भारत करणार भूमध्य समुद्रात शस्त्र तैनात?- भारत-सायप्रसमध्ये कराराचा तुर्कीएच्या वृत्तसंस्थांचा दावा
26-May-2026
Total Views |
मुंबई : ( Mediterranean Sea) भारत भूमध्य समुद्रात तुर्कीएच्या सीमेजवळ शस्त्र तैनात करणार असून, याबाबत सायप्रस देशाशी चर्चा झाल्याचे तुर्कीएतील एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तुर्कीएकडून सातत्याने भारताच्या काश्मीर प्रश्नाबाबत करण्यात येणारी विधाने आणि तुर्कीएने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताने घेतल्याचे त्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याबाबतचा करार भारताने सायप्रस देशाबरोबर केल्याचा दावाही या वृत्तसंस्थेने त्यांच्या अहवालामध्ये केला आहे.
सायप्रस राष्ट्राध्यक्षांचा भारत दौर्यात भारताने तुर्कीएविरोधात मोर्चेबांधणी केली असून, भारत आता भूमध्य समुद्रात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तैनात करणार असल्याचे तुर्कीएच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारत आणि सायप्रस या दोन देशांमध्ये अलीकडेच एक संरक्षण करार झाला होता. त्यादरम्यान, याबाबतच्या करारावरही स्वाक्षरी झाल्याचे तुर्कीएच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा झाली असून, दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्यासाठीचा पंचवार्षिक आराखडाही प्रसिद्ध केला. यामध्ये सायबर सुरक्षा, अंतराळ, सागरी वाहतूक आणि आरोग्यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच, भारत आणि सायप्रसने अन्य सहा करारांवरही स्वाक्षरी केली आहे. तुर्कीएने याला तुर्कीविरोधी पाऊल म्हणून संबोधले आहे.
भूमध्य समुद्रातील भारताच्या हिताची तुर्कीएला पूर्ण कल्पना असून, भारत सध्या ग्रीस आणि सायप्रसबरोबर तुर्कीएचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भूमध्य समुद्रात (Mediterranean Sea) उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान, तुर्कीएने आजवर अनेकदा उघडपणे भारतविरोधी भूमिका घेतली असून, काश्मीर प्रश्नावरही भारताला विरोध केला आहे. तसेच, ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी तुर्कीएच्या ड्रोनचा वापर पाकिस्ताने भारतविरोधात केला होता. मात्र, तुर्कीएनिर्मित सगळेच ड्रोन पाडण्यात त्यावेळी भारताला यश आले होते. (Mediterranean Sea)