मनोविच्छेद? की मनोनियंत्रण?

Total Views |
Brainwashing CIA Mind Control
 
इव्हान पावलोव्ह नावाच्या रशियन शास्त्रज्ञाने मानवी मनावर काही प्रयोग केले. त्यातून साम्यवादी सोव्हिएत रशियन हेरखात्याने, एक अत्यंत अमानुष अशी पद्धत शोधून काढली. तिचेच नाव ‘ब्रेनवॉशिंग’ किंवा ‘मनोविच्छेद’. पण, अमेरिकेने त्यांच्याही पुढे मजल मारली असावी, असे वाटते. म्हणजे काय? त्याचाच घेतलेला मागोवा...
 
एखादा उच्च सरकारी अधिकारी, वरिष्ठ केंद्रीय मंत्री, उच्च पदावरचा शास्त्रज्ञ अशांना एखाद्या फटाकड्या पोरीच्या प्रेमात पाडायचे आणि मग त्या लफड्याचा जाहीर प्रस्फोट करू, अशी धमकी देऊन या माणसाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवायची, यालाच म्हणतात ‘हनी ट्रॅप’. ही पद्धत आजही वापरली जाते. पण, यात खूप जास्त धोके असतात. अमेरिकन हेरखाते ‘सीआयए’ने यापेक्षा सोपी आणि कमी धोक्याची पद्धत शोधून काढली. महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांवर काम करणार्‍या, परदेशातून आलेल्या तरुण शास्त्रज्ञांच्या घरातच त्यांनी बायको म्हणूनच ‘सीआयए’ हस्तक बायका पेरल्या. म्हणजे आयुष्यभर या शास्त्रज्ञावर आपोआपच नजर ठेवली जाऊ लागली.
 
सोव्हिएत मानसशास्त्रज्ञांनी स्वतःच्या नागरिकांसकट अन्य देशातल्या महत्त्वाच्या नागरिकांवर म्हणजेच, विशेषत: लेखक, साहित्यिक, खेळाडू, कलावंत यांच्यावर मनोविच्छेदाचा प्रयोग केला. हे लोक समाजात लोकप्रिय असतात, तेच जर साम्यवादी तत्त्वज्ञानाचे कौतुक करू लागले, तर साहजिकच समाजमनावर परिणाम होतो. ही हेरगिरी जास्त घातक होती.
 
हेरगिरी म्हटले की, आपल्याला फक्त जेम्स बाँडचे चित्रपट आठवतात. पण, १९६५ साली आलेला ‘दि इपक्रेस फाईल’ हा चित्रपट थरारक नसूनही, जाणत्या प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. १९६२च्या जेम्स बाँडच्या ‘डॉ. नो’च्या तुलनेत हॅरी पामर या नायकाचा १९६५ सालचा ‘दि इपक्रेस फाईल’ हा चित्रपट खूपच वास्तवाच्या जवळ जाणारा होता. जेम्स बाँड मालिकेचे आतापर्यंत २५ चित्रपट झाले. त्यांपैकी पहिल्या काही चित्रपटांत शॉन कॉनरी या स्कॉटिश अभिनेत्याने बाँडची भूमिका केली. पुढे शॉन कॉनरीला ‘सर’ हा किताब मिळाला. हॅरी पामरचे पुढे चार चित्रपट निघाले. सर्वच चित्रपटात मायकेल केन या कॉकनी अभिनेत्याने पामरची भूमिका केली. कॉकनी ही एकेकाळी इंग्लंडमधली हलक्या दर्जाची जमात समजली जात असे. त्यांची एक विशिष्ट बोलीसुद्धा होती. मायकेलचा बाप गोदीत हमाल होता आणि आई स्वयंपाकीण होती. मात्र, आज मायकेल केन हा एक अव्वल गुणवत्तेचा ब्रिटिश अभिनेता आहे. त्यालाही ‘सर’ किताब मिळाला. आज ९३ वर्षांचा असलेला सर मायकेल आणि २०२० मध्ये मरण पावलेला सर शॉन कॉनरी हे व्यक्तिगत जीवनातही चांगले मित्र होते.
 
