चंद्रपुरातील सिंदेवाही येथील जंगलात तेंदू पत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. यामुळे चंद्रपुरातील वाढत्या मानव-व्याघ्र संघर्षावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. राज्यातील सर्वांत जास्त वाघांची संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील मानव-व्याघ्र संघर्षाला जेवढी वाघांची वाढलेली संख्या कारणीभूत आहे, तेवढेच तेंदू आणि मोह फुले संकलनासाठी संरक्षित जंगलात जाणारे गावकरीदेखील वाढत्या संघर्षाला कारक आहेत. त्यामुळे हा प्रश्न उपाययोजनांचा राहिलेला नसून गावकर्यांचा जंगलावर अवलंबून असणार्या रोजगाराचादेखील आहे. या सगळ्याचा ऊहापोह करणारे हे वार्तांकन...
चंद्रपूर जिल्हा आज देशातील सर्वाधिक व्याघ्रसंख्या असलेल्या भागांपैकी एक मानला जातो. विशेषतः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि त्याच्या आसपासच्या जंगलांमध्ये वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०२२च्या राष्ट्रीय व्याघ्रगणनेनुसार आणि अलीकडील अहवालांनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक वाघ असल्याचे सांगितले जाते. काही स्थानिक अहवालांमध्ये ही संख्या ३००च्या जवळ पोहोचल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या संख्येला ताडोबा परिसरातील जंगलाचे उत्तम संवर्धन, शिकार प्राण्यांची (हरीण, सांबर, रानडुक्कर) वाढलेली संख्या, व्याघ्र संरक्षणासाठी कठोर कायदे, जंगलातील पाणवठे व अधिवास व्यवस्थापन आणि विदर्भातील मोठे सलग वनक्षेत्र कारक आहेत. मात्र, वाघसंख्यावाढीसोबत मानव-वन्यजीव संघर्षही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावांच्या सीमेजवळ, शेतांमध्ये आणि अगदी खाणींच्या परिसरातही वाघ दिसण्याच्या घटना वाढल्या आहेत. आज चंद्रपूर हा भारतातील व्याघ्र संवर्धनाचा मोठा यशस्वी नमुना मानला जात असला, तरी वाढती व्याघ्रसंख्या आणि मानवी सुरक्षितता यांमध्ये संतुलन राखणे, हे वनविभागासमोरील मोठे आव्हान बनले आहे.
चंद्रपूरात दरवर्षी वाघांच्या हल्ल्यात साधारण ५० व्यक्ती मृत्युमुखी पडतात. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात २०० लोकांचा मृत्यू झाला असून, गेल्या पाच महिन्यांमध्ये १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक मृत्यू हे उन्हाळ्यातील तेंदू पत्ता आणि मोहफुलांच्या हंगामात होतात. या हंगामात साधारण दहा ते १५ माणसे मृत्युमुखी पडतात. तेंदू पत्ता आणि मोहफुले वेचण्याचे काम प्रामुख्याने पहाटे किंवा सकाळी केली जातात. हाच काळ वाघांच्या हालचालींचाही असतो. त्यामुळे संघर्षाची शयता वाढते. तेंदू पत्ता आणि मोहफूल गोळा करण्यासाठी महिलांचे गट अनेकदा दाट झुडपांत विखुरले जातात. अशा वेळी अचानक समोर आलेल्या वाघामुळे हल्ले होतात.
मानव-व्याघ्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने चंद्रपूरमधील बफर क्षेत्राचे आणि राखीव वनक्षेत्राचे नियोजन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. मोठ्या पातळीवर वाघाच्या ‘कॅरिंग कपॅसिटी’चा वैज्ञानिक अभ्यास करून त्या क्षेत्रातील अनावश्यक वाघांचे स्थानांतरण करणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात तेंदू पत्ता संकलनासाठी गावकरी जातात, त्या ठिकाणी कोण्या वाघाचा वावर आहे का, याचा शोध उन्हाळी हंगामात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून घेतल्यास आणि त्याची कल्पना गावकर्यांना दिल्यास हल्ल्याची पूर्वसूचना देता येऊ शकते. मात्र, बरेचदा पूर्वसूचना देऊनही गावकरी वनविभागाचे ऐकत नसल्याचेदेखील दिसते. दि. २२ मे रोजी घडलेली घटना याचेच द्योतक आहे.
नेमकी घटना काय?
