‘मविआ’चा टांगा पलटी

Total Views |
MVA Nashik Political Crisis
 
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू असून, उमेदवार निवड, मतांची जुळवाजुळव आणि स्थानिक नेत्यांच्या बैठकांमुळे राजकीय घडामोडींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात विशेषतः नाशिकमध्ये जाणवणारी शांतता, विविध प्रश्न निर्माण करत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांनी, निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, अपक्ष सदस्यांशी संपर्क आणि नाराज गटांना सांभाळण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. नाशिकसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने, महायुतीचे वरिष्ठ नेतेही वारंवार दौरे करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
 
याउलट, महाविकास आघाडीमध्ये मात्र अपेक्षित हालचाली होत असलेल्या दिसत नाहीत. काँग्रेस, ‘उबाठा’ गट आणि शरद पवार गट यांच्यातील अंतर्गत मतभेद, अजूनही पूर्णपणे मिटले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उमेदवाराबाबत स्पष्ट भूमिका नसणे, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमामुळेच नाशिकमध्ये आघाडीच्या गोटात भयाण शांतता पसरल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये, महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, अलीकडील काही राजकीय घडामोडींमुळे अनेक स्थानिक नेते, सावध भूमिकाच घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणूक ही केवळ जागांची लढाई नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीमच मानली जाते. त्यामुळे नाशिकमधील ही राजकीय शांतता भविष्यातील मोठ्या बदलांची चाहूल तर नाही ना? असा स्वाभाविक प्रश्नही उपस्थित होत आहे. आता महाविकास आघाडी या शांततेतून बाहेर पडते की, महायुतीच आपली आघाडी अधिक मजबूत करते, याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 
युवराजांचा नाशिक दौरा
 
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अथक धावपळीनंतरही निवडून येण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसल्याने, एकीकडे महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांच्या गोटात भयाण शांतता आहे. ही शांतता भंग करण्याच्या उद्देशाने, नवे ‘टोमणेसम्राट’ म्हणून उदयास येणारे ‘उबाठा’चे युवराज आदित्य ठाकरे यांनी काल-परवा नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटण्याबरोबरच, भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या देण्याचेही काम केले. भाजपच्या कारभारामुळे त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांचा कोंडमारा होत असल्याचा शोध आदित्य ठाकरे यांनी लावला असून, ’उबाठा’ने जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. "सत्ताधारी म्हणून कामकाज करताना अनेक मर्यादा येतात. सध्या भाजपच्या नगरसेवकांचीही, त्यांच्या पक्षाच्या कारभारामुळेच कोंडी होत आहे. त्यामुळे भाजपचेच नगरसेवक विरोधकांना अनेक मुद्दे पुरवतात. हे मुद्दे भाजप म्हणून त्यांना मांडता येत नाहीत,” असेही ठाकरे म्हणाले.
 
आता आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला म्हणावे तरी काय? असा भोळाभाबडा प्रश्नच भाजप नगरसेवक आणि सर्वसामान्य नाशिककरांना पडला. एकतर स्वपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’वर अनेकवेळा गार्‍हाणे मांडूनही ना मोठे साहेब, ना छोटे साहेब राज्यात जाण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यात नाशिकमध्ये कार्यकर्ते तरी किती उरले आहेत? याचाही आदित्य ठाकरे यांनी शोध घेण्याची गरज आहे. पण, सदासर्वदा भाजपवर तोंडसुख घेणारे ठाकरे यांनी, नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु, ही कामे कोणत्या राज्यातील कंत्राटदारांना दिली जात आहेत? त्याचा नाशिकला आणि शहरातील नागरिकांना काही फायदा होत आहे का? असे प्रश्नही उपस्थित केले. मात्र, हे करताना पुढील ३० ते ४० वर्षांचे नियोजन डोळ्यांपुढे ठेवूनच विकासकामे सुरू आहेत, याचीही त्यांनी माहिती घेण्याची गरज होती. पण, "नाशिक शहरातील नागरिकांची कोंडी भाजपने करून, पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदून ठेवले आहेत,” असे म्हणणार्‍या ठाकरेंनी, आपली शहरावर निर्विवाद सत्ता असताना काय दिवे लावले? याचाही हिशोब दिला पाहिजे.




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.