तर, आता ‘दि इपक्रेस फाईल’ या आगळ्या नावाच्या वेगळ्या कथानकाकडे पाहू. ब्रिटनमधल्या एका महत्त्वपूर्ण संरक्षण प्रकल्पातून १५ प्रमुख शास्त्रज्ञ एकापाठोपाठ असे बाहेर पडतात. १६वा शास्त्रज्ञ रेल्वेने प्रवास करत असताना त्याचे अपहरण केले जाते नि त्याचा शरीर संरक्षक ठार होतो. कर्नल रॉस हा गुप्तहेरप्रमुख, सार्जंट हॅरी पामर या गुप्तहेराला त्या ठार झालेल्या शरीर संरक्षकाच्या रूपाने हे रहस्य उलगडण्याच्या कामगिरीवर जुंपतो.
 
आता व्यक्तिरेखा आणि त्यांची पार्श्वभूमी यातला फरक पाहा. बाँड हा ब्रिटिश शाही नौदलात कमांडर या अधिकारी श्रेणीत आहे. साहजिकच, तो मध्य लंडनमधल्या सुखवस्तू वस्तीत राहतो; तर पामर हा ब्रिटिश पायदळातला साधा सार्जंट आहे. सार्जंट म्हणजे शिपायांचा प्रमुख. साहजिकच, तो लंडनच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळीत राहतो. अपहरण झालेल्या रॅडक्लिफ या शास्त्रज्ञाच्या मागावर असताना, पामरला एक ध्वनिफीत सापडते. तिच्यावर लिहिलेले असते- ‘इपक्रेस!’ म्हणजे काय?
 
ती ध्वनिफीत वाजवून पाहिली असता, तिच्यातून काही चित्रविचित्र कर्णकर्कश आवाज आणि अगम्य शब्द ऐकू येतात. त्यांचा अर्थ कुणीही उलगडू शकत नाही, रहस्य गडद होऊ लागते. इतक्यात पामरचे स्वतःचेच अपहरण होते आणि त्याला कळते की, आपले शत्रू साधेसुधे नाहीत. ते विशिष्ट मनोवैज्ञानिक प्रक्रियांद्वारे, आपले मनच ताब्यात घेऊ पाहत आहेत. ‘माईंड कंट्रोल’ किंवा ‘ब्रेनवॉशिंग’ या नावांनी ओळखल्या जाणार्‍या या प्रक्रियेचे शास्त्रीय नाव आहे, ‘इंडक्शन ऑफ सायकोन्युरोसिस बाय कंडिशंड रिफ्लेक्स अंडर स्ट्रेस’. याच्याच आद्याक्षरांचा शब्द होतो, ‘इपक्रेस’.
 
पामर आपले मन शत्रूच्या ताब्यात जाऊ न देण्याचा आटोकाट; पण अयशस्वी प्रयत्न करतो. त्याला कळते की, आपला पथकप्रमुख मेजर दाल्बी हादेखील फितूर आहे. ‘क्लायमॅक्स’च्या प्रसंगी सार्जंट पामर मेजर दाल्बीच्या माईंड कंट्रोलवर मात करून, त्याला ठार करतो. हे सगळे पाहणारा त्याचा गुप्तहेरप्रमुख बॉस कर्नल रॉस त्याला म्हणतो, "तू आज्ञापालन न करणारा आहेस, म्हणूनच तुला हे जमले.” म्हणजे शाबासकीत पण एक चिमटा! वैतागलेला पामर त्याला म्हणतो, "तुमच्या असल्या प्रायोगिक खेळांमध्ये माझा जीव गेला असता तर?” त्यावर रॉस उत्तरतो, "मग, काय बिघडले? त्यासाठीच आम्ही तुला पगार देतो!” नोकरशाहीमध्ये बॉस आणि हाताखालचे लोक यांच्यातले संबंध दाखवणारे हे चित्रण, वास्तवाच्या खूप जवळ जाणारे होते. म्हणजेच, ग्लॅमरस वगैरे अजिबात नव्हते. एक प्रकारे बाँड चित्रपटांच्या थेट विरुद्ध असेच हे चित्रण होते. विशेष असे की, अशा प्रकारचा चित्रपट निघतो आहे हे कळल्यावर बाँड चित्रपटाचा सहनिर्माता हॅरी साल्टझ्मन याने, या चित्राचे सगळे हक्क विकत घेतले. बाँड प्रमाणेच या चित्रपटाचे प्रेक्षकांनी भरघोस स्वागत केले.
 