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुयातील गुंजेवाहीच्या जंगलात दि. २२ मे रोजी सात महिलांचा गट तेंदू पत्ता वेचण्यासाठी पहाटे गेला होता. साधारण ९ वाजता तेंदू पत्ता वेचण्याचे काम सुरू असतानाच वाघिणीने अचानक हल्ला चढवला. या वाघिणीसोबत तिची चार निमवयस्क पिल्लं होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरून सैरावैरा पळू लागली. समोर आलेल्या माहितीनुसार १४ वर्षांच्या या प्रौढ वाघिणीने किंवा त्या चार निमवयस्क पिल्लांनी महिलांवर एकत्रित हल्ला चढवल्याची शयता आहे. कारण, मृत महिलांचे मृतदेह हे एकमेकांपासून ३०० ते २०० मीटरच्या अंतरावरच आढळून आले. या हल्ल्यात कवडूबाई मोहुर्ले (४५), अनुबाई मोहुर्ले (४६), संगीता चौधरी (३६) आणि सुनीता मोहुर्ले (३३) यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका घरातील दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून, एका महिलेवर दोन लहान मुलींची जबाबदारी होती, तर दुसरी महिला अपंग पतीमुळे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. महत्त्वाचे म्हणजे, या घटनेच्या आदल्याच दिवशी मृत पावलेल्या महिलांना वनकर्मचार्यांनी थांबवून "जंगलात जाऊ नका,” असा सल्ला दिला होता (छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे). पण काम केल्याशिवाय पोट भरत नाही ना, असे महिला सांगत होत्या. रोजगार हमीचे कामही गावातील सगळ्याच लोकांना थोडी मिळते, त्यामुळे जीवाची पर्वा न करता, गावातली लोक जंगलात तेंदू पत्ता वेचायला जातात. या घटनेनंतर वनविभागाने शनिवारी रात्री हल्ला करणार्या वाघिणीला जेरबंद केले असून तिच्या चार निमवयस्क पिल्लांचा शोध सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तेंदू पत्ता आणि मोहफूल (महुआ) संकलन हे हजारो आदिवासी व वनाश्रित कुटुंबांच्या अर्थकारणाचा कणा मानले जाते. शेतीला उन्हाळ्यात मर्यादा येत असताना एप्रिल ते जून या काळात हे वनउत्पादन ग्रामीण भागाला मोठा रोख पैसा उपलब्ध करून देते. तेंदू पत्ता हा बीडी उद्योगासाठी वापरला जाणारा सर्वांत महत्त्वाचा कच्चा माल आहे. त्यामुळे त्याला ‘ग्रीन गोल्ड’ असेही म्हटले जाते. एक कुटुंब साधारणतः दिवसाला ४०० ते ८०० पुड्या (बंडल) गोळा करते. संकलनाचा हंगाम साधारण ३०-४५ दिवस चालतो. दरवर्षी शासन किंवा वनविभागाकडून दर निश्चित होतात. मजुरी थेट बँक खात्यात जमा केली जाते. साधारण ३५ दिवसांच्या या हंगामात एका कुटुंबाला ३५ ते ५० हजारांचे उत्पन्न मिळते. काही वर्षांत तेंदू व्यापाराची उलाढाल शेकडो कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. गडचिरोलीत २०१७ मध्ये तेंदू अर्थव्यवस्था सुमारे ४०० कोटींवर गेल्याची नोंद आहे.
मोहफूल म्हणजे महुआ वृक्षाचे फूल. हे अन्न, औषध, पशुखाद्य, तसेच स्थानिक मद्यनिर्मितीसाठी वापरले जाते. आदिवासी अर्थव्यवस्थेत याला ‘कॅश क्रॉप’चे स्थान आहे. मार्च ते एप्रिलमध्ये फुले झाडाखाली पडतात. कुटुंबे पहाटे जंगलात जाऊन फुले गोळा करतात. फुले वाळवून व्यापार्यांना किंवा सहकारी संस्थांना विकली जातात. एका कुटुंबाचे दररोजचे संकलन ते ४०-८० किलो असते. ज्याला प्रतिकिलो २५ ते ४५ रुपये दर मिळतो. संपूर्ण हंगामात एका कुटुंबाला याद्वारे २० ते ६० हजारांचे उत्पन्न मिळते. तेंदू पत्ता आणि मोहफूल हे केवळ वनउत्पादन नसून चंद्रपूरच्या आदिवासी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे हंगामी बँक खाते आहेत. अनेक कुटुंबांसाठी वर्षातील सर्वांत मोठे रोख उत्पन्न याच दोन उत्पादनांमधून मिळते.
