ साली अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, त्यांनी हा करार रद्द करत चुकीचा पायंडा पाडला. त्यानंतर इराणनेही युरोनियम समृद्धीकरणाची मर्यादा वाढवली. त्यातूनच सध्या जमिनीखाली गाडले गेलेले सुमारे ४०० किलो मोठ्या प्रमाणावर समृद्ध केलेले युरेनियम तयार झाले. या युरेनियमपासून सुमारे दहा अण्वस्त्रे बनवता येतील.
इराणचे नौदल आणि हवाईदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे इराणसाठी हे युरेनियम अतिशय महत्त्वाचे आहे. अयातुल्ला अली खामेनींचा अण्वस्त्रनिर्मितीला विरोध होता. पण, सध्या इराणची सत्ता हातात असलेल्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड’च्या अनेक नेत्यांसाठी इराणने लवकरात लवकर अण्वस्त्रे बनवणे आवश्यक आहे. या युद्धापूर्वीही इराणसाठी होर्मुझची सामुद्रधुनी सागरी-वाहतुकीसाठी थांबवणे शय होते. पण, असे केल्यास अमेरिका युद्धाला सुरुवात करून आपले शीर्षस्थ नेतृत्व संपवेल, अशी भीती होती. या युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे अली खामेनींसह ४०हून अधिक नेते मारले गेल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही उरले नाही. या युद्धात इराकमधील ‘कुर्दी’ लोकांचे बंड घडवून आणून, त्यांच्याकरवी इराणवर आक्रमण करवणे, तसेच इराणचे माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांना अध्यक्षपदी बसवण्याची इस्रायलची योजना होती. याच अहमदीनेजाद यांनी २००५ साली अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर जगाच्या नकाशातून इस्रायलला पुसून टाकण्याची दर्पोक्ती केली होती. आठ वर्षे अध्यक्षपदी राहिल्यानंतर त्यांची कारकीर्द संपली असली, तरी ते राजकारणात सक्रिय होते आणि पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक होते. पण, त्यांचे खामेनींशी मतभेद झाल्याने त्यांना प्रवाहपतित करण्यात आले. तसेच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. पण, सुरुवातीच्या हल्ल्यामध्ये अहमदीनेजाद जखमी झाल्याने, तसेच अरब देशांचे ऐकून ‘कुर्दीं’च्या बंडाला ट्रम्प यांनी विरोध केल्यामुळे हे युद्ध अनिर्णित अवस्थेत आहे. अमेरिका आपल्याला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे इराणला माहिती असले; तरी नोव्हेंबर २०२६ मधील निवडणुका हरतील, असे ट्रम्प काहीही करणार नाहीत, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळे इराण अतिशय संयमाने वाटाघाटी करत आहे. दोन्ही बाजूंकडून ‘काटा’ मी जिंकलो आणि ‘छापा’ तू हरलास’ हा खेळ खेळला जात आहे.