तुमच्या जर लक्षात येत असेल, तर १९६७च्या देव आनंदच्या ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात ‘दि इपक्रेस फाईल’मधला ब्रेनवॉशिंगचा भाग, हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या पचनी पडेल इतपत सौम्य करून झकासपैकी दर्शविण्यात आला आहे. पटकथा लेखक आणि दिग्दर्शक विजय आनंद ऊर्फ गोल्डीची ही किमया होती. खलनायक अर्जुन म्हणजे अशोक कुमार, हा ब्रेनवॉशिंग प्रक्रियेने नायक विनय म्हणजे देव आनंदला अमर या एका आंतरराष्ट्रीय हिरे चोराच्या व्यक्तिमत्त्वात परिवर्तित करतो. म्हणजे, आपणच अमर आहोत असे विनयला वाटू लागते, इत्यादी. आता यातला खतरनाक भाग असा की, ‘दि इपक्रेस फाईल’मध्ये जो ब्रेनवॉशिंग नामक प्रकार दाखवला गेला, ते सगळे सत्य होते आणि चित्रपटापेक्षा अधिक भीषण सत्य होते.
 
मनोविज्ञान क्षेत्रातल्या या भीषण प्रयोगाची सुरुवात सोव्हिएत रशियाने केली. १९५० साली कोरियामध्ये यादवी युद्ध सुरू झाले. साम्यवादी उत्तर कोरियाने लोकशाहीवादी दक्षिण कोरियावर आक्रमण केले. रशियाने उत्तर कोरियाची बाजू घेतल्यावर, अमेरिकेने साहजिकच दक्षिण कोरियाची बाजू घेतली. उत्तर कोरियाने पुष्कळ अमेरिकन सैनिकांना कैद केले. पुढे युद्ध थांबले, सामंजस्य करार झाला. उत्तर कोरियाने अमेरिकन युद्धकैद्यांना मुक्त केले पण, आश्चर्य म्हणजे अनेक अमेरिकन सैनिकांनी मायदेशी न परतता उत्तर कोरियातच राहणे पसंत केले. जे बंदी अमेरिकेत परतले, ते कडवे कम्युनिस्ट बनले आहेत आणि मोठ्या हिरिरीने आपल्या मताचा अमेरिकेत प्रचार-प्रसार करीत आहेत, असे त्यांच्या वरिष्ठांना आढळले. अमेरिकन गुप्तचर खात्याने या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांना असे आढळले की, या युद्धबंद्यांवर ब्रेनवॉशिंगचा प्रयोग करून, त्यांच्या मेंदूत साम्यवादी तत्त्वज्ञान ठोकून बसवण्यात आले आहे.
 