चंद्रपुरातील वाघांना ‘थर्मल’ तणाव
चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात घडणारा संघर्ष हा वाघ ‘नरभक्षक’ झाल्यामुळे नसून, अति उष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामांचा वैज्ञानिक दाखला आहे. वाघ हे ‘होमियोथर्मिक’ प्राणी आहेत. म्हणजेच, त्यांना त्यांच्या शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवावे लागते. मात्र, त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी नसतात. वाघ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने ‘पेंटिंग’ (तोंडाने वेगाने श्वास घेणे) आणि पाण्यात बसून राहणे, या पद्धतींचा वापर करतात. जेव्हा बाहेरील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रवाह प्राण्याच्या शरीराच्या आत जातो. जर प्राण्याला पाण्याचा स्रोत मिळाला नाही, तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते, ज्याला ‘हायपरथर्मिया’ किंवा ‘हिट स्ट्रेस’ म्हणतात. शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास प्राण्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. तीव्र उष्णतेमुळे शरीरात ‘स्ट्रेस हार्मोन्स’ अचानक वाढतात. यामुळे प्राण्यामध्ये ‘हायपर-इरिटेबिलिटी’ आणि ‘फ्रस्ट्रेशन-अॅरोशन सिंड्रोम’निर्माण होतो. अशा स्थितीत वाघ अत्यंत लहान कारणानेही उद्दीपित होतो आणि हिंसक बनतो. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात तेंदू पत्ता संकलनाचे काम चालते. तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघ ज्या घनदाट सावलीच्या किंवा ओढ्यांच्या भागात आश्रय घेतो. त्याच भागात अनेकदा तेंदूची झाडे असतात. त्यामुळे वाघ आणि मानव एकाच ‘मायक्रो-हॅबिटॅट’मध्ये समोरासमोर येतात. तीव्र उन्हाळ्यात वाघांच्या शरीरात ‘कॉर्टिसोल’ (स्ट्रेस हार्मोन) प्रचंड वाढते. घामाच्या ग्रंथी नसलेल्या वाघांमध्ये यामुळे ‘हायपरथर्मिया’ (मज्जासंस्थेवरील ताण) निर्माण होतो, ज्यामुळे ते कमालीचे चिडचिडे आणि हिंसक बनतात. वाघ सहसा उभ्या मानवी आकृतीवर हल्ला करत नाहीत. मात्र, जंगलात तेंदू पत्ता गोळा करताना जेव्हा मजूर खाली वाकतात, तेव्हा वाघाला तो चार पायांचा प्राणी असल्याचा भास होतो. आधीच ‘हिट स्ट्रेस’ने बिथरलेला वाघ अशा वेळी कसलाही विचार न करता थेट हल्ला करतो.
डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (८६६८२२१००९)
चंद्रपूरमधील तेंदू पत्ता आणि मोहफूल संकलन हा फक्त रोजगाराचा विषय नाही, तर तो स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीशी जोडलेला आहे. तसेच ग्रामीण उपजीविका, महिला सुरक्षा आणि वनव्यवस्थापनाशी संबंधीचादेखील हा गंभीर विषय आहे. तेंदू पत्ता संकलन आणि वाघांचे हल्ले हा केवळ वन्यजीवांचा प्रश्न नसून वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातूनच मानव-व्याघ्र संघर्ष कमी होऊ शकतो. मानव आणि वाघ हे दोघेही निसर्गसाखळीचे महत्त्वाचे घटक आहेत. वाघांचे संरक्षण जितके आवश्यक आहे, तितकीच जंगलावर अवलंबून असलेल्या नागरिकांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे वनसंवर्धन आणि मानवी सुरक्षा यांमध्ये समतोल राखणे, ही काळाची गरज आहे. योग्य नियोजन, स्थानिक लोकांचा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रभावी प्रशासन यांच्या साहाय्याने मानव-व्याघ्र संघर्ष कमी करून सुरक्षित आणि संतुलित सहअस्तित्व निर्माण करणे शक्य होईल.
संकलन - अक्षय मांडवकर (९७६८६८४०३१) मांडणी सजावट - सुरेखा शिंदे