अमेरिकन लोक हे फारच उत्तम प्रचारपटू असतात. १९५३ साली अमेरिकन गुप्तचर खात्याचा प्रमुख अ‍ॅलन डल्लेस याने प्रिन्स्टन विद्यापीठात एक जाहीर भाषण करून, या प्रकाराची माहिती जनतेसमोर उघड केली. अशा रीतीने व्यक्तीचा मेंदू आणि मन ताब्यात घेण्याच्या, नि ते करताना ‘एलएसडी’ या एका नशा येणार्‍या पावडरचा भरपूर उपयोग करण्याच्या सोव्हिएत शास्त्रज्ञांच्या पद्धतीला डल्लेसने ‘अमानुष’ म्हटले. अमेरिकन जनतेसकट सगळेच लोकशाहीवादी देश हादरले, सोव्हिएत रशियाला बदनाम करण्याचा डल्लेसचा हेतू सफल झाला. खरी गोष्ट अशी होती की, जे तंत्र आणि जी पावडर सोव्हिएत शास्त्रज्ञांना माहीत आहे, ती आमच्या शास्त्रज्ञांना का माहीत नाही? यावरूनच डल्लेस हैराण होता.
 
पण, सर्वशक्तिमान अमेरिकेने एकदा करायचेच म्हटल्यावर अशक्य काय होते? लवकरच अमेरिकन रसायन-औषधी शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक आणि गुप्तहेर अधिकारी यांच्या सहकार्याने, एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. याचे नाव होते, ‘प्रोजेक्ट एम. के. अल्ट्रा’.
 
कोणताही नवा शास्त्रीय प्रयोग स्वतःवर करायला उत्सुक असलेले काही वैज्ञानिक, काही कोरियातून परतून कम्युनिस्ट बनलेले सैनिक, काही गुन्हेगार अशांवर हे प्रयोग सुरू झाले. हा प्रकल्प नागरिक, राजकारणी, पत्रकार, इतकेच नव्हे तर खुद्द ‘सीआयए’ मधल्याही अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांपासून गुप्त ठेवण्यात आला. परंतु, काही काळाने बातम्या बाहेर फुटल्याच. एका डॉक्टरने पाचव्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. व्हीटी बल्गर नावाचा एक गुन्हेगार कैदी म्हणतो, "मला भयानक भास होऊ लागले. माझ्या समोरच्या माणसांच्या ठिकाणी मला सांगाडे दिसू लागले. एकाच्या हातात कॅमेरा होता, त्या जागी मला कुत्रा दिसू लागला. बाजूच्या भिंतींमधून रक्त वहात आहे, असे मला वाटू लागले. माझी पचनसंस्था पार बिघडून गेली.” इतरांचे अनुभव यापेक्षाही भयानक होते. त्यामुळे खुद्द ‘सीआयए’मध्येच अंतर्गत बोंबाबोंब झाली. तेव्हा घाईघाईने प्रकल्प गुंडाळण्यात आला आणि संबंधित फाईल्स नष्ट करण्यात आल्या.
 
हे झाले अमेरिकन नागरिकांबद्दल; पण, ‘सीआयए’ने हा प्रकल्प हाती घेतला, तो शत्रूच्या माणसांचे ब्रेनवॉशिंग किंवा माईंड कंट्रोल करण्याचे तंत्र शोधण्यासाठी, अधिकाधिक विकसित करण्यासाठी. त्याचे काय झाले? त्याबद्दल कुणीही, काहीही सांगत नाही. मानसशास्त्रज्ञ एखाद्या रोग्यावर उपचार करण्यासाठी मोहिनीविद्येचा-हिप्नॉसिसचा उपयोग करतात पण, तो अंमल कायम टिकत नाही. ब्रेनवॉशिंग करून साम्यवादाला अनुकूल बनवलेले लोक, कायमचे साम्यवादी राहत नाहीत. मात्र, त्यांच्या मनावरचा तो अंमल टिकेपर्यंत ते आपल्या बॉससाठी बरेच काम करून गेलेले असतात.
 
सध्या हंगेरियन-अमेरिकन करोडपती जॉर्ज सोरोसचे हस्तक एकापाठोपाठ एक ‘टूलकिटस्’ वापरून, भारतातल्या ‘जेन-झी’ला चिथावण्या देत आहेत. त्यामागे हा गुंडाळलेला प्रकल्प तर नसेल?
 
मल्हार कृष्ण गोखले




